Next
संघटनातून ‘समृद्धी’च्या वाटेवर...
कोमल कुळकर्णी-कळंबटे
Saturday, September 23, 2017 | 03:45 PM
15 0 1
Share this article:

अलीकडे महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले असले, तरी ग्रामीण भागात मात्र चूल आणि मूल या चक्रातून त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांच्या गाठीशी फारसे पैसे तर नसतातच, शिवाय आत्मविश्वासाचीही कमतरता असते. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील समृद्धी विचारे यांनी महिलांना बचत गटांच्या माध्यमातून संघटित करून ‘समृद्धी’च्या वाटेवर नेण्याचा वसा घेतला आहे. तुजऐसी नाहीया मालिकेत आज त्यांच्या या कार्याबद्दल...
..................
आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसतात; पण हे चित्र शहरांतील आहे. ग्रामीण भागातील पूर्वीची परिस्थिती थोडी बदलायला लागली असली, तरी अजूनही बहुतांश ग्रामीण भागांत स्त्रीला घराची चौकट ओलांडून बाहेर पडणे, हेच मोठे आव्हान असते. शेतात मोलमजुरी, बारीकसा व्यवसाय किंवा थोडेफार शिक्षण झाले असल्यास जवळच्या शहरात एखादी छोटी नोकरी, हेच काय ते त्यांच्यासाठी असलेले वेगळेपण. बाकी त्यांच्यामागे असलेला घराचा व्याप काही सुटत नाही. स्वतःचे असे फारसे अर्थार्जन नसल्याने त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड असतो आणि बचतीची तर गोष्टच दूर. शिवाय अनेकदा त्यांना स्वतःलाही यातून बाहेर पडावे, असे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील समृद्धी उदय विचारे यांचे कार्य मोलाचे ठरते.

त्या स्वतः बेताच्या आर्थिक परिस्थितीतून पुढे आलेल्या असल्यामुळे बचतीचे महत्त्व त्या जाणून आहेत. त्यामुळेच त्या इतर महिलांनाही बचतीचे महत्त्व पटवून देऊन, आर्थिक उन्नती साधण्याचा मूलमंत्र देत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यातून त्यांनी आर्थिक प्रगती साधावी यासाठी समृद्धी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी महिलांना एकत्र आणून त्यांचे बचत गट स्थापन केले आहेत.

समृद्धी यांनी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) २००३ मध्ये सहयोगिनी म्हणून सुरुवात केली. बचत गट स्थापन करण्यासाठी आणि त्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची मानसिक तयारी करणे हेच पहिले मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यासाठी त्यांनी लांजा तालुक्यातील प्रत्येक गावाला भेट दिली. तेथील महिलांशी संवाद साधून त्यांना बचत गट म्हणजे काय, त्याचा फायदा कसा होतो आदी सगळी माहिती महिलांना दिली. सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर त्यांना हळूहळू महिलांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. अनेक महिला पुढे आल्या आणि बचत गट स्थापन करून काही रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवू लागल्या.

त्यानंतर ‘माविम’तर्फे २००७मध्ये तेजस्विनी हा प्रकल्प आणि २०१०मध्ये लोकसंचलित साधन केंद्र ही संस्था स्थापण्यात आली. या केंद्राच्या लांजा शाखा व्यवस्थापक म्हणून त्या २०१५पासून कार्यरत आहेत. गेल्या १३ वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक गरजू, गरीब, विधवा, परितक्त्या महिलांना प्राधान्याने गटात सामावून घेतले असून, सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून दिला आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, आरोग्यविषयक योजना, महिला बालकल्याण योजना, पशुवैद्यकीय योजना आदींचा समावेश आहे.

समृद्धी यांनी आतापर्यंत २३५ बचत गटांची स्थापना केली असून, त्या माध्यमातून त्यांनी दोन हजार ९१६ महिलांना संघटित केले आहे. ‘चूल आणि मूल’ इतकेच विश्व असणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांनी या गटांद्वारे एकत्र येऊन वेगवेगळे व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यातून आर्थिक उत्पन्न सुरू झाल्याने महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण झाले.

बचत गट स्थापन केल्यानंतर त्यांचे आर्थिक उत्पन्न सुरू होईपर्यंत समृद्धी स्वतः लक्ष घालतात. बँकेकडून कर्ज मिळवून देणे, महिलांच्या अंगी असलेल्या कला-गुणांनुसार किंवा आवडीनुसार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे आदींसाठी समृद्धी नेहमीच प्रयत्नशील असतात. पापड, लोणची, पिठे तयार करणे या बचत गटांच्या पारंपरिक व्यवसायांबरोबरच काजू प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय खत उद्योग  यांसारखे व्यवसायही या महिला समर्थपणे करत आहेत आणि सांभाळत आहेत. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याची व्यवस्था समृद्धी करतात. शेणखत, गोमूत्र आदी घटक एकत्र करून ते सात दिवस तसेच ठेवून त्यातून निर्माण होणारे ‘जिवामृत’ हे सेंद्रिय खतही बचत गटांतील महिला बनवत आहेत. ‘जिवामृत’ आणि त्यासारखी इतर सेंद्रिय खते कृषी विज्ञान केंद्रात विक्रीसाठी ठेवली जातात. त्याचप्रमाणे गटातील महिलांनी उत्पादित केलेला इतर माल लांजा तालुक्यातील वेगवेगळ्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवला जातो. त्यामुळे या महिलांना थेट ग्राहक मिळत आहेत.

महिलांना आर्थिक उत्पन्नाबरोबरच नवनवीन अनुभव मिळण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे दर वर्षी भरवण्यात येणारे सरस प्रदर्शन, आंबा महोत्सव यांसारख्या कार्यक्रमांतही हे बचत गट सहभागी होत असतात. यामुळे एकेकाळी घराचा उंबरठाही न ओलांडणाऱ्या या महिलांच्या आत्मविश्वासामध्ये कमालीची वाढ झाली आहे.

समृद्धी यांच्या प्रयत्नांतून चिपळूण तालुक्यातील एक्सेल कंपनीमार्फत बचत गटातील महिलांसाठी खेरवसे (ता. लांजा) येथे काजू प्रक्रिया प्रकल्प उभारणीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांत हा प्रकल्प उभा राहणार आहे. यामुळे महिलांना उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळणार आहे.

महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्यानंतर त्यांच्यात येणारा आत्मविश्वास पाहून आपल्याला समाधान मिळत असल्याचे समृद्धी अभिमानाने सांगतात. महिलांच्या आर्थिक विकासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या समृद्धी यांना त्यांचे पती उदय विचारे यांचीही तितकीच मोलाची साथ मिळते आहे. ग्रामीण महिलांना स्वतःची ओळख निर्माण करून देण्याबरोबरच हे दाम्पत्य सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे, हे विशेष. हे काम असेच सुरू ठेवून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांना मुख्य प्रवाहात आणायची त्यांची इच्छा आहे. विचारपूर्वक संघटनातून महिलांना समृद्धीच्या वाटेवर नेण्याच्या त्यांच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा!!!

संपर्क : समृद्धी विचारे – ९४२३९ १०९२७

ई-मेल : mvkomalk8881@gmail.com

(‘तुजऐसी नाही’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/idhJdV या लिंकवर उपलब्ध असतील.)


 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
shreeya About
All the best
0
0

Select Language
Share Link
 
Search