Next
मुलाखतकाराची मुलाखत...
BOI
Tuesday, June 05, 2018 | 04:37 PM
15 0 0
Share this article:

नामवंत मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतींचा आकडा जुलै २०१८मध्ये चार हजारांवर पोहोचणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांना आपल्या खास शैलीच्या आणि अभ्यासपूर्ण प्रश्नांतून बोलते करणारे गाडगीळ नुकतेच स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी आरती आवटी यांनी खास ‘बाइट्स ऑफ इंडिया’साठी घेतलेली या मुलाखतकाराची ही मुलाखत...
...........
प्रश्न : नमस्कार सुधीरजी, तुमच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्यातील पहिला प्रश्न अगदी सगळ्यांच्याच मनातला असा आहे. या क्षेत्रात यायचं तुम्ही कसं ठरवलं? अपघातानं आलात, की अगदी जाणीवपूर्वक हे क्षेत्र निवडलंत?
गाडगीळ : अगदी जाणीवपूर्वक आलो. मी कॉस्टिंगचा विद्यार्थी आहे; पण कॉस्टिंग करून कुठल्या तरी बँकेत किंवा एखाद्या कंपनीच्या आर्थिक विभागात जाण्यापेक्षा पत्रकारिता, निवेदन, मुलाखत याच्यातून अधिकाधिक आणि हरतऱ्हेची माणसं भेटतील, असं वाटलं. माणसाना भेटणं आणि गप्पा मारणं हा माझ्या आवडीचा भाग असल्यानं ठरवून या क्षेत्रात आलो. 

प्रश्न : तुम्ही अनेक दिग्गजांना भेटलात. देशातील अनेक नामांकित व्यक्तिमत्त्वांचा तुम्हाला जवळून सहवास लाभला. त्यापैकी तुम्हाला सर्वांत भावलेली अशी व्यक्ती कोण?
गाडगीळ : मनापासून मला भावलेली व्यक्ती म्हणजे आशा भोसले. त्याचं कारण म्हणजे त्या नावाप्रमाणे सतत आशावादी, समोरच्याला नवी उमेद देणाऱ्या आणि त्यांच्यात उत्साह निर्माण करणाऱ्या अशा आहेत.

प्रश्न : त्यांच्याबद्दलची एखादी विशेष गोष्ट सांगाल का? 
गाडगीळ : माझ्या कार्यक्रमात मी आशाताईंबद्दल बरंच काही सांगतो; त्यातलीच एक छोटी गोष्ट सांगतो. आज आशाताईंचं वय आहे ८५ वर्षं; पण या वयातही आणि संगीत क्षेत्रात इतक्या व्यग्र असूनही सात देशांत सुरू केलेल्या आपल्या रेस्तराँचा कारभार स्वतः तिथे जाऊन बघतात. ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, असं मला वाटतं.

प्रश्न : निवेदक, सूत्रसंचालक, पत्रकार, मुलाखतकार या सगळ्याच भूमिका तुम्ही यशस्वीपणे निभावल्या आहेत; पण यातली कोणती भूमिका तुम्हाला अधिक आवडते?
गाडगीळ : मुलाखतकार.

प्रश्न : त्याचं काही विशेष कारण?
गाडगीळ : मुलाखतीच्या माध्यमातून मला अगदी अनोळखी माणसांपासून ते नामवंतांपर्यंत सगळ्यांना बोलतं करता येतं आणि अनेकविध व्यक्तिमत्त्वं जाणून घेण्याची संधी मिळते. 

प्रश्न : समोरच्याला बोलतं करण्याची कला तुमच्याकडे उपजतच होती, की त्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले? 
गाडगीळ : बोलण येत होतंच. ते नेमकं, नेटकं, उत्स्फूर्त आणि शिस्तबद्ध असावं आणि दिसावं, यासाठी मात्र प्रयत्न करावा लागला आणि तो मनापासून केला. 

प्रश्न : या संपूर्ण प्रवासात कुणाची मुलाखत घेताना तुम्हाला जास्त मजा आली किंवा शाब्दिक खेळ जास्त रंगले, असं म्हणता येईल?
गाडगीळ : नाना पाटेकर आणि शंतनुराव किर्लोस्कर यांच्या मुलाखती खास रंगल्या. 

प्रश्न : ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची इच्छा तुम्हाला इच्छा आहे; पण काही कारणाने तो योग आजपर्यंत आलेलाच नाही, अशी व्यक्ती कोण?
गाडगीळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांची मुलाखत घ्यायची मनापासून इच्छा आहे. बघू या कधी पूर्ण होते ते.

प्रश्न : बऱ्याच वेळा आम्ही असं बघितलं आहे, की मुलाखतीदरम्यान शब्दांचा खेळ करून तुम्ही समोरच्याला अडचणीत आणता. तुम्हाला असं कोणी अडचणीत टाकलं आहे का?
गाडगीळ : पु. ल. देशपांडे. मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेत मी एका कार्यक्रमाचे निवेदन करत होतो. तेवढ्यात प्रख्यात भावगीत गायिका माणिक वर्मा यांना घेऊन ‘पुलं’ समोरून आले. माणिक वर्मा या पूर्वीच्या माणिक दादरकर. त्यांनी अमर वर्मा यांच्याशी तेव्हा नुकतंच लग्न केलं होतं. ‘पुलं’ समोरून येतायेताच म्हणाले, ‘सुधीर, एवढ्या दिग्गज गायिकेला घेऊन आलो आहे. चल तिची मुलाखत घे.’ मुलाखतीची तयारी कायमच किमान २४ तास तरी करावी लागते. दिसेल ते पुस्तक, भेटेल तो माणूस, त्यातून मिळेल ती माहिती मनामध्ये साठवून, सगळे संदर्भ डोक्यात ठेवून, फक्त सुरुवात काय करायची, हे मनाशी पक्कं ठरवून मुलाखत घ्यायला बसायचं असतं. त्या दिवशी तर माणिक वर्मा रंगमंचाचा जिना चढून वर येईपर्यंतचा वेळच फक्त माझ्या हातात होता. अवघी दोन मिनिटं. तेवढ्यात मी विचार केला आणि एक गमतीशीर प्रश्न विचारला, ‘माणिकताई, माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कोणतं भावगीत उपयोगी पडलं?’ त्यावर पटकन ‘पुलं’नीच उत्तर दिलं, ‘अरे तिच्या वर्मावर कशाला घाला घालतोस!’ 

प्रश्न : तुम्ही मुलाखतकार झाला नसतात, तर काय व्हायला आवडलं असतं?
गाडगीळ : ‘कम्युनिकेशन’ या विषयाचा प्राध्यापक. अर्थात, मी आताही हा विषय शिकवतोच. अविनाश धर्माधिकारींच्या ‘चाणक्य’मध्ये मी ‘कम्युनिकेशन’ हा विषय शिकवतो. त्याचप्रमाणे ‘मुलाखतीचे तंत्र’ आणि ‘निवेदन कौशल्य’ या विषयांवर माझ्या स्वतःच्या कार्यशाळाही असतात. तिथंही शिकवतो. या कार्यशाळा पुणे आणि पुण्याव्यतिरिक्त जगाच्या पाठीवर सर्वत्र करण्याची माझी तयारी असते.

प्रश्न : गेली अनेक वर्षं तुमचा दिनक्रम अत्यंत व्यग्र आहे. तरीही कधीतरी थोडासा रिकामा वेळ मिळत असेल, तेव्हा काय करायला आवडतं? 
गाडगीळ : वाचन, उत्तम शास्त्रीय संगीत ऐकणं आणि मूड असलाच तर चित्रांची रेखाटनं काढणं. हे फारसं कुणाला माहिती नाही; पण सुभाष अवचटांमुळे मला ही रेखाटनाची गोडी निर्माण झाली. शास्त्रीय संगीतात माझे आवडते गायक म्हणाल, तर पंडित भीमसेन जोशी आणि चित्रपट संगीतात किशोरकुमार, लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी ऐकायला मला आवडतात.

प्रश्न : तुम्ही ज्या वेळी या क्षेत्रात आलात, त्यापेक्षा सध्या या क्षेत्राचं स्वरूप खूप बदललं आहे. दर्जात फरक पडला आहे. या पार्श्वभूमीवर, या क्षेत्रात नव्यानं येणाऱ्यांना काय सांगाल? 
गाडगीळ : आज मार्केटिंगचं महत्त्व खूप वाढलं आहे आणि ते वाढतच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय येतंय किंवा तुम्हाला काय म्हणायचंय किंवा समोरच्याकडून तुम्हाला काय हवंय, हे नेमकं साधण्याकरिता, तुम्ही या क्षेत्रात या किंवा येऊ नका, संवादाचं कौशल्य, उत्तम बोलता येणं प्रत्येकासाठीच आवश्यक झालं आहे. ते करताना एकच पथ्य पाळा - साधं बोला, सोपं बोला, नेमकं बोला आणि पूर्ण तयारीनिशी बोला. जे बोलणार आहात, त्याची स्वच्छ कल्पना मनात तयार ठेवा आणि त्याच्या आधारे बोला. 

- ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या वाचकांतर्फे आपले आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
- धन्यवाद!

(मे २०१८मध्ये झुरिक येथे ‘इंडो-स्विस सेंटर’तर्फे सुधीर गाडगीळ यांचा ‘मुलखावेगळी माणसं’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ आरती आवटी यांच्या सौजन्याने ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search