Next
रत्नागिरी जिल्हा विकासाच्या २०१ कोटींच्या आराखड्याला मंजुरी
रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती
BOI
Wednesday, July 17, 2019 | 05:39 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ‘सन २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी २०१कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजूरी देण्यात आली असून, या निधीचा नियोजनबद्ध १०० टक्के विनियोग करून जिल्हा विकासात अग्रेसर ठेवावा,’ असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. 

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत, आमदार हुस्नबानू खलिपे, अनिकेत तटकरे आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, संजय कदम, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंजारे आदी उपस्थित होते.  

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत (वि.घ.यो.) २०१९-२०साठी १७ कोटी ३२ लाख, तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरी उपयोजना २०१९-२०साठी एक कोटी ३३ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. गतवर्षीच्या १८१ कोटी ५० लाख आराखड्यातील १०० टक्के निधी खर्च झाला आहे.  या वर्षीही सर्व निधी खर्च करून दर्जेदार विकासकामे करण्यासाठी सर्व अंमलबजावणी विभागानी दक्ष राहण्याचे आवाहन वायकर यांनी केले. 
 
ते म्हणाले, ‘जिल्हा नियोजन समितीकडील खर्च करताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे. राजापूर तालुक्यातील जुवाटी धरण भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम तात्काळ ग्रामस्थांना देण्याची कार्यवाही करावी; तसेच जिल्ह्यातील धरण व अन्य प्रकल्पांच्या भूसंपादन मोबदल्याच्या रकमेचा अहवाल सादर करावा. तिवरे धरणग्रस्तबाधितांच्या पुर्नवसनासाठी आवश्यक मदत प्रशासनामार्फत केली जाईल. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्ह्यातील धोकादायक धरणांचा आढावा घेऊन दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करावेत. यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल.’ 

‘ग्रामीण भागातील अंतर्गत वाड्यांना जोडण्यासाठी साकव हे महत्त्वाचा भाग असल्याने साकव बांधण्याची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावी. प्रमुख जिल्हा रस्ता व राज्यमार्ग यांना जोडणार्‍या रस्ते दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत चर्चा करुन तात्काळ कार्यवाही केली जाईल.  ग्रामीण भागातील काही रस्ते सुस्थितीत नसल्याने तेथे एसटी बसची सेवा खंडित होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्ते दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही करावी. जिल्हा क्रीडा संकुल व तालुका क्रीडा संकुलाची अपुर्‍या निधीमुळे बंद असलेल्या कामांचे फेरप्रस्ताव सादर करावेत; तसेच ज्या क्रीडा संकुलांच्या मॅटिंग सेटसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील पदकप्राप्त खेळाडूंना जिल्हास्तरावर सरावासाठी आवश्यक साहित्यासाठी नियोजनमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल; तसेच खेलो इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलासाठी केंद्र शासनाकडून निधी मागविण्यात येईल,’ असे वायकर यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात नष्ट झालेल्या विद्युत खांब, समाज मंदिर, बालवाड्या आदींसारख्या शासकीय संपत्तीबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित विभागांनी तात्काळ सादर करावा. काही गावांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने सातबारा उपलब्ध होत नाही, अशा ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने सातबारा उपलब्ध करून द्यावा,’ अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री डायलॅसिस मिशनअंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर डायलॅसिस केंद्र सुरू करण्यासंदर्भात  आवश्यक माहिती घेऊन कार्यवाही करावी; तसेच ५० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी जागा पाहणी करण्याबाबत  यावेळी सांगण्यात आले. गणपतीपुळे विकास आराखड्यातंर्गत १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, यामुळे पर्यटनवृद्धीसाठी फायदा होईल, असेही पालकमंत्री या वेळी म्हणाले.

‘‘क’ वर्ग व ‘ब’ वर्ग प्रार्थनास्थळांना मंजूरी देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदीसाठी तात्काळ निधी दिली जाईल. जिल्ह्यातील शास्त्री, वाशिष्टीसारख्या धोकादायक पुलांची माहिती तात्काळ तयार करून त्याबाबत बांधकाम मंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल,’ असेही वायकर यांनी नमूद केले.  

म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी तिवरे धरणग्रस्तांसाठी शासनाकडून जागा उपलब्ध झाल्यास घरे बांधणीसाठी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती दिली. 

प्रारंभी तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच खासदार सुनील तटकरे व विनायक राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. पालकमंत्र्यांच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यापद्धतीबाबत उपस्थित खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हाधिकारी यांनी गौरवोद्गार काढले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search