Next
‘भारतीयांना मोबाइलविना एक दिवसही काढणे कठीण’
प्रेस रिलीज
Monday, July 16, 2018 | 11:35 AM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतीय नागरिक मोबाइलचा वापर केल्याशिवाय एक दिवस ही राहू शकत नसल्याचे वास्तव डिजिटल कंटेंट वितरणामधील जागतिक प्रमुख कंपनी लाइमलाइट नेटवर्क्सच्या ‘स्टेट ऑफ डिजिटल लाइफस्टाइल्स’मधील अहवालातून निदर्शनास आले आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या भारतीय ग्राहकांपैकी दोन-तृतीयांश ग्राहकांनी मोबाइल फोन्सशिवाय एक दिवसही राहू शकत नसल्याचे सांगितले. डिजिटल उपकरणांच्या अधीन असण्यामध्ये भारतीय ग्राहकांचा मलेशियानंतर दुसरा क्रमांक लागतो.

दहा देशांमधील ग्राहकांना ते डिजिटल मीडियासह कशाप्रकारे संवाद साधतात आणि त्यांच्या जीवनामधील तंत्रज्ञानाच्या प्रभावाबाबत विचारण्यात आले. ते त्यांच्या आवडत्या डिजिटल डिवाइसेसना किती वेळ दूर ठेवू शकतात, असे विचारले असता, ६६ टक्के भारतीय युजर्सनी सांगितले की, ते एक दिवसही त्यांच्या मोबाइल फोन्सचा वापर केल्याशिवाय राहू शकत नाहीत. तुलनेत मोबाइल फोन्सला दूर ठेवणाऱ्या युजर्सची जागतिक सरासरी ४८ टक्के आहे. लॅपटॉप व डेस्कटॉप काँप्युटर्स हे भारतीय युजर्ससाठी दुसरे सर्वात महत्त्वाचे डिजिटल तंत्रज्ञान माध्यम ठरले. ४५ टक्के सहभागींनी सांगितले की, ते या माध्यमांशिवाय एक दिवसही राहू शकत नाहीत. सर्वेक्षणामधील हे प्रमाण जास्त आहे आणि जागतिक सरासरी ३३ टक्यांपेक्षा १२ टक्के अधिक आहे.

भारतीय युजर्स या डिजिटल युगामध्ये अधिकाधिक हरवून जात आहेत. ९३ टक्के भारतीय ग्राहकांनी मान्य केले की डिजिटल तंत्रज्ञानाचा त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे, जपानी व जर्मनमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. ११ टक्के जपानी व २५ टक्के  जर्मन वापरकर्त्यांनी सांगितले की, डिजिटल तंत्रज्ञानाचा त्यांच्या जीवनशैलींवर लक्षणीय प्रभाव निर्माण झाला आहे. भारतीय देखील जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाचा त्यांच्या जीवनावरील प्रभावाबाबत आशावादी आहेत.

सर्व प्रकाराच्या ऑनलाइन डिजिटल कंटेंटमध्ये भारतीयांचा सहभाग सर्वाधिक आहे. आठवड्यातून किमान एकदातरी ७८ टक्के भारतीय म्युझिक डाउनलोड किंवा स्ट्रिमिंग करतात. सर्वेक्षण करण्यात आलेल्या देशांमधील हे सर्वात जास्त प्रमाण आहे. चित्रपट डाउनलोड करून ते ऑफलाइन पाहण्यामध्येही भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक होते. हे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा १२ टक्यांनी जास्त आहे.

अहवालातून निदर्शनास आले की, भारतीयांमध्ये हेल्थ व फिटनेस ट्रेकर्सचा अवलंब करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ३५ टक्के भारतीयांनी फिटबिट, गार्मिन किंवा अॅपल वॉचसारख्या ट्रॅकर्सचा वापर करण्याला प्राधान्य दिले, तर ३३ टक्के भारतीयांनी पुढील सहा महिन्यांमध्ये एकतरी ट्रॅकर्स खरेदी करण्याची योजना आखली आहे. जवळपास ४५ टक्के जागतिक ग्राहकांना डिजिटल सहाय्यकांनी गोळा केलेल्या डेटाच्या गोपनीयतेबाबत चिंता होती आणि ४२ टक्के ग्राहकांना सुरक्षितता आणि डिवाइसेसमधील डेटा हॅकिंग होण्याची भीती होती. सुरक्षिततेबाबतची ही चिंता भारतीय प्रतिवादींमध्ये (३६ टक्के) सर्वात कमी होती.

या सर्वेक्षणाबाबत बोलताना भारतातील लाइमलाइट नेटवर्क्सचे कंट्री हेड गौरव मलिक म्हणाले, ‘भारताने डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. सर्वेक्षणातील सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे भारतीय युजर्स डिजिटल उत्पादने व सेवांचा अवलंब करण्यास आणि रोजच्या जीवनाचा भाग बनवण्यास अधिक उत्सुक आहेत. सर्व भागधारकांसह बाजारपेठेमधील कंपन्या, ग्राहक व सरकारसाठी हे सकारात्मक चिन्ह आहे. यामुळे प्रत्येकजण यशाच्या दिशेने वाटचाल करेल आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढण्यासह देशाच्या उत्पादकतेला चालना मिळेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link