Next
‘अस्पृश्य’ विषयाला ‘ऑस्कर’चा स्पर्श
भारतीय निर्मातीच्या ‘पीरियड – एंड ऑफ सेन्टेन्स’ या माहितीपटाला ऑस्कर
BOI
Monday, February 25, 2019 | 11:10 AM
15 0 0
Share this story

‘पीरियड – एंड ऑफ सेन्टेन्स’ या माहितीपटातील दृश्य.

लॉस एंजेलिस :
मासिक पाळी हा भारतासह जगभरात अनेक ठिकाणी अजूनही खुलेपणाने चर्चा टाळला जाणारा विषय; मात्र या ‘अस्पृश्य’ विषयाला आता जागतिक प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराचा स्पर्श झाला आहे. ‘पीरियड – एंड ऑफ सेन्टेन्स’ हा माहितीपट ‘डॉक्युमेंट्री – शॉर्ट सब्जेक्ट’ या विभागात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. ‘पॅडमॅन’ म्हणून नावारूपाला आलेले अरुणाचलम मुरुगनंथम यांच्या कार्याने प्रेरित होऊन उत्तर प्रदेशातील गावात पॅड मशीन बसविणाऱ्या आणि त्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांची कहाणी यात आहे.

‘अॅकॅडमी अॅवॉर्डस्’ अर्थात ऑस्कर पुरस्कारांच्या ९१व्या सोहळ्यात २४ फेब्रुवारीला रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार २५ फेब्रुवारीला सकाळी) या माहितीपटाच्या टीमने हा पुरस्कार स्वीकारला. 

ऑस्कर पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘पीरियड – एंड ऑफ सेन्टेन्स’ची टीम

गुणित मोंगा या माहितीपटाच्या कार्यकारी निर्मात्या असून, मोंगा यांची ‘सिख्या एंटरटेन्मेंट’ही कंपनी या माहितीपटाची सहनिर्माती आहे. लंच बॉक्स, मसान यांसारख्या चौकटीबाहेरच्या चित्रपटांना पाठबळ देणारी कंपनी ही ‘सिख्या’ची ओळख आहे. विविध पुरस्कार मिळालेल्या इराणी-अमेरिकी दिग्दर्शिका रायका झेहताबची यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. लॉस एंजेलिसमधील ओकवूड स्कूलच्या शिक्षिका मेलिसा बर्टन आणि त्यांचे विद्यार्थी यांनी स्थापन केलेल्या ‘दी पॅड प्रोजेक्ट’ या संघटनेने हा माहितीपट तयार केला आहे. 

स्त्रियांना मासिक पाळीत होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांना कमी खर्चात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध व्हावेत, म्हणून धडपड करणारे अरुणाचलम मुरुगनंथम पुढे पॅडमॅन म्हणून नावारूपाला आले. सुरुवातीला त्यांना समाजातून आणि अगदी घरातूनही प्रचंड विरोध झाला होता; पण कालांतराने त्यांच्या कार्याचे महत्त्व लोकांना कळले. २०१८मध्ये त्यांच्या कार्यावर आधारित असलेला ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अक्षयकुमार, राधिका आपटे यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘पीरियड – एंड ऑफ सेन्टेन्स’ हा माहितीपटही अरुणाचलम यांच्या कार्यातून प्रेरणा घेतलेल्या महिलांवर आधारित आहे. 

मासिक पाळी या विषयाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनंथम यांच्याकडून प्रेरणा घेतलेल्या महिलांची कथा या माहितीपटात दाखवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील हापूर या गावातील महिला आणि मुलींनी मुरुगनंथम यांनी तयार केलेले सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करणारे ‘पॅड मशीन’ गावात बसविले. त्यानंतर या महिलांना नेमके कसे अनुभव येतात, त्या सर्वांशी कशा संघर्ष करतात, या सगळ्याचे चित्रण या २६ मिनिटांच्या माहितीपटात आहे. 

मासिक पाळीशी निगडित अंधश्रद्धांमुळे या गावातील मुलींना सॅनिटरी पॅड्स मिळत नव्हती. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायचे आणि मुलींची शाळा सुटायची. गावात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसविल्यानंतर महिला स्वतःच पॅड्स तयार करायला आणि त्याचे मार्केटिंग करायला शिकल्या. त्यामुळे साहजिकच त्यांचे सबलीकरण झाले. ‘फ्लाय’ असे त्यांनी निर्मिती केलेल्या पॅड्सचे ब्रँडनेम ठेवण्यात आले. या साऱ्याची गोष्ट माहितीपटात आहे.

‘मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता आणि चांगल्या आरोग्यपूर्ण सवयी यांबद्दल जगभरातील तरुण मुलींना मार्गदर्शन करण्याचे एक छोटे स्वप्न मेलिसा बर्टन यांच्या इंग्लिश विभागाच्या खोलीमध्ये पाहिले गेले होते. ‘ओकवूड स्टोरीज’च्या मुलीही त्यात सहभागी होत्या. सात वर्षांपूर्वी निधी उभारून आणि एक पॅड मशीन दान करून या प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यानंतर याबद्दलच्या अधिक जागरूकतेसाठी एक माहितीपट तयार करण्याची गरज भासली. पॅड मशीन गावात बसविण्यासाठी ‘अॅक्शन-इंडिया’ या संस्थेने मोठी मदत केली. दिग्दर्शिका रायका आणि सिनेमॅटोग्राफर सॅम डेव्हिस यांनी ते अत्यंत उत्तमपणे माहितीपटातून मांडले,’ असे गुणित मोंगा यांनी हा पुरस्कार मिळण्याआधी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते. 

‘मासिक पाळीच्या विषयावरील माहितीपटाला ऑस्कर मिळू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीये,’ अशी भावना दिग्दर्शिका रायका यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर व्यक्त केली. 

बर्टन यांनी हा पुरस्कार त्यांच्या शाळेला अर्पण केला आहे. ‘लॉस एंजेलिसमधील माझ्या विद्यार्थिनी आणि भारतातील लोकांना बदल घडवायचा होता. म्हणूनच या प्रकल्पाची निर्मिती होऊ शकली. हा पुरस्कार मी जगभरातील शिक्षक आणि विद्यार्थिनींशी वाटून घेते. कारण मासिक पाळीमुळे मुलींचे शिक्षण थांबता कामा नये.’

गुणित मोंगा यांनीही पुरस्कारानंतर ट्विटरवरून आपला आनंद व्यक्त केला. ‘या पृथ्वीवरील प्रत्येक मुलगी ही देवता आहे, हे तिला कळलेच पाहिजे,’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. याआधी २००९मध्ये स्लमडॉग मिलेनिअरसाठी ए. आर. रेहमान आणि रेसूल पोकुट्टी या भारतीयांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link