Next
‘सोशल’ मीडिया हेही राजकारणच!
BOI
Tuesday, September 17, 2019 | 11:59 AM
15 0 0
Share this article:

‘लोकनीती’ आणि ‘सीएसडीएस’ने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या संदर्भाने ‘सोशल मीडिया आणि राजकीय वर्तन’ या संकल्पनेवर सर्वेक्षण केले. विशिष्ट मते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात सोशल मीडिया प्रभावी ठरतो आहे, असे अनेक निष्कर्ष त्यातून समोर आले आहेत. कॅनेडियन माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅकलुहान यांनी मांडलेला ‘मीडियम इज दी मेसेज’ हा मूलमंत्र सोशल मीडियाच्या वापरालाही लागू पडतो आणि सोशल मीडिया वापरणे हेही एक राजकारणच आहे, हे त्यातून अधोरेखित होत आहे.
..........
प्रसारमाध्यमांच्या तत्त्वज्ञानाच्या विशेष संदर्भाने कॅनेडियन माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅकलुहान यांना तसे ‘दादा’च मानले जाते. माध्यमांच्या तत्त्वज्ञानाविषयीची महत्त्वाची मांडणी असलेला ‘अंडरस्टँडिंग मीडिया - दी एक्स्टेन्शन्स ऑफ मॅन’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला, त्याला आता साधारण पन्नास वर्षांहूनही अधिक काळ उलटून गेला आहे. याच मॅकलुहान बाबांनी नव्या जगाला मीडियाविषयीचा एक मूलमंत्रही देऊन ठेवला आहे - ‘मीडियम इज दी मेसेज’ - अर्थात, माध्यम हाच संदेश! हा मूलमंत्र आजच्या सोशल मीडियाच्या काळातही तितकाच लागू आहे. हे मॅकलुहान बाबा जरी तिकडचे सातासमुद्रापारच्या कॅनडातले असले, तरी त्यांनी मानवजातीला त्या काळीच ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये वगैरे नेऊन बसवले होते. म्हणजे त्या अनुषंगाने आपण त्या वेळीही त्यांना जवळ होतो नि आताही. त्यामुळे त्यांचा हा सिद्धांत आपल्याला लागू होण्याला तशा भौगोलिक सीमा वगैरेंचे बंधनही तसे नाही. आपल्याकडे आता सोशल मीडियावर आधारलेल्या राजकारणाच्या चर्चांना चांगलाच वेग मिळाला आहे. सोशल मीडियाचा राजकारणावर परिणाम होतो की नाही, होत असेल तर तो कसा आहे आणि नसेलच तर तो का नाही, आदी मुद्द्यांशी संबंधित नानाविध तर्कवितर्क केले जात आहेत. अशा तर्कवितर्कांना दिशा देणारे काम मॅकलुहान बाबांच्या त्या मूलमंत्रामध्ये आहे. हे आत्ता असे समोर येण्याचे कारण म्हणजे आपल्याकडे नुकतेच सोशल मीडिया आणि राजकारणाच्या संदर्भाने झालेले एक ताजे सर्वेक्षण.  

‘लोकनीती’ आणि ‘सेंटर फॉर दी स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ने (सीएसडीएस) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या विशेष संदर्भाने ‘सोशल मीडिया आणि राजकीय वर्तन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्षही संस्थेने जाहीर केले आहेत. त्यासाठी देशभरात प्रत्येक टप्प्यातील लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. २६ राज्ये आणि त्यातल्या २११ मतदारसंघांमधून २४ हजार २३६ मतदारांच्या मुलाखती घेतल्यानंतर या सर्वेक्षणातून समोर आलेले मुद्दे राष्ट्रीय पातळीवर विचारात घेण्यात आले आहेत. त्या अर्थाने हे काम निश्चितच व्यापक असे आहे. सर्वेक्षणामध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्युब हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि व्हॉट्सअॅप हे सोशल मेसेजिंग अॅप यांच्या वापराच्या अभ्यासावर भर देण्यात आला होता. त्यानुसार, देशभरातील एकूण मतदारांपैकी एक तृतीयांश मतदारांपेक्षा थोडे जास्त मतदार ही व्यासपीठे वापरताना दिसतात. त्याच वेळी उर्वरित दोन तृतीयांश लोक ही व्यासपीठे वापरत नाहीत, असे हे सर्वेक्षण सांगते. सध्याच्या घडीला फेसबुक आणि व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. या दोन्ही व्यासपीठांच्या वापरामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये खूप मोठी वाढ दिसून आली आहे. सध्या जवळपास एक तृतीयांश मतदार या व्यासपीठांचा वापर करत आहेत. ट्विटर सर्वांत कमी लोकप्रिय असले, तरीही २०१४च्या तुलनेत त्याच्या वापरात सहा पट वाढ झाली आहे. 

समाजातील वरच्या जातीतील व्यक्तींचे सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगत आहेत. दलित वा भटक्या समुदायांच्या सोशल मीडिया वापराच्या तुलनेमध्ये हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या वापरामध्येही उच्चवर्णीयांचे प्रमाण अधिक आहे. स्मार्टफोनवरून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. दलित व आदिवासींच्या तुलनेत उच्चवर्णीयांचा, तसेच महिलांच्या तुलनेत पुरुषांचा स्मार्टफोनचा वापर अधिक आहे. सुशिक्षित शहरी तरुण मतदारांनी सोशल मीडियाचे अवकाश व्यापले आहे. त्याच वेळी कमी शिकलेल्या, तुलनेत वयस्कर, ग्रामीण व महिला मतदारांची सोशल मीडिया वापराबाबतची संख्याही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेली आहे, असे हे सर्वेक्षण सांगत आहे. विशिष्ट मते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात सोशल मीडिया प्रभावी ठरतो आहे. सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्यांच्या तुलनेत तो वापरणाऱ्यांची मते अधिक स्पष्ट आणि तीव्र स्वरूपाची दिसून आल्याचे या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. याशिवाय इतर काही राजकीय मुद्देही या सर्वेक्षणातून समोर आले आहेत; मात्र सध्या हे मुद्दे बाजूला ठेवून माध्यमाचा प्रकार, अर्थात ‘मीडियम’ याच एका मुद्द्यावर आपण भर देत आहोत. 

मॅकलुहान यांच्या ‘मीडियम इज दी मेसेज’ या मूलमंत्राच्या मांडणीनुसार, माध्यमांमधील संदेश नव्हे, तर माध्यमेच मानवी कृती व क्रियांना आकार देण्याचे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत राहतात. माध्यमामधून कोणत्या प्रकारचा संदेश वा अर्थ प्रसारित होत आहे, यापेक्षाही अधिक महत्त्वाचे काय असेल, तर ते म्हणजे त्या माध्यमाचाच प्रकार. इथे आपण बोलत आहोत, ते केवळ ‘सोशल मीडिया’ या माध्यमांच्या विशिष्ट प्रकाराविषयी. या माध्यमप्रकाराचा होणारा वापर, सर्वेक्षणाच्या आधाराने समोर येत असलेले आणि हा माध्यम प्रकार वापरणारे वेगवेगळे गट, सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या काही धारणा (अगदी मर्यादित स्वरूपात) हे सारे आपल्याला काही विशिष्ट मांडणी सांगू पाहत आहे. त्या अनुषंगाने सोशल मीडिया हाच संदेश मानला, तर या संदेशाची उकल ही एक नवी मांडणी ठरेल. कदाचित ती कोणाला उच्चवर्णीयांशी अधिक संबंधित अशी वाटू शकेल किंवा ती कोणाला अधिक सुस्पष्टतेकडे नेणारीही भासू शकेल. सध्या आपण ज्या राजकीय चौकटीमधून या बाबींचा विचार करत आहोत, त्या अनुषंगाने कदाचित ‘सोशल मीडिया वापरणे हेही राजकारण’ ठरू शकेल. राजकारणविषयक चौकटीतून मॅकलुहान यांच्या मांडणीचा विचार करताना, सोशल मीडियामधून पुढे जाणारे राजकीय संदेश वा त्यांचे राजकीय अर्थ, याहीपेक्षा महत्त्वाचे ठरणार आहे ते त्यांचे ‘सोशल मीडिया’पण. सोशल मीडियावरून आपल्यासमोर येणारे राजकीय संदेश, त्यांचे राजकीय अर्थ हे आपल्यासाठी नवे नसतात; मात्र ते सोशल मीडियाच्या आधाराने नावीन्यपूर्ण पद्धतीने आपल्यासमोर आल्याने अधिक रंजक वाटतात. हा तो सगळा खेळ.  

सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडियाचा वापर करणे हेच मुळी एक राजकारण ठरते आहे, ती एक राजकीय कृती ठरते आहे, ती याचमुळे. अगदी वेळप्रसंगी एखादा संदेश प्रसारित करण्यासाठी इतर सर्व माध्यमांना बाजूला सारत, केवळ सोशल मीडिया याच माध्यमप्रकाराची निवड केली जाते. ही कृती होत असताना त्यामध्ये संदेश नव्हे, तर माध्यम म्हणून सोशल मीडिया व्यासपीठांचे वेगळेपण विचारात घेतले जाते. राजकीयदृष्ट्याही तसे करणे वा न करणे हे संबंधित राजकारणाला गती देणारे वा ती गती रोखणारे ठरू शकते. इथेही ‘मीडियम इज दी मेसेज’चा मूलमंत्र तितकाच लागू होतो. वैयक्तिक पातळीवर, तुमची राजकीय मते नेमकी कोणती आहेत, ती कोणत्या बाजूला झुकलेली आहेत, तुम्ही नेमके कोण आहात हे जाहीरपणे सांगण्याची सुविधा फेसबुकसारख्या व्यासपीठांवरून उपलब्ध आहे. आपली स्वतःची इतरांना हवी तशी ओळख तयार करण्याची संधीही या सोशल मीडियाने तुमच्या-आमच्यासमोर आयती आणून ठेवली आहे. यापूर्वी अशी संधी अगदीच नव्हती असे नाही; मात्र त्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटी सध्याच्या तुलनेत कित्येक पट खर्चिकही होत्या नि त्या तितक्याच वेळखाऊही होत्या. बरं, केवळ तेवढेच नाही. तुमची माध्यमकर्मींसोबतची ऊठबस, त्यांच्यासोबतची जवळीक हाही मुद्दा यापूर्वीच्या काळात महत्त्वाचा ठरत असे. आता तसे राहिलेले नाही. सोशल मीडियाच्या वेगळेपणाचा नि त्याच्या वैशिष्ट्यांचा महत्त्वाचा भाग म्हणून आपण सर्वांनीच हे मुद्दे हळूहळू स्वीकारलेही आहेत नि त्याचा आपल्याला हवा तसा वापरही सुरू केला आहे. 

सोशल मीडिया वापरून तुम्ही तुमची राजकीय ओळख स्वतः निर्माण करू शकता, तुम्ही तुमची नसलेली राजकीय मतेही इतरांसमोर तुमचीच राजकीय मते म्हणून मांडू शकता आणि त्या आधारावर तुम्हाला हवा असणारा परिणामही अनुभवू शकता. म्हटले तर तुम्ही एक प्रकारे राजकारण खेळताय किंवा तुम्ही सोयीस्कर पद्धतीने त्यातून बाजूला राहून आजूबाजूच्या गोंधळाची मजा घेताय. कोणत्याही विचारसरणीचा वा पक्षाचा आधार न घेता हे सर्व समोर येत राहिले, तर त्यामध्ये राजकारण आहे, असे कोणी सहसा म्हणणार नाही. सर्वसामान्यांसाठी हे तसे राजकीयदृष्ट्या अराजकीयच ठरेल; मात्र त्याच वेळी मानवी स्वभाव, या स्वभावधर्मानुरूप आपोआप होणारे आणि जाणीवपूर्वक केले जाणारे आचरण वा त्यातील बदल, त्या आधारे निर्माण होणारे नातेसंबंध आणि गोतावळा, जवळच्या-लांबच्या गोतावळ्यानुसार त्यामध्ये संदेशांची होणारी देवाणघेवाण, त्यामधील औपचारिकता-आपुलकी-त्रोटकपणा, अशा सर्व मुद्द्यांच्या आधाराने अगदी एखादा मेसेज कोणाला फॉरवर्ड करायचा आणि कोणाला नाही, काय लाइक करायचे आणि काय शेअर करायचे, याचा घेतला जाणारा निर्णय हे सारे एका व्यापक राजकारणाचाच भाग बनून जाते. त्यासाठी तो मेसेज नव्हे, तर माध्यम म्हणून पुन्हा सोशल मीडियाचाच विचार होतो. पर्यायाने मॅकलुहान बाबांच्या त्या ‘मीडियम इज दी मेसेज’च्या मूलमंत्राचाच आपण विचार करू लागतो. सोशल मीडिया आणि राजकारणाच्या विशेष संदर्भाने ही बाब ‘‘सोशल’ मीडिया हे राजकारणच’ या मुद्द्यावर येऊन थांबते आहे. 

आता राहता राहिला तो मुद्दा म्हणजे आपल्या निवडणुकांसाठीच्या सोशल मीडियाच्या वापराचा आणि त्या आधारे चालणाऱ्या राजकारणाचा. सोशल मीडियाचा वापर हेही राजकारणच आहे, हे व्यवस्थित समजून घेतल्यानंतरच्या टप्प्यावर निवडणुकांसाठी वापरला जाणारा सोशल मीडिया आपण अधिक व्यापकपणे समजून घेऊ शकतो. त्याविषयीचे मुद्दे अधिक चर्चेला येण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियामुळे राजकारणाला मिळालेली गती, तुलनेने कमी खर्चात होणारा वेगवान प्रचार नि म्हटले तर कोणाचेही नियंत्रण नसलेल्या प्रचारयंत्रणांच्या फौजा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्हा पातळीवर निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी एक सोशल मीडियातज्ज्ञ नेमण्याची कृती सरकारी पातळीवरून केली गेली. सोशल मीडियाचे परिणाम गांभीर्याने विचारात घेण्यासाठी म्हणून हे एक सकारात्मक पाऊल ठरते; मात्र या पातळीवर सोशल मीडियाचे वेगळेपण समजून घेऊन निवडणुक कार्यासाठीचे विश्लेषण करू शकतील असे तज्ज्ञ उपलब्ध होणे, ही एक महत्त्वाची गरज ठरणार आहे. अशा तज्ज्ञांमार्फत केवळ राजकीय उमेदवारांच्या अधिकृत सोशल मीडियावरून पुढे येणाऱ्या राजकीय संदेशांचे विश्लेषण होणे, हे एक मर्यादित स्वरूपाचे पाऊल ठरू शकते. सोशल मीडियाची माध्यम म्हणून असणारी वैशिष्ट्ये समजून घेणे, त्याचा राजकीय संदेशांसाठी जाणीवपूर्वक होणारा वापर समजून घेणे, त्यावरून संदेशांची निर्मिती व प्रसारणाचे टप्पे समजून घेणे हे यापुढील काळात निवडणुकांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचे उपयुक्त पर्यायी टप्पे ठरू शकतात. 

पारंपरिक माध्यमांमध्ये उपलब्ध नसलेल्या शेकडो तांत्रिक सुविधा सोशल मीडियाने सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या भोवतीने राजकारण फिरत असताना या सुविधांचा तितक्याच खुबीने वापर होत राहणार, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे राजकारणासाठीचे माध्यम म्हणून सोशल मीडियाचा विचार करताना, या सर्व प्रक्रियांसाठी केवळ निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवरच लक्ष ठेवणे, हे या माध्यमाची ताकद समजून न घेण्याचा प्रकार ठरू शकते. उमेदवारांच्याच जोडीने गरजेनुसार उमेदवारांसाठी म्हणून सोशल मीडिया सांभाळणारे तज्ज्ञ व त्यांचे मित्रमंडळ, अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून त्यासाठी मदत करणारे मार्गदर्शक, पाठीराखे यांच्या सोशल मीडिया वापराच्या प्रकारांचा आढावाही निवडणूक यंत्रणांना या पुढील काळात घ्यावा लागणार आहे. वेळप्रसंगी अशा सर्वांची जबाबदारी निश्चित करण्याची भूमिकाही निवडणूक यंत्रणांना पार पाडावी लागेल. सोशल मीडियाधारित राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये एकीकडे अधिकृत पेजवर आचारसंहितेचे पालन करून प्रचार थांबू शकतो, तर दुसरीकडे भलत्याच कोणत्या तरी पेजवरून प्रचारासाठी सक्रिय राहून निवडणूक यंत्रणांच्या नजरेत धूळफेक केली जाऊ शकते. इंग्रजी स्पेलिंग्ज वापरून अधिकृत पेज तयार करणे व देवनागरीतील नावांच्या मदतीने फॅनक्लब्सची जंत्री सुरू ठेवण्यासारखे प्रकारही याच पंगतीमध्ये जाऊन बसणारे आहेत. सोशल मीडिया हेच राजकारण मानले, तर आपल्याला या माध्यमप्रकाराच्या वैशिष्ट्यांमध्ये शिरणे का गरजेचे ठरते, याची ही अगदी मोजकी कारणे आहेत. सोशल मीडिया वापरणे हेही एक राजकारणच आहे, हे आपल्याला व्यापक अर्थाने समजून घ्यावे लागणार आहे, हेच यातून अधोरेखित होत राहील.  

- योगेश बोराटे
ई-मेल : borateys@gmail.com

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात सहायक प्राध्यापक आहेत.) 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप


(योगेश बोराटे यांचे ‘सोशल मीडिया’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search