Next
आपली भाषा यंत्रमानवांकडे द्यायची नसेल तर...
BOI
Monday, August 07 | 06:45 AM
15 0 0
Share this story

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेने स्वतःची आणि मानवाला न कळणारी भाषा विकसित केल्यामुळे फेसबुकला आपला प्रकल्प गुंडाळणे भाग पडले आहे. आज गुगलसारखी कंपनी भाषांतराची सुविधा देऊ लागली आहे. ही यंत्रणा स्वतःच्या चुका लक्षात ठेवते आणि सुधारते. त्या सुधारण्यासाठी आपण तिला मदत करू शकतो. उद्या आपली भाषा यंत्रमानवांच्या हाती द्यायची नसेल, तर यंत्रणा आपण स्वतः वापरणे हाच एक मार्ग आहे!
.............
एन्दिरन (रोबोट) हा रजनीकांतचा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? यात रजनीकांत शास्त्रज्ञ असतो आणि तो स्वतःसारखाच एक यंत्रमानव तयार करतो. यथावकाश या यंत्रमानवाला स्वतःची अक्कल येते आणि तो आपल्या निर्मात्यावरच उलटतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग आता येऊ घालतो आहे आणि त्यात यंत्रमानवाच्या आणखी काही करामती दिसण्याची अपेक्षा आहे.

या चित्रपटाची आठवण निघण्याचे कारण म्हणजे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्यावरही हीच वेळ आली आहे. मोठ्या महत्त्वाकांक्षेने सुरू केलेला आपला प्रकल्प झुकेरबर्गला गुंडाळावा लागला आहे. त्यातही यंत्रमानव होते आणि त्यातही अक्कल होती. कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा प्रयोग तूर्तास तरी थांबला आहे आणि त्याला कारणीभूत ठरली आहे या यंत्रमानवांनी विकसित केलेली भाषा. फेसबुकने आपली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सिस्टीम बंद करण्याची घोषणा केली आहे. कारण फेसबुकने या प्रकल्पासाठी ज्या दोन ‘एआय बॉट’चा वापर केला होता, त्यांनी स्वतःची भाषा तयार केली होती. ते त्याच भाषेत एकमेकांशी संपर्क साधत होते आणि ती भाषा समजणे संशोधकांनाही अवघड झाले होते. ‘आय-रोबोट’ आणि टर्मिनेटर’ अशा हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये शोभेल असाच हा प्रसंग होता. 

झुकेरबर्गच्या प्रकल्पात असे काय घडले होते? या प्रकल्पात दोन रोबोट वापरले होते. बॉब आणि अॅलिस अशी त्यांची नावे होती. त्यांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इंग्रजी भाषेतील आज्ञावली रचण्यात आली होती. या दोघांना काही व्यावहारिक संवाद सांगण्यात आले होते. त्यांना हॅट, बॉल आणि पुस्तके अशा वस्तूंची खरेदी-विक्री करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक वस्तूची किंमत ठरविण्यात आली होती आणि त्यांचे आदानप्रदान करायचे होते. हा सगळा व्यवहार इंग्रजीतच करायचा होता; मात्र तीच भाषा वापरण्याबद्दल त्यांना फेसबुकच्या टीमकडून काहीही मिळणार नव्हते! म्हणजे त्यांना त्याबद्दल कुठले गुण मिळणार नव्हते म्हणा ना! त्यामुळे त्यांनी आपली अक्कल वापरून स्वतःची वेगळीच भाषा तयार केली. 

ध्रुव बत्रा हा फेसबुकच्या टीममधील भारतीय संशोधक या प्रकल्पात सहभागी होता. त्याच्या म्हणण्यानुसार, ‘फक्त इंग्रजीतच व्यवहार करण्यासाठी बक्षीस नव्हते. त्यामुळे हे दोन्ही रोबोट स्वतः सांकेतिक शब्द तयार करून त्यात बोलत होते. उदा. एखाद्याने पाचदा ‘द’ म्हटले, की त्याचा अर्थ या वस्तूंचे पाच नग हवेत असा होतो. माणसांनी ज्या रीतीने भाषा तयार केली, त्यापेक्षा हे काही वेगळे नव्हते.’ इतकेच नव्हे तर या भाषेचा अर्थ लावून मानवी भाषांमध्ये ती समजून घेणेही शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याचे कारणही स्पष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रणा व मानवी भाषा बोलणारे द्विभाषक लोकच या जगात नाहीत! शिवाय सर्व एआय यंत्रणा एकसारखी भाषा विकसित करतील, हेही ठामपणे सांगता येणार नाही. कारण प्रत्येक यंत्रणा स्वतःची भाषा विकसित करू शकेल.  

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि टेस्ला या जगप्रसिद्ध कंपनीचा मालक एलोन मस्क यांच्यात या प्रकल्पावरून चांगलीच वादावादी झाली होती. ‘एआय’चा प्रकल्प धोकादायक आहे आणि स्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच त्याबाबत कठोर नियम बनवावेत, असा इशारा मस्क यांनी ‘यूएस नॅशनल गव्हर्नर्स असोसिएशन’च्या बैठकीत दिला होता. त्यावर झुकेरबर्गने मस्क यांचा इशारा बेजबाबदार असल्याची संभावना केली होती. त्यानंतर तर मस्क यांनी थेट हल्ला चढवत, मार्कची बुद्धी कमी असल्याची टीका केली होती. गंमत म्हणजे टेस्ला ही कंपनीही चालकविरहित मोटारी बनविण्याच्या प्रकल्पावर हिरीरीने काम करत आहे.

अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाबाबत चिंता व्यक्त करणारे मस्क हे पहिलेच असामी नव्हेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक यांच्यासारख्या संशोधक-उद्योगपतींनीही त्याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला होता. भाषेच्या संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होण्याचीदेखील ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांपासून गुगल ट्रान्सलेटची सेवा भाषांतराचे काम करत आहे. गेल्या वर्षीपासून या सेवेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे ‘गुगल ट्रान्स्लेट’मध्ये भाषांतरासाठी एखादे वाक्य किंवा उतारा दिला, तर त्याची भाषा ते स्वतःच ठरवते (ओळखते). गुगल न्यूरल मशीन ट्रान्स्लेशन सिस्टीम (जीएनएमटी) असे या यंत्रणेचे नाव आहे. पूर्वी या सेवेत एक शब्द किंवा वाक्प्रचार भाषांतरित व्हायचा; मात्र आता संपूर्ण वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन भाषांतर करण्यात येते. त्यामुळे ‘गुगल ट्रान्स्लेट’मध्ये भाषांतराची पातळी ९० टक्के अचूकतेपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येते. इंग्रजीतून हिंदीत भाषांतर करून पाहिले तर हे खरे असल्याचेही लक्षात येते.

‘या सेवेचे दर महिन्याला ५० कोटींपेक्षा अधिक वापरकर्ते आहेत आणि ते दररोज १४० अब्ज शब्दांचे भाषांतर करतात,’ असे न्यूयॉर्क टाइम्सने गेल्या वर्षी म्हटले होते. त्या वेळी जीएनएमटी ही यंत्रणा केवळ सहा भाषांमध्ये कार्यरत होती. या वर्षीच्या शेवटपर्यंत ती (मराठीसकट) सर्व भाषांना लागू होईल, असे सांगितले जाते. या यंत्रणेची खुबी अशी, की जसजसा वापर वाढेल तसतसे तिचे ‘ज्ञान’ वाढते. म्हणजे चुका सुधारतात, योग्य शब्द ती लक्षात ठेवू लागते आणि भाषांतरात अचूकता येते. 

गुगलच्या भाषांतर सेवेचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते, लवकरच असा दिवस येईल, की जेव्हा जगातील कोणतीही व्यक्ती स्वतःच्या भाषेत बोलली, तरी ती आपल्या भाषेत ऐकण्याची सोय माणसांना असेल! त्यामुळे आज झुकेरबर्गने माघार घेतली असली, तरी उद्या आणखी कोणी अशी उचापत करणारच नाही असे नाही; पण तोपर्यंत आपण स्वतःची भाषा तरी जपू शकतो आणि मुख्य म्हणजे ‘गुगल ट्रान्स्लेट’सारख्या सुविधा वापरून आपल्या ज्ञानाची भर त्यात घालू शकतो. मी स्वतः या सेवेमध्ये आतापर्यंत सुमारे १५० शब्दांचे योगदान दिले आहे. अनुभव असा, की अनेकदा या ‘जीएनएमटी’ला योग्य मराठी प्रतिशब्द सापडत नाही व म्हणून त्यातून हिंदी शब्द बाहेर येतात. आपला त्यावरील वावर वाढविणे, हाच त्यावरील उपाय आहे. आपली भाषा यंत्रमानवांच्या हातात द्यायची नसेल, तर ती आपण स्वतः वापरणे हाच एक मार्ग आहे!

- देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
R K Khandekar About 298 Days ago
Nicely narrated article.
0
0

Select Language
Share Link