Next
ऑल क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, August 22, 2017 | 12:45 PM
15 2 0
Share this story

युद्धाची दाहकता....संहारक शस्त्रांचा वापर......क्षणाक्षणाला अवयवांचे तुकडे आणि देहाच्या चिंधड्या होत मरणारी माणसं.....रक्तमांसाचा चिखल.....सैनिकांचं सीमेवर आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर भीषण जगणं.....का लादतो आपण युद्ध?...का एवढा पराकोटीचा द्वेष आणि मत्सर करत जगतात दोन देश एकमेकांविरुद्ध?......इतक्या साऱ्या सैनिकांची अशा तऱ्हेने किंमत देऊन नक्की काय मिळवतो?.....हे असंच होत राहणार का पृथ्वीच्या पाठीवर?.....शेवटचा माणूस मरेपर्यंत?.....असे विचार करायला भाग पाडणारा सिनेमा ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’.........आज सिनेसफरमध्ये त्या सिनेमाबद्दल...
..............................

ऑल क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट

पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर १९३० साली बनलेली ही वॉरफिल्म (खरं तर अँटी-वॉरफिल्म!) एरिक रेमार्क या जर्मन कादंबरीकाराच्या ‘Im Westen nichts Neues’ या प्रसिद्ध जर्मन कादंबरीवर आधारित होती. आर्थर वेस्ली व्हिनने त्याचं ‘ऑल क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट’ या नावानं इंग्लिश रूपांतर केलं. स्वतः पहिल्या महायुद्धात भाग घेतलेल्या एरिक रेमार्कनं महायुद्धाची दाहकता जवळून अनुभवली होती. तो स्वतः जेव्हा युद्धावरून घरी परतला होता, तेव्हा त्यानं रंगवलेली बहुतेक स्वप्नं धुळीला मिळाली होती. पिआनिस्ट बनायचं होतं ते राहिलं, आईला भेटू शकला नाही. कारण ती तोपर्यंत जग सोडून गेली होती आणि त्यातच युद्धानं होरपळलेल्या त्याच्या मनावर एका भयाण निराशेची छाया सतत होती. त्या सर्व अनुभवांवर त्याने १९२९ साली ही कादंबरी लिहिली. सैनिकांच्या वाट्याला येणारं विदारक जीवनाचं यथार्थ चित्र त्यानं त्यात रंगवलं आहे.

युद्धाची भीषणता, रात्रंदिवस एका खंदकात गाडून घेणं, सतत असलेला शत्रूच्या गोळीबाराचा आणि बॉम्बवर्षावाचा धोका, कायम आपल्या सहकाऱ्यांच्या जखमी अवस्था किंवा मृतदेह पाहणं नशिबी असणं, चांगलंचुंगलं अन्न खायला न मिळणं, नवीन भरती होणाऱ्या अर्धकच्च्या सैनिकांमुळे वाढणारा तणाव आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरचं राष्ट्राभिमानाच्या नावाखाली जगावं लागणारं अशाश्वत जीवन!! जर्मनीमध्ये या पुस्तकावर बंदी आणली गेली आणि रेमार्कला देश सोडणं भाग पडलं होतं; पण जगानं मात्र कादंबरीची दखल घेतली. या कादंबरीवर १९३० साली लुईस माईलस्टोननं ‘ऑल क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट’ हा सिनेमा बनवला.... लष्करात नुकतेच भरती झालेले तरुण आणि त्यांचा जगाकडे, जीवनाकडे बघण्याचा आशावाद कसा धुळीला मिळतो, आपल्याच समाजापासून, कुटुंबापासून ते कसे तुटत जातात, त्याची सुन्न करणारी विषण्ण कहाणी त्यानं प्रत्ययकारीपणे मांडली. या सिनेमाला त्या वर्षीचा ऑस्कर अॅवॉर्ड मिळाला होता.

टायटल्स संपतासंपता ‘डिस्क्लेमर’वजा ओळी येतात – ‘This story is neither an accusation nor a confession, And least of all an adventure, for death is not an adventure to those who stand face to face with it. It will try simply to tell of a generation of men who, even though they may have escaped its shells, were destroyed by the war..’

सिनेमाची सुरुवात होते ती सीमेवर निघालेल्या सैनिकांच्या तुकडीच्या परेडने! दुतर्फा जमलेली लोकं त्यांचं अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहित करताहेत. त्याच पार्श्वभूमीवर कॅमेरा येऊन स्थिरावतो शाळेच्या एका वर्गात. हा पॉलचा वर्ग. त्याचे दांभिक मास्तर युद्धाच्या बाजूनं तावातावानं बोलत असतात. जर्मनीनं युद्ध जिंकणं आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं सैन्यात भरती व्हावं यासाठी ते आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉशिंग करत असतात (पण स्वतः मात्र सैन्यात जायला राजी नसतात). ‘तुम्हीच आपल्या मातृभूमीचा प्राण आहात. जर्मनीचे तुम्हीच पोलादीपुरुष आहात. चला. मातृभूमीसाठी लढण्यासाठी सिद्ध व्हा. तिच्या हाकेला ओ द्या..’ वगैरे मास्तरांच्या बोलण्यानं भारावून जाऊन पॉल आणि त्याचे मित्र सैन्यात भरती होण्यासाठी निघतात.

ट्रेनिंग कॅम्पवर त्याचं ट्रेनिंग सुरू होतं. ते उत्साहाने फसफसलेले असतात; पण त्यांच्या कठोर ट्रेनरकडून त्यांना दहा आठवडे अत्यंत निर्दयीपणे युद्धासाठी तयार केलं जातं. फ्रेंच सीमेवर त्यांची रवानगी होते. तिथे उतरल्यावर त्यांना युद्धाची भीषणता आणि संहारकता अनुभवायला मिळते. पॉल आणि त्याच्या मित्रांना कळून चुकतं, की आपण जे देशप्रेम आणि कर्तव्य वगैरे ऐकत आलो, ते केवळ कोरडे शब्दच होते. युद्धबिद्ध आपण समजलो तसं काही उदात्त, उन्नत वगैरे नसून, या हिंसेचा, या भीषण संहाराचा मानवजातीला काहीही फायदा नाही. सीमेवर तोफांच्या राक्षसी गडगडाटात आणि अविरत गोळीबाराच्या वर्षावात पंधरवडाभर लढून परतल्यावर त्यांच्या लक्षात येतं, की त्यांच्या १५० जणांच्या चमूतले जेमतेम आठ-दहा जणच जिवंत राहिलेत. मग तिथल्या खानसाम्याची कशीबशी मनधरणी करून ते आठ-दहा जण, बाकीच्या मेलेल्यांच्या वाटचाही शिधा मिळवतात आणि काही काळ का होईना त्यांना पोटभर खायला मिळतं.

आपला दोस्त केमरीह्क गँगरीनमुळे एक पाय गमावून बसलाय हे कळल्यावर पॉल इतर मित्रांसह त्याला भेटून येतो. केमरीह्क जास्त जगणार नाही हे कळून म्युह्लर त्याचे बूट्स आपल्याला हवेत अशी मागणी करतो. इतरांना ते विचित्र वाटतं; पण एव्हाना युद्धाच्या अमानुष झळा अनुभवून कणखर बनलेल्या पॉलला त्याचं प्रॅक्टिकल म्हणणं पटतं. केमरीह्क मरतो आणि त्याचे बूट्स म्युह्लरला मिळतात.

दरम्यान, त्यांच्या चमूमध्ये ताज्या दमाच्या नवशिक्या पोरांची आणखी एक तुकडी येऊन दाखल होते. एका रात्री त्यांच्यावर सरहद्दीवर तारांचं कुंपण घालण्याची कामगिरी येते. त्याच वेळी इतका जबरदस्त बॉम्बवर्षाव होतो, की सर्वांना पळून एका दफनभूमीचा आश्रय घ्यावा लागतो. त्या वेळचं दृश्य करुण असतं. त्या भयानक बॉम्बवर्षावाने त्यांच्यातले कित्येक जण तिथेच मरून पडत असतात आणि बॉम्ब्सच्या हादऱ्यामुळे कबरी फुटून आतले मृतदेह बाहेर येत असतात. बेसकॅम्पवर परतताना त्यांना जाणीव झालेली असते, की हे एक न संपणारं आणि निरर्थक युद्ध आहे.

पुढच्या दृश्यात त्यांचा आणि दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचा घनघोर संग्राम होतो. नवनवीन संहारक शस्त्रांचा प्रयोग होतो....जो तो त्वेषाने लढत असतो. कोणी भयानक जखमी होत असतो, तर कुणाचे अवयव अक्षरशः तुटून पडत असतात.....कुणाच्या देहाच्या चिंधड्या होत असतात. सर्वत्र प्रेतांचा खच पडत असतो. मेलेल्यांच्या शरीराचे लचके तोडायला उंदीर आणि घुशी टपलेले असतात. ती लढाई संपते... पॉलच्या टीममधली निम्मी माणसं ठार झालेली असतात. पॉल आणि त्याच्या टीमला काही काळासाठी सीमेवरून माघारी एका डेपोत पाठवलं जातं. मिळालेले विरंगुळ्याचे क्षण अनुभवायला ते सर्व जण गावातल्या तळ्यावर जातात, जिथे त्यांना काही फ्रेंच मुली भेटतात; पण पॉल त्यांच्याशी मोकळेपणानं मिक्स होऊ शकत नाही. दोन-अडीच आठवड्यांची सुटी मिळून पॉल आपल्या घरी परततो; पण तो घुम्या झालेला असतो. युद्धाचे दारुण अनुभव तो कुणाला सांगू शकत नसतो आणि त्याच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं उरलेलंही नसतं.

सुट्टी संपवून पॉल पुन्हा सीमेवर लढण्यासाठी परततो. युद्धाच्या एका धुमश्चक्रीत पॉल एका खड्ड्यात उडी मारतो, नेमका त्याच वेळी शत्रूपक्षातला एक फ्रेंच सैनिकही तिथे उडी मारतो. प्रतिक्षिप्त क्रियेने पॉल त्याला भोसकतो; पण त्या सैनिकाचं त्याच्या भोसकण्यामुळे आलेलं मरण त्याला अंतर्मुख करून जातं. ‘का मारलं आपण याला? तोही माणूसच..एक सैनिक.....तो स्वतःच्या देशासाठीच लढत होता ना?’ पॉलच्या मनात युद्धातली व्यर्थ्यता दाटून येते. दरम्यान, १९१८ साल सुरू होतं. युद्धभूमीवर दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचा जोर वाढत जातो. जर्मन सैन्याची पीछेहाट सुरू होते. तशात सैन्याची खाण्याची आबाळ होत जाते. धान्य संपत जातं. रोगराई वाढलेली असते. पोट बिघडून, जुलाब होऊन होऊन सैनिकांचे हालहाल झालेले असतात. त्या युद्धात पॉल आपले एकेक करून सर्व मित्र गमावतो.

ऑक्टोबर १९१८. पॉल खंदकात पहारा देतोय. अशा वेळी त्याच्यासमोर एक फुलपाखरू येऊन बसतं. त्या घनघोर युद्धाच्या भीषणतेमध्ये ...कानठळ्या बसवणाऱ्या बॉम्बवर्षावात.... पॉलने भोगलेल्या सर्व यातनांच्या पार्श्वभूमीवर...परमेश्वरानं जणू त्या इवल्याशा जिवाच्या उघडझाप होणाऱ्या चिमुकल्या पंखांमधून एक नव्या आश्वासक विजिगिषेची चाहूल दिली आहे..... पॉलला राहवत नाही.....तो खंदकातून किंचित अंग बाहेर काढून हात लांबवून त्या फुलपाखराला हळूच बोटानं स्पर्श करू पाहतोय...त्याची बोटं त्या पंखांना स्पर्श करतात न करतात तोच दुरून सणसणत आलेली गोळी त्याचा वेध घेते....त्या लवलवणाऱ्या इवल्याशा जिवाच्या बाजूला पॉलचा निष्प्राण देह. तिकडे युद्धविराम जाहीर होतो. इकडे जर्मन सीमेवरून रुटीन रिपोर्ट हेडक्वार्टरला जातो – ‘ऑल क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट!’

हा सिनेमा आणि शेवट आपल्याला सुन्न करतो. विचारात पाडतो. युद्धाची दाहकता....संहारक शस्त्रांचा वापर......क्षणाक्षणाला देहाच्या चिंधड्या होत अवयवाचे तुकडे होत मरणारी माणसं.....रक्तमांसाचा चिखल.....सैनिकांचं सीमेवर आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर भीषण जगणं.....का लादतो आपण युद्ध?...का एवढा पराकोटीचा द्वेष आणि मत्सर करत जगतात दोन देश एकमेकांविरुद्ध?......इतक्या साऱ्या सैनिकांची अशा तऱ्हेने किंमत देऊन नक्की काय मिळवतो?.....हे असंच होत राहणार का पृथ्वीच्या पाठीवर?.....शेवटचा माणूस मरेपर्यंत?

ई-मेल : Prasanna.Pethe@myvishwa.com

(‘सिनेसफर’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)
 
15 2 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link