Next
म्हैसूरची सफर – भाग १
BOI
Wednesday, September 26, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

म्हैसूर पॅलेस
‘करू या देशाटन’ सदरात आपण सध्या कर्नाटक राज्यातील पर्यटनस्थळांची सफर करतो आहोत. म्हैसूर जिल्ह्यात अनेक उत्तम पर्यटनस्थळे आहेत. त्या सर्व स्थळांची माहिती एका भागात घेणे शक्य नाही. त्यामुळेच म्हैसूरवरच्या आजच्या पहिल्या भागात घेऊ या काही पर्यटनस्थळांची माहिती...
...........
पौराणिक पार्श्वभूमी असलेले म्हैसूर दैत्य महिषासुराच्या नावावरून ओळखले जाते. पुराणातील कथेप्रमाणे, महिषासुराचे वडील असुरांचे राजे होते. त्यांचे एक म्हशीवर प्रेम होते. त्यातूनच महिषासुराचा जन्म झाला. (महिषा म्हणजे म्हैस.) त्यामुळे त्याला पाहिजे, तेव्हा म्हैस किंवा माणसाचे रूप धारण करता येत असे. तो ब्रह्माचा भक्त होता व त्याला देव-दानव यापैकी कोणीही मारू शकणार नाही, असा वर ब्रह्माकडून मिळाला होता. त्यामुळे तो उन्मत्त झाला व सर्वांना त्रास देऊ लागला. अखेर दुर्गादेवीने नऊ दिवस त्याच्याबरोबर युद्ध करून त्याला दहाव्या दिवशी ठार केले. तेव्हापासून दसरा साजरा होऊ लागला व देवीला महिषासुरमर्दिनी हे नाव प्राप्त झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

ऐतिहासिक महत्त्व :
साधारण इ. स. पू. ३२७पासून म्हैसूर परिसरात सातवाहन राजांचे राज्य होते. हे राजे सातकर्णी म्हणूनही ओळखले जात. त्यानंतर कदंब, त्यानंतर कांचीचे पल्लव, इक्ष्वाकु, तर इ. स. ५००मध्ये चालुक्य, इ. स. ८००मध्ये राष्ट्रकूट, काही काळ गंग राजे, इ. स १००४मध्ये चोल, त्यानंतर १३९९मध्ये यादव (वाडियार) अशा अनेक राजवटी या भागाने पाहिल्या.

म्हैसूर पॅलेस
म्हैसूर पॅलेसमधील काही रेकॉर्डस्, ताम्रपट, कानडी व पर्शियन भाषेतील उल्लेख यांनुसार या राज्याची स्थापना यदुराय आणि कृष्णराय या दोन भावांनी इ. स. १३९९मध्ये केली. हे दोघेही श्रीकृष्णाच्या यादव कुळातील होते. द्वारकेच्या यदुवंशातील (यादव) यदुराय व कृष्णराय हे द्वारकेहून म्हैसूरजवळील मेलकोटे (यादवगिरी) येथे देवदर्शनाला आले होते. दर्शन घेऊन ते म्हैसूरजवळील दोड्डाकेरे तलावाजवळील कोडी भैरवेश्वर मंदिरात मुक्कामाला आले. नुकतेच निधन झालेल्या राजा चामराज यांची मुलगी चिक्कादेवरसी आणि पत्नी या दोघी, करुगहल्लीच्या नायकाच्या त्रासाला कंटाळून तलावाजवळ आल्या होत्या. तेथे तलावाजवळ त्यांची यदुराय व कृष्णराय यांच्याशी गाठ पडली. त्या दोघींनी त्यांच्यावर आलेल्या संकटाची त्यांना कल्पना दिली. त्या दोघांनी आक्रमकांना ठार मारले. त्यानंतर यदुरायने राजकुमारी चिक्कादेवरसी हिच्याशी विवाह केला. तेव्हापासून त्यांनी वाडियार (मालक किंवा देव) ही पदवी धारण केली. वाडियार यांचा विजयनगरचे राजे अच्युत देव राय यांच्या काळापासून (इ. स. १५४९) कन्नड साहित्यात उल्लेख आढळतो.

हे राज्य मध्यंतरीच्या काही काळासाठी विजयनगरच्या आधिपत्याखाली होते; पण विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यावर इ. स. १५६६ ते इ. स. १७९९पर्यंत वाडियार राजांची सत्ता येथे होती. इ. स. १६३८ ते इ. स. १६५९ या कालावधीत कंठीरवा नरसा राजा याने तमिळनाडूतील त्रिचनापल्लीपर्यंत राज्यविस्तार केला. चिक्कदेवराज याच्या कारकिर्दीत राज्य खूप प्रभावी होते. त्याने राज्यामध्ये महसुली करआकारणीमध्ये सुसूत्रता आणली. इ. स. १७९९नंतर ब्रिटिश अमलाखाली वाडियार राजे राजेपदावर राहिले. इ. स. १७६१ ते इ. स. १७९९ या कालावधीमध्ये हैदर हा वाडियार यांचा वजीर म्हणून सर्व कारभार पाहत असे. त्याच्या पश्चात टिपू सुलतान सत्ताधीश होता. १७९९नंतर ब्रिटिश अंमल सुरू झाला तो इ. स. १९४७पर्यंत. या काळात वाडियार राजांनी म्हैसूरचा कायापालट केला.

आता म्हैसूरमधील प्रसिद्ध ठिकाणे पाहू या.

चामुंडेश्वरी मंदिर
चामुंडेश्वरी मंदिर टेकडी/नंदी हिल : चामुंडेश्वरी मंदिर टेकडी म्हैसूरपासून १३ किलोमीटरवर आहे. चामुंडी हिल समुद्रसपाटीपासून सुमारे १०६५ मीटर उंचावर आहे. येथे शक्यतो सकाळी किंवा खासकरून संध्याकाळी जावे. तिथून म्हैसूरचे सुंदर विहंगम दृश्य पाहता येते. चामुंडेश्वरी मंदिर हे मूळ ११व्या शतकात बांधले गेले. १८२७मध्ये कृष्णराजा वाडियार यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवळाच्या समोर असलेला महिषासुराचा उंच पुतळा हे येथील आकर्षण. सात मजली गोपुर असून, द्रविड शैलीतील या मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती सोन्याची आहे. मंदिराच्या मागील बाजूचे महाबळेश्वराचे मंदिर एक हजार वर्षांपूर्वीचे आहे. मंदिर वाटेवरून येताना काही अंतरावर १५ फूट उंच व २४ फूट रुंदीचा ग्रॅनाइटचा भव्य नंदी आहे. या टेकडीला नंदी हिल म्हणूनही ओळखले जाते. देवराज वाडियार यांनी ३५० वर्षांपूर्वी हा नंदी करवून घेतला. तसेच मंदिरापर्यंत एक हजार पायऱ्याही बांधून घेतल्या.

अंबाविलास पॅलेस (म्हैसूर पॅलेस), जयलक्ष्मीविलास पॅलेस, ललितामहल पॅलेस, जगन्मोहन पॅलेस, राजेंद्रविलास पॅलेस आणि कारंजी मॅन्शन असे एकूण सात पॅलेस आहेत.

अंबाविलास पॅलेस (म्हैसूर पॅलेस),
म्हैसूर पॅलेस : म्हैसूर पॅलेस किंवा अंबाविलास पॅलेस हे म्हैसूरमधील मुख्य आकर्षण. मिर्झा रोडवर हा महाल असून, मुख्य परिसर २४५ फूट लांबी आणि १५६ फूट रुंदीचा आहे. अंबाविलास महाल १८२४मध्ये बांधण्यात आला. हे वाडियार राजघराण्याचे शाही निवास्थान आहे. ध्वनिप्रकाश योजना (साउंड अँड म्युझिक), तसेच दसरा उत्सव हे येथील मुख्य वैशिष्ट्य. कोणत्याही अग्नीपासून बचाव करण्यासाठी राजवाड्याच्या सर्व भागांमध्ये अग्निशामक यंत्रे आहेत. राजवाड्याला तीन दरवाजे आहेत. त्यातील पूर्व दरवाज्यातून फक्त मान्यवर व्यक्तींना प्रवेश असे. दक्षिण दरवाजा सर्वांसाठी, तर पश्चिम दरवाजा दसऱ्याला उघडला जात असे. या जागी प्रथम राजा यदुराय याने इ. स. १४००मध्ये प्रथम राजवाडा उभारला. त्यात अनेक वेळा नव्याने बांधकामे झाली. १८९६पूर्वी असलेला लाकडी वाडा भस्मसात झाल्यावर १९१२मध्ये ब्रिटिश आर्किटेक्ट हेन्री इर्विन यांनी सध्याचा पॅलेस पूर्ण उभारला. हिंदू, मुघल, राजपूत आणि गॉथिक शैलीचे मिश्रणअसलेला हा तीन मजली, संगमरावरचा डोम असलेला महाल आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर ‘न बिभेति कदाचन’ (घाबरू नका) हे राज्याचे बोधवाक्य लिहिले आहे. मध्य कमानीवर गजान्त लक्ष्मीचे शिल्प आहे.

कल्याण मंडप

कल्याण मंडप : हा एक अष्टकोनी महाल असून, स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे तयार केलेले काचेचे छत त्यासाठी वापरण्यात आले आहे. मोराचे डिझाइन असलेल्या मोझॅक टाइल्स जमिनीवर घातल्या आहेत. शाही दरबार व मिरवणुकीची तैलचित्रे भिंतीवर चितारली आहेत.

सुवर्ण सिंहासनसुवर्ण सिंहासन : फक्त दसऱ्याच्या दिवशी हे सिंहासन सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात येते. या सिंहासनाबद्दल असलेल्या दंतकथेनुसार, हे पांडवकालीन आहे. धर्मराजाचे हे सिंहासन कपिलाचार्य यांनी आंध्र प्रदेशातील पेनुकोंडा येथे आणले, असे मानले जाते. स्वामी विद्यारण्य यांच्या सल्ल्याने राजा हरिहर याने याचा शोध घेतला व विजयनगरच्या अस्तापर्यंत ते त्यांच्या ताब्यात होते. १६०९मध्ये ते विजयनगरचा सरदार श्रीरंगराय याच्याकडे आले. ते त्याने वाडियार राजांच्या ताब्यात दिले. ते आजतागायत त्यांच्या ताब्यात आहे. सिंहासन अंजिराच्या झाडापासून बनवले गेले आहे आणि हस्तिदंती पट्ट्यांसह सजविलेले आहे. मुख्य आसनावर सोन्याची छत्री आहे. सोने, चांदी, मौल्यवान पाचू यांनी ते मढविलेले आहे. त्यावर अनेक प्रकारचे पक्षी, वाघ, सिंह, फुलाची नक्षी कोरलेली आहे. दौड मारण्याच्या स्थितीतील घोड्यांनी सिंहासनाला आधार दिलेला आहे.

Mh. HIMMAT BAHADDUR SHRIMANT JEETENDRASINGH G Gaekwad of Baroda State & His HIGHNESS Shree Yaduveera Krushna Dutt CHAMRAJENDRA Wodeyar, 27th Maharaja of Mysore.जगन्मोहन पॅलेस : या पॅलेसची निर्मिती १८६१मध्ये राजा कृष्णराज वाडियार तिसरे यांनी शाही कुटुंबासाठी एक वैकल्पिक व्यवस्था म्हणून केली. म्हैसूर पॅलेस (अंबामहाल) १८९७मध्ये भस्मसात झाल्यामुळे राजांचे कुटुंब जगन्मोहन पॅलेसमध्ये राहायला आले. १९०२मध्ये महाराजा कृष्णराज वाडियार यांचा राज्याभिषेक जगन्मोहन पॅलेसमध्ये करण्यात आला. त्या वेळी व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन उपस्थित होते. १९१५मध्ये महालाचे एका आर्ट गॅलरीमध्ये रूपांतरित करण्यात आले. १९५५मध्ये त्याचे नाव श्री जयचमराजेंद्र आर्ट गॅलरी असे करण्यात आले.

जगन्मोहन पॅलेस
जगन्मोहन पॅलेस पारंपरिक हिंदू शैलीत बांधलेला असून, तो तीन मजली आहे. यातील भिंती नैसर्गिक रंगांनी रंगविलेल्या आहेत. दरबाराची, तसेच स्वारीची चित्रेही येथे भिंतीवर काढण्यात आली आहेत. वाडियार राजांचा वंशविस्तार दाखविणारा तक्ताही येथे आहे. दक्षिण भारतातील हे मोठे संग्रहालय आहे. येथे सुमारे दोन हजारांहून अधिक चित्रे आहेत.

‘लेडी विथ दी लॅम्प’राजा रविवर्मा यांनी काढलेली महाभारत व रामायणातील प्रसंगांची १६ सुंदर चित्रे फक्त येथेच पाहायला मिळतात. सावंतवाडीचे सावळाराम हळदणकर यांचे ‘लेडी विथ दी लॅम्प’ हे प्रसिद्ध चित्रही येथेच आहे. रवींद्रनाथ टागोर यांची चित्रेही येथे आहेत. निकोलाय रोरीच, स्वेतोस्लाव रोरिच, अबनींद्रनाथ टागोर, तसेच उकील बंधूपैकी - शरदा उकील, रानदा उकील आणि बरदा उकील यांनी चितारलेली सुंदर चित्रे येथे पाहण्यास मिळतात. टिपू सुलतान विरुद्ध ब्रिटिश सैन्याच्या लढाईचे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने काढलेले एकमेव चित्रही येथेच आहे. चित्रकलेच्या दालनाव्यतिरिक्त जुनी नाणी, देवदेवतांच्या धातूच्या मूर्ती, शस्त्रास्त्रे यांचा मोठा संग्रहही येथे आहे. केवळ भिंगाद्वारे पाहिले जाऊ शकते, असे तांदळाच्या दाण्यावर बनविलेले चित्र येथे आहे. तसेच लघुपटाद्वारे येथे काही देखावे सादर केले जातात. जगन्मोहन सांग्रहालयात एक सभागृहही आहे. तिथे नृत्य, नाटक, संगीताचे कार्यक्रम होत असतात.

जयलक्ष्मी विलास हवेलीजयलक्ष्मी विलास हवेली : ही हवेली सहा एकर परिसरामध्ये विस्तारलेली आहे. म्हैसूर विद्यापीठ परिसरात ही इमारत असून, कृष्णराज वाडियार चतुर्थ यांच्या काळामध्ये १९०५मध्ये बांधण्यात आली. येथे दुर्मीळ वस्तूंचे संग्रहालय आहे.


ललिता महाल
ललिता महाल : हा म्हैसूरमधील दुसरा मोठा महाल आहे. म्हैसूर शहराच्या पूर्वेकडील चामुंडी हिल्सजवळ तो आहे. १९२१मध्ये महर्षी कृष्णराज वाडियार चौथे यांनी भारताच्या तत्कालीन व्हाइसरॉयच्या खास निवासस्थानासाठी हा महाल बांधला. लंडनमधील सेंट पॉल कॅथेड्रलच्या धर्तीवर याची बांधणी आहे. १९७४ साली याचे हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले. सध्या येथे ‘आयटीडीसी’चे पंचतारांकित हॉटेल आहे.

कारंजी मॅन्शनकारंजी मॅन्शन : महाराजा चामराजा वाडियार यांनी नझरबाद मोहल्ला भागात त्यांच्या तीन मुलींसाठी हा महाल बांधला. याच्याभोवती बगीचे आहेत. उत्कृष्ट कारागीरांनी हे बगीचे आकर्षकपणे साकारले आहेत. खोल्या मोठ्या आहेत आणि त्यांच्या सभोवती असलेल्या बागांची काळजी घेतली जाते. येथे सध्या टपाल खात्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच पोस्टाचा इतिहास दर्शविणारे एक छोटे संग्रहालयही आहे.

राजेंद्र विलास महाल
राजेंद्र विलास महाल : हा महाल एक हजार फूट उंचीवर चामुंडी टेकडीच्या वर बांधलेला आहे. म्हैसूरच्या राजांचे ते उन्हाळी हंगामातील वसतिस्थान होते. कृष्णराज वाडियार चतुर्थ यांनी हा महाल राजस्थानी शैलीत बांधला. सध्या येथे हॉटेल आहे.

सेंट बर्थोलोम चर्चसेंट बर्थोलोम चर्च : हे म्हैसूरमधील सर्वांत जुने चर्च आहे. म्हैसूरचे महाराज कृष्णराज वाडियार तिसरे यांनी दान केलेल्या जमिनीवर ते बांधले गेले. म्हैसूर येथील ब्रिटिश आणि युरोपियन अधिकाऱ्यांच्या ख्रिश्चन मंडळींसाठी त्याची स्थापना करण्यात आली. आर्थर हेन्री कोल यांनी चर्चच्या बांधकामासाठी म्हैसूरच्या महाराजाचा पाठिंबा मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सेंट फिलोमेना चर्च
सेंट फिलोमेना चर्च : सेंट फिलोमेनाच्या स्मृतीप्रीत्यर्थ आशियातील दुसरे सर्वांत मोठे चर्च उभारले गेले. सेंट फिलोमेना ही चौथ्या शतकातील संतपदी गेलेली १४ वर्षांची मुलगी होती. १९३३मध्ये राजा श्री कृष्ण राजेंद्र वाडियार बहादुर चतुर्थ यांनी हे चर्चल निओ गोथिक शैलीत बांधले. सेंट जोसेफ कॅथेड्रल म्हणूनही हे चर्च ओळखले जाते. याची रचना फ्रेंच आर्किटेक्ट डॅले याने केली होती. चर्चची उंची १७५ फूट उंच आहे. त्यात ८०० भाविक बसू शकतात

शुक वनशुक वन : हे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंदलेले पक्षी अभयारण्य आहे. इथे ४००हून अधिक प्रजातींचे पक्षी आहेत. या उद्यानाला तोते पार्क किंवा शुक वन म्हटले जाते. कारण येथे अनेक जातीचे तोते (पोपट/राघू) आहेत.

बोन्साय बागबोन्साय बाग : किष्किंधा मोलिका बोन्साय बाग या अनोख्या बागेत बोन्साय केलेल्या सुमारे १०० जातींची झाडे आहेत. या बागेत बुद्ध मूर्ती आहेत. येथे माकडेही आढळतात. हे उद्यान श्री गणपती सच्चिदानंद आश्रमाचा एक भाग आहे. या बागेतील विविध प्रकारचे लहान वृक्ष पाहृण्यास मजा येते. डिसेंबर महिन्यामध्ये बोन्साय प्रदर्शने आयोजित केली जातात.

म्हैसूर झूम्हैसूर झू : १८९२ मध्ये महाराजा चामराजा वाडियार यांनी श्री चमराजेंद्र प्राणी उद्यान म्हणजेच म्हैसूर झूची स्थापना केली. १५७ एकराच्या परिसरात पसरलेले हे प्राणिसंग्रहालय म्हैसूर पॅलेसजवळ आहे. प्राणिसंग्रहालयात १६८ प्रकारचे वन्यजीव, सरपटणारे प्राणी, पक्षी आहेत. भाकड झालेल्या प्राण्यांसाठी प्राणिसंग्रहालयामध्ये एक निवारा देखील आहे.

रेल्वे संग्रहालय

रेल्वे संग्रहालय : रेल्वे संग्रहालयाची स्थापना १९७९ साली करण्यात आली. हे संग्रहालय कृष्णराज सागर रोडवरील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या समोरच्या बाजूला आहे. भारतात रेल्वे सुरू झाल्यापासूनची अनेक प्रकारची इंजिन्स, कोच, सिग्नल व्यवस्था येथे पाहायला मिळते. येथे भारतातील लोकोमोटिव्हच्या छायाचित्रांची एक गॅलरी आहे. रेलकार हे येथील एक आकर्षण आहे. ही १९२५ सालची कार असून, ती भंगारात दिली होती. एका कर्मचाऱ्याने ती परत आणून दुरस्त करून रेल्वे रुळांवर ठेवली. ही गाडी ट्रॅकच्या निरीक्षणासाठी वापरली जाई. त्यावर सहा अधिकारी बसून जात असत. संग्रहालयात लहान मुलांसाठी टॉय ट्रेनही आहे.

म्हैसूर दसरा उत्सवम्हैसूर दसरा उत्सव : गेले ४०८ वर्षे येथे दसरा उत्सव साजरा होतो. सजविलेल्या हत्तींची मिरवणूक हे खास वैशिष्ट्य. देवदेवतांसह, तलवार, शस्त्रे, हत्ती, घोडे इत्यादींची पूजा केली जाते. नवरात्रौत्सवामध्ये दुर्गेची पूजा होते व दहाव्या दिवशी याचा समारोप होतो.

चंदन तेल कारखानाचंदन तेल कारखाना : पूर्वी येथे कच्चे चंदनाचे तेल निर्माण केले जायचे व जर्मनीत त्याचे शुद्धीकरण करून युरोपात विकले जायचे. १९१४मध्ये दुसऱ्या महायुद्धात या उद्योगाचे नुकसान होऊ लागले. १९१६मध्ये त्यांनी म्हैसूर राजा कृष्णराज वाडियार आणि दिवाण सर एम. विश्वेश्वरय्या यांनी सँडलवूड ऑइल फॅक्टरीची स्थापना केली. या गोष्टीला १०२ वर्षे होत आहेत. नैसर्गिक चंदनाच्या तेलाचे सर्वोत्तम उत्पादन तयार करण्याचे ठरविण्यात आले. चंदनाच्या लाकडावर नक्षीकाम केले जाते, सुगंधी तेल केले जाते, उदबत्त्या तयार केल्या जातात. सुगंधी लाकूडदेखील त्याच्या मूळ स्वरूपात विकले जाते. म्हैसूरच्या आसपास चंदनाचे ८० हजारांहून अधिक वृक्ष आहेत. त्यामुळे चंदन व त्यावर आधारित अनेक उत्पादने घेतली जातात.

म्हैसूर रेशीम उद्योगम्हैसूर रेशीम उद्योग : कृष्णराज वाडियार यांनी १९१२मध्ये रेशीम कारखान्याची सुरुवात केली. कृत्रिम रेशीम, रेयॉन यांच्या स्पर्धेमुळे काही काळ व्यवसायावर मंदीचे सावट होते; पण दर्जा चांगला राखण्यात सातत्य असल्याने रेशीम उद्योग वाढीला लागला. भारतातील ४५ टक्के रेशीम उत्पादन या भागात घेतले जाते. भारतात तयार होणाऱ्या वीस हजार टन रेशमापैकी नऊ हजार टन रेशीम येथे तयार होते. येथील कारखान्यात अनेक प्रकारच्या साड्या व धोतरे बनविली जातात. सरकारी कारखाना व शॉप असल्याने फसवणूक होत नाही.

Mh. HIMMAT BAHADDUR SHRIMANT JEETENDRASINGH G Gaekwad of Baroda Stateकसे जायचे?
म्हैसूर हे ठिकाण रेल्वे, विमान, तसेच हमरस्त्याने भारताच्या सर्व भागांशी जोडलेले आहे. राहण्यासाठी सर्व स्तरांतील हॉटेल्स उपलब्ध आहेत. तसेच जेवणही चांगल्या प्रकारचे मिळते. म्हैसूरहून उटी, मडिकेरी, हळेबिडू, बेंगळुरू दर्शन करता येते.

(या लेखासाठी माझे स्नेही, बडोद्याचे हिंमतबहाद्दूर जितेंद्रसिंहजीराजे गायकवाड यांनी बरीच माहिती व छायाचित्रे उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे आभार. म्हैसूरमधील आणखी काही ठिकाणांची माहिती पुढील भागात घेऊ.) 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

सात पॅलेस

( म्हैसूरची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search