Next
रमणीय रत्नागिरी जिल्हा – भाग दोन
BOI
Wednesday, May 22, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गणपतीपुळे मार्गावरील एक किनारा

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण रत्नागिरी शहरातील काही पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या रत्नागिरी जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांची...
.........
कोकणातून अनेक लोक पोटापाण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर आणि अगदी अलीकडच्या काळात अमेरिका, इंग्लंड येथेही स्थायिक झाले आहेत. या सर्व मंडळीना गावाची ओढ असतेच. कोकणातील नारळ, गूळ आणि तांदळाचे पीठ वापरून तयार होत असलेला मोदक सर्वत्र प्रसिद्ध झाला असून, रोजगाराचे साधनही झाला आहे. निर्मनुष्य असलेले सागरकिनारे पर्यटकांनी फुलून जात आहेत. कोकणातील प्रदूषणमुक्त वातावरण, सदाहरित वृक्षांनी आच्छादलेला निसर्ग. यामुळे पर्यटकांच्या गाड्या दर वर्षी नव्या समुद्रकिनाऱ्याकडे वळतात. प्रागैतिहासिक संस्कृतीच्या खुणा दाखविणारी अनेक ठिकाणे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आली आहेत. त्यावर संशोधन चालू आहे. अशा या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणांची माहिती घेऊ या.

गणपतीपुळे मंदिरगणपतीपुळे : स्वयंभू व जागृत म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र गणपतीपुळे हे सर्वच गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथील श्री गणपतीची मूर्ती स्वयंभू स्वरूपात आहे. विलोभनीय निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या पायथ्याशी असलेले सुंदर मंदिर पाहून मनात भक्ती व आनंदाच्या लाटा उसळल्याशिवाय राहत नाहीत. पश्चिमेला निळाशार समुद्र, मागे हिरवागार पर्वत या दोन्हींच्या मध्यभागी शुभ्र वाळूवर लाल-पांढऱ्या रंगातील हे सुंदर मंदिर दिमाखात उभे आहे. या मंदिराची मूळ स्थापना ३०० ते ४०० वर्षांपूर्वी बाळंभटजी भिडे यांनी केली. मंदिरासमोरचा नंदादीप श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी उभारला, तर नगारखान्याची व्यवस्था चिमाजीअप्पा यांनी केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांनी येथे दगडी धर्मशाळा उभारली, असे उल्लेख इतिहासात आढळून येतात. 

१९९१मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी गणपतीपुळे विकास आराखडा तयार केला. त्यानुसार रस्ते आणि मंदिर नव्याने बांधले गेले. अंगारकी, संकष्टी आणि माघ महिन्यातील चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. दर वर्षी फेब्रुवारी आणि नोव्हेंबर या महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात किरणोत्सव होतो. त्या वेळी मावळतीच्या सूर्याची सोनेरी किरणे मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजातून श्री गणेशावर पडतात. 

सगळ्यात आनंद होतो तो प्रदक्षिणा घालताना. निसर्गाच्या सान्निध्यात गर्द झाडीतून सुमारे एक किलोमीटर लांबीची प्रदक्षिणा कशी संपते ते कळतच नाही. प्रदक्षिणामार्ग संपूर्णपणे डोंगरातून, जांभ्या दगडातून बांधून काढलेला असून, चढण अजिबात जाणवत नाही. प्रदक्षिणामार्ग पश्चिमेकडून दक्षिणेकडे नंतर पूर्वेकडे नंतर दक्षिणेकडे वळतो. तेथून परत पश्चिमेला वळताच उतरण चालू होत असतानाच समोर सागराचे दर्शन होते व शीण कुठल्याकुठे निघून जातो. 

महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारे ‘प्राचीन कोकण’ हे कोकणाचे मूळ रूप दाखविणारे संग्रहालय मंदिरापासून एक किलोमीटरवर आहे. ग्रामीण कलाकारांनी केलेल्या बांबू व लाकडाच्या वस्तू येथे विक्रीला ठेवलेल्या असतात. पूर्वीचे कोकणातील राहणीमान कसे होते हे आवर्जून बघण्यासाठी या संग्रहालयाला भेट द्यावी. गणपतीपुळे येथे घरगुती स्वरूपात जेवण व खास करून मोदक देणारी घरगुती निवासव्यवस्था आहे. तसेच मध्यम त पंचतारांकित हॉटेल्सही आहेत. काजू, फणसपोळी, आंब्याची साटे, आवळा, कोकम, तसेच विविध सरबते, लोणची, पापड, मसाले येथे सहज उपलब्ध होतात. 

आरे-वारे : रत्नागिरीहून गणपतीपुळ्याला जाताना आरे-वारे येथे किनारे असून येथेही पर्यटकांची वर्दळ असते. 

कवी केशवसुत यांचे जन्मठिकाण.

मालगुंड :
सुप्रसिद्ध कवी केशवसुत यांचे जन्मठिकाण. हे गावही कोकणच्या निसर्गाने नटलेले आहेच. त्यांच्या जन्मस्थळी कोकण मराठी साहित्य परिषदेने केशवसुत स्मारक उभारले आहे. स्मारकामध्ये केशवसुतांच्या वापरतील, तसेच त्यांच्या घरातील वस्तू पाहायला मिळतात. स्मारकामध्ये ग्रंथालय असून, नामवंत कवींच्या कविता व कवींचे परिचय पोस्टर्सच्या माध्यमातून करून देण्यात आले आहेत. त्यावर त्यांची चित्रेही आहेत. 

केशवसुतांनी वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपूर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या त्यांच्या काही उल्लेखनीय कविता आहेत. त्यांच्या स्मारकाला भेट दिल्याशिवाय गणपतीपुळे यात्रा पूर्ण होत नाही. (कवी केशवसुतांबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. मालगुंड येथील केशवसुत स्मारकाचा फेरफटका घडविणारा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 'आम्ही कोण?'या केशवसुतांच्या कवितेचे अभिवाचन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

केशवसुतांचे आणखी दोन धाकटे बंधू होते. त्यापैकी मोरो केशव दामले हे मराठीतील नामवंत व्याकरणकार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांना आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथांत असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले. व्याकरणावर पीएचडी करणाऱ्यांसाठी मोरो केशव दामल्यांचा ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ हा आजही मोलाचा संदर्भग्रंथ आहे. त्यांचे सगळ्यात लहान बंधू पत्रकार होते. 

मालगुंड येथील आणखी एक आवर्जून बघण्यासारखे ठिकाण म्हणजे ओंकारेश्वर मंदिर. हे हेमाडपंती शैलीतील मंदिर पेशव्यांचे पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेले सरदार मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ बांधले आहे. मालगुंड हे मेहेंदळ्यांचे गाव होते. 

कऱ्हाटेश्वर मंदिर
नांदिवडे : हे समुद्रकाठावरचे ठिकाण असून, सागरकिनाऱ्याची विविध रूपे येथे पाहता येतात. छोटासा, पण स्वच्छ आणि सुंदर किनारा, डोंगराच्या कपारीवर आदळणाऱ्या लाटा, सागराचा गूढ आवाज हे येथील वैशिष्ट्य. येथे होम-स्टे आहेत, तसेच काही हॉटेल्सही आहेत. जोग आणि वैद्य कुटुंबांचे हे गाव. 

कऱ्हाटेश्वर : जयगड-नांदिवडे गावाच्या सीमेवर हे ११व्या शतकातील शिलाहार काळातील कोकणी पद्धतीचे कौलारू छपराचे कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. जयगडमधील एक रम्य, निवांत स्थळ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. जवळच दीपगृह आहे. पूर्वी येथे झऱ्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असे. ‘बेभाटी गंगा’ असे तिला ओळखले जायचे. मंदिराभोवतालची जागा रुंद करण्यासाठी खडक फोडले, तेव्हापासून ती लोप पावली. 

जयगड किल्लाजयगड : तिन्ही बाजूंना सागराने घेरलेला हा किल्ला १६व्या शतकात विजापूरकरांनी बांधला. १५७८-८०च्या दरम्यान संगमेश्वरच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशहाने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात गेला. १८१८मध्ये तो इंग्रजांनी घेतला. हा किल्ला समुद्रात घुसलेल्या छोट्या पठारावर आहे. शास्त्री नदी या ठिकाणीच समुद्राला मिळते. पूर्वी बोटीने कोकणवासीय मुंबईहून इथे यायचे व येथून लाँचमधून किंवा होडीने मुंबई-गोवा मार्गावरील कुरधुंड्यापर्यंत जायचे. वाटेत अनेक छोटी गावे आहेत. त्या गावांतील लोकांना फक्त या लाँचचा आधार होता. माझे आजोळ याच जयगड खाडीच्या काठावर आहे; पण ती गावे आता रस्त्याने चिपळूण-रत्नागिरीला जोडली आहेत. 

फेरीबोटीतील प्रवास

जयगडच्या पलीकडील गुहागर तालुक्यातील तवसाळ बंदरापर्यंत आपले वाहन (कार) फेरीबोटीवर चढवून नेता येते. येथे बोटिंगला खूपच मजा येते. जयगडाच्या दीपस्तंभावरून खूप छान दृश्य दिसते. जयगडाच्या तटबंदीवरून फिरत समुद्र पाहणे, हीदेखील एक मजा आहे. तवसाळ येथे पर्यटकांना मासे पकडण्याची संधी मिळते. जयगड बंदराचे विस्तारीकरण चालू आहे. जयगडजवळ जिंदाल समूहाचा औष्णिक प्रकल्प आहे. 

कोळिसरे येथील मंदिरकोळिसरे : श्री लक्ष्मी-केशवाच्या देवस्थानासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. शांत, पवित्र, रमणीय असे हे ठिकाण जणू निसर्गाच्या कुशीतच विसावले आहे. ते शास्त्री नदीच्या (जयगड खाडी) काठावर आहे. हिरव्यागार सदाहरित वृक्षांच्या दाटीत हे देऊळ जवळ जाईपर्यंत दिसत नाही. गाभाऱ्यातील पाच फूट उंचीची नेपाळमधील गंडकी नदीतील शाळिग्रामाची मूर्ती पाहून प्रवासाचा सर्व शीण निघून जातो. 

लक्ष्मीकेशवाची मूर्तीही मूर्ती साधारण सन ७५० ते ९७३ या कालावधीतील राष्ट्रकूट काळातील असावी, असा अंदाज आहे. एक आख्यायिका अशीही सांगितली जाते, की वराडे गावातील लोकांनी त्यांना झालेल्या दृष्टांतावरून कोल्हापूरच्या रंकाळा तलावात लपवून ठेवलेली ही मूर्ती कोकणात आणताना येथे ते रात्रीच्या मुक्कामास थांबले. सकाळी उठून निघताना ही मूर्तीची पेटी उचलली जाईना. देवास येथेच राहायचे असावे, असा विचार करून ती मूर्ती येथेच ठेवण्यात आली. मंदिरात लक्ष्मी-केशव मूर्तीची स्थापना सन १५१०मध्ये भानुप्रभू तेरेदेसाई यांच्या हस्ते झाली. भानुप्रभू हे बहामनी राज्यातील सैतवडे महालातील गावांचे महालकरी होते. मंदिराच्या परिसरात श्री रत्नेश्वर आणि मारुतीची मंदिरे आहेत. 

जयगड किनारा

दोन महिन्यांपूर्वीच मला येथे जाण्याचा योग आला. देवळाच्या सभामंडपात गेल्यावर तेथून हलावेसेच वाटत नाही. सुंदर, कोरीव लाकूडकाम, स्वच्छता यामुळे येथील पावित्र्य आणखीच वाढते. देवळाच्या खालच्या बाजूला गोड पाण्याचा झरा आहे. या झऱ्याचे पाणी स्वामी स्वरूपानंद यांना आवडायचे. जयगड-निवळी रस्त्यापासून चाफ्याजवळ सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. (कोळिसरे, जयगड गणपतीपुळे परिसरातील पर्यटनस्थळांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

रानपाटचा धबधबा : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या पुढे उक्षी गावाकडे जाणारा रस्ता आहे. या गावापासून गणपतीपुळे ३२ किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्यानेच रानपाट गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावापासून पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास धबधब्यापर्यंत पोहोचता येते. कोकण रेल्वेने प्रवास करताना रत्नागिरीला येताना उक्षी स्थानक ओलांडल्यावर जवळच उजवीकडे उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. हिरव्या वनश्रीच्या पार्श्वभूमीवर या धबधब्याचे सौंदर्य खुलून दिसते. धबधब्याकडे जाताना रेल्वेरुळाजवळ थांबू नये. 

करबुडे बोगदा आणि पानवल पूल : रत्नागिरी जिल्ह्यातून कोकण रेल्वेचा १८४ किलोमीटरचा मार्ग जातो. डोंगरातून, खाडी आणि नद्यांवरून नागमोडी वळणे घेत जाणाऱ्या या रेल्वेने प्रवास करणे आनंददायी असते. या रेल्वेमार्गावर आशियातील सर्वांत मोठा, सहा किलोमीटर लांबीचा करबुडे बोगदा आहे. निवळी फाट्यावरून गणपतीपुळ्याला जाताना उजवीकडे वळल्यास बोगद्याकडे जाण्यासाठी फाटा लागतो. अर्थात हा बोगदा रेल्वेन जाताना बघण्यात मजा आहे. रत्नागिरीजवळील रेल्वेचा पानवल पूल दोन डोंगरांना जोडतो. या पुलासाठी १२ कमानी आणि १० खांब बांधलेले आहेत. त्यापैकी सहा खांब हे कुतुबमिनारपेक्षाही उंच आहेत. सद्यस्थितीत हा आशियातील रेल्वेचा सर्वांत उंच पूल आहे. 

निवळी येथील कातळशिल्प (फोटो : अनिकेत कोनकर)

निवळी :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून येताना गणपतीपुळ्याला जाण्यासाठी येथूनच उजवीकडे वळावे लागते. निवळी फाटा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रागैतिहासिक संस्कृतीच्या खुणा आढळल्याने पुरातत्त्व अभ्यासकांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाणारी आणि आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे येथे पाहण्यास मिळतात. निवळीपासून गणपतीपुळे रस्त्यावर साधारण ८०० मीटर अंतरावर उजवीकडे ही कातळशिल्पे आहेत. रस्त्यावर डावीकडे चार नारळीची झाडे आहेत. त्याच्या समोरच ही शिल्पे आहेत. तसेच निवळी फाट्याजवळून गावडेवाडीजवळही अशीच कातळशिल्पे आहेत. 

उक्षी येथील कातळशिल्प

निवळीचा धबधबा :
मुंबई-गोवा महामार्गाने चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना निवळी घाटातच रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यावरूनच निवळीच्या धबधब्याचे दर्शन घडते. उंच डोंगरावरील दाट झाडीतून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य पाहणे हा आनंददायी अनुभव असतो. थोडे पुढे गेल्यावर खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या मार्गाने खाली जाऊन धबधब्यात भिजता येते. पावसाळ्यात येथे उतरण्याचा धोका पत्करू नये.

नाणीज : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर नाणीज येथे स्वामी नरेंद्र महाराज यांचे आध्यत्मिक केंद्र अलीकडील २५/३० वर्षांत प्रसिद्धीला आले आहे. येथे मोठा मठ बांधण्यात आला आहे. अनुयायांसोबतच अनेक राजकारणी नेतेमंडळीही येथे येत असतात. या मठातर्फे अपघातग्रस्तांना अँब्युलन्स यांसारखे काही सामाजिक कार्यही केले जाते. 

राजापूरची गंगा

राजापूर :
राजापूरची अवचितपणे प्रकट होणारी आणि लुप्त होणारी गंगा म्हणजे साक्षात गंगेचेच रूप मानले जाते. श्री गंगेचे मंदिर अरजुना नदीकिनारी असून, ही गंगा डोंगरात उगम पावते. साधारणत: दर तीन वर्षांनी येणारी ही गंगा प्रकट झाल्यावर मूळ गंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, कृष्णकुंड, अग्निकुंड, नर्मदाकुंड, सरस्वतीकुंड, गोदाकुंड, वरुणकुंड, हिमकुंड, वदिकाकुंड आणि काशीकुंड अशा १४ कुंडांतून वाहते. राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदीच्या काठावर ते वसलेले आहे. पूर्वी हे एक  सुरक्षित बंदर होते. ब्रिटिशांनी त्यांची वखार येथेच बांधली होती. आता तिचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज येथे येऊन गेल्याचा उल्लेख आहे. 

धूतपापेश्वर मंदिर

धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरातच आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे. राजापूरचा आंबा प्रसिद्ध आहे. राजापुरी भल्या मोठ्या कैऱ्या लोणच्यासाठी आणि पन्ह्यासाठी उत्तम असतात. धूतपापेश्वर मंदिराजवळ एक धबधबाही आहे. तसेच हार्डी, चुनाकोळवण व ओझर येथेही धबधबे आहेत. (धूतपापेश्वर या ठिकाणाबद्दल विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )

राजापूरचे धनंजय मराठे व सुधीर रिसबूड यांनी त्यांना राजापूर तालुक्यात कातळात खोदलेल्या काही आकृत्या (कातळशिल्पे) दिसल्याची माहिती दिली आहे. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीची, प्रागैतिहासिक संस्कृतीच्या खुणा असणारी ही चित्रकला इतिहासप्रमींनी जरूर पाहावी. इथे लज्जागौरी, काही प्राणी, पक्षी, दिशादर्शक शिल्पे आणि भौमितिक रचना असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडून पाहिल्यास जहाज, तर दुसऱ्या बाजूने पाहिल्यानंतर दोन वाघांच्या मध्ये असलेला माणूस अशी द्विमितीय चित्रेही तेथे दिसली. अशीच कातळशिल्पे निवळी, रामरोड-गणपतीपुळे (ता. रत्नागिरी), पडवे, देवीहसोळ, उपळे, बारसूचा सडा (ता. राजापूर) येथेही सापडली आहेत. (कातळशिल्पांबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गरम पाण्याचे कुंड : सतत गरम पाणी वाहत असणारे कुंड राजापूर शहराच्या जवळच उन्हाळे गावात आहे. त्यावरूनच या गावाला उन्हाळे हे नाव पडले. गंगेपासून जवळच खाली नदीकिनारी उन्हाळे गाव आहे. ग्रामदैवत लक्ष्मीचे मंदिरही तेथे आहे. जवळच बारमाही वाहणारा गंधकयुक्त व औषधी गुणधर्म असलेला गरम पाण्याचा झरा आहे. या पाण्याने त्वचारोग नष्ट होतात. राजापूरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असणाऱ्या या ठिकाणी राहण्यासाठी धर्मशाळा व इन्स्पेक्शन बंगला आहे. 

मिठगवाणे : जैतापूरजवळ हे गाव श्री देव अंजनेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कोकणी पद्धतीचे चौपाखी मंदिर येथे आहे. चिरेबंदी नगारखाना आहे. महाद्वारातून समोरच गाभाऱ्यातील देवाचे दर्शन घडते. समोरच जांभ्या दगडात उंच दीपमाळा आहेत. 

जैतापूर : प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पामुळे गाजत असलेले जैतापूर हे जुने बंदर असून, येथे दीपगृह आहे. 

आंबोळगड : राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. ‘मुसाकाझी’ या प्राचीन बंदरावर, तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. इ. स. १८१८मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला. इ. स. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठवली गेली. 

मुसाकाझी बंदर : हे छोटे बंदर असून, येथील पुळण छोटी असली तरी खूप छान आहे. शांतता असल्याने येथे चांगले वाटते. 

वेत्ये किनारा : आडिवऱ्याजवळ हा सुंदर समुद्रकिनारा आहे. हे महाकालीदेवीचे माहेर समजले जाते. 

गावखडी-पूर्णगड खाडीपुलावरून टिपलेले छायाचित्र (अनिकेत कोनकर)

गावखडी :
रत्नागिरीहून पावसमार्गे पूर्णगडच्या खाडीपुलावरून पुढे गेल्यावर गावखडी किनारा आहे. उजव्या बाजूला दाट सुरुबन आहे व एक किलोमीटर लांबीचा सुंदर सागरकिनारा आहे. गावखडीच्या किनाऱ्यावरून पूर्णगड किल्ल्याची तटबंदी दिसू शकते. गावखडी येथे कासव ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी संरक्षित करून पिल्ले समुद्रात सोडली जातात. श्री. डिंगणकर व त्यांचा मित्रसमूह गेलेली पाच वर्षे कासवांवर संशोधनही करीत आहे. त्यामुळे या ठिकाणाला नवीन ओळख मिळाली आहे. या वर्षी १५ घरट्यांमध्ये अंड्यांचे संवर्धन करण्यात आले. पावस-गावखडी हे अंतर नऊ किलोमीटर आहे. 

देवाचे गोठणे : श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी यांना हे गाव हे गाव इनाम म्हणून दिले होते. सन १७१०-११साली देवाचे गोठणे येथे स्वामी वास्तव्याला आले. त्यांनी या गावात असलेल्या श्री गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात परशुरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मंदिराच्या मागे असलेल्या दगडी मार्गाने माथ्यावर गेले, की एक अप्रतिम कातळशिल्प आवर्जून पाहण्याजोगे आहे. इथल्या खडकामध्ये चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे होकायंत्र ठेवले असता ते चुकीची दिशा दाखवते. 

आडिवरे महाकाली मंदिर (फोटो : मायबोली)

कशेळीचा कनकादित्यआडिवरे : नवसाला पावणारी आडिवरे गावची महाकालीदेवी प्रसिद्ध आहे. दक्षिणाभिमुख असलेल्या देवीची वाडा पेठ या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. आद्य शंकराचार्यांनी श्री महालक्ष्मीची स्थापना केल्याचे मानले जाते. मंदिरामध्ये महाकालीसमोर उत्तरेस तोंड करून श्री महासरस्वती, उजव्या बाजूला महालक्ष्मी आहे. महाकाली मंदिर परिसरात योगेश्वरी, नगरेश्वर, रवळनाथ मंदिरे आहेत. पावसवरूनही येथे येता येते. 

कशेळी : येथे समुद्रकिनारी कनकादित्याचे म्हणजे सूर्यमंदिर आहे. मंदिराच्या आवारात श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गा, श्री मारुती व श्री विष्णूचीही मंदिरे आहेत. कनकादित्य मंदिरावर तांब्याचा पत्रा आहे. हे सूर्यमंदिर प्राचीन असून, सुमारे ९०० वर्षांपूर्वीचे असावे. शिलाहार वंशातील भोजराजाने शके १११३मध्ये दानपत्र लिहून दिलेला ताम्रपट आजही मंदिरात पाहावयास मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे १६६१मध्ये भेट दिली होती. इतिहासाचार्य राजवाडे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, बॅ. नाथ पै यांची कनकादित्यावर श्रद्धा होती. 

पावसपावस : पावस हे एक आध्यात्मिक केंद्र आहे. स्वामी स्वरूपानंदांनी १५ ऑगस्ट १९७४ रोजी येथे समाधी घेतली. त्यांच्या ४० वर्षांच्या वास्तव्याने हे ठिकाण पवित्र झाले आहे. त्यांची समाधी व स्मृतिमंदिर येथे बांधण्यात आले आहे. समाधीमंदिराच्या शेजारी आवळीच्या एका झाडात स्वयंभू गणपती आहे. येथे भाविकांची सतत वर्दळ असते. रत्नागिरीत आलेला पर्यटक पावस व गणपतीपुळे येथे आल्याशिवाय जातच नाही. स्वामींच्या समाधीमंदिरात निवासाची व भोजनाची (मर्यादित) सोय आहे. रत्नागिरी एसटी स्टँडवरून पावस या मार्गावर दर तासाने बससेवा उपलब्ध आहे. वाटेत फिनोलेक्स कंपनीचा मोठा कारखाना आहे. (स्वामी स्वरूपानंदांबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पूर्णगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगड हा छोटासा किल्ला आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून, पश्चिमेकडे सागर किनारा आहे. किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्ट्यांप्रमाणे या दरवाज्याची रचना आहे. दरवाज्यावर श्री गणेश, तसेच चंद्र-सूर्याची शिल्पे आहेत. काळ्या पाषाणातील तटबंदी असून, अजूनही भक्कम आहे. तटबंदीची थोडीफार पडझड झाली आहे. 

पूर्णगड किल्ला

गणेशगुळे :
गलबतवाल्यांचा गणपती म्हणून येथील गणपती ओळखला जातो. हे मंदिर पुरातन असून, जांभ्या दगडामध्ये बांधले असून, चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे, असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावरील वाळू बांधकामाला वापरली जाते. ‘गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला’ (गणपतीपुळ्याला) अशीही आख्यायिका आहे.

हातिस दर्गा (फोटो : प्रवीण भातडे)

हातिस दर्गा :
हिंदू-मस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हा दर्गा रत्नागिरी-चांदेराई मार्गावर हातिस येथे आहे. हिंदू आणि मुस्लिमांची पीर बाबरशेख यांच्यावर श्रद्धा आहे. काजळी नदीवर हा दर्गा असून, परिसर अतिशय सुंदर आहे. येथील उरुसाला मोठी गर्दी असते. (हा दर्गा आणि वैशिष्ट्यपूर्ण उरुस यांसंदर्भातील अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कसे जाल?
रत्नागिरी कोकण रेल्वेने आणि मुंबई-गोवा महामार्गाने जोडलेले आहे. ताम्हिणी घाट, वरंधा घाट, आंबेनळी घाट (पोलादपूर), कुंभार्ली घाट आणि आंबा घाट अशा वेगवेगळ्या घाटांतून हे शहर मुंबई-पुणे-कोल्हापूरशी जोडलेले आहे. रत्नागिरी हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. जवळचा विमानतळ सध्या कोल्हापूर १२७ किलोमीटर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरच कार्यान्वित होईल. गणपतीपुळे आणि रत्नागिरीमध्ये राहण्यासाठी भरपूर चांगली हॉटेल्स आहेत. अतिपावसाचे जुलै-ऑगस्ट महिने सोडून पर्यटकांना वर्षभर कधीही येथे जाणे सोयीचे आहे.

(या भागातील माहितीसाठी कातळशिल्पांचे संशोधक धनंजय मराठे, नांदिवडे येथील माझी भाची सौ. वंदना वैद्य यांची मुलगी सौ. केतकी यांचे सहकार्य मिळाले.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search