Next
श्रीमंत दगडूशेठ गणपती यंदा राजराजेश्वर मंदिरात विराजमान
साकारली तमिळनाडूतील राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती
BOI
Saturday, September 15, 2018 | 02:40 PM
15 0 0
Share this article:


पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा ट्रस्टच्या १२६व्या वर्षानिमित्त तमिळनाडूतील तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचा समावेश करून गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे.  

गणेश चतुर्थीला सायंकाळी (१३ सप्टेंबर २०१८) येथील सजावटीच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन होताच पुणेकरांनी बाप्पाचे मनोहारी रूप आणि लाखो दिव्यांनी उजळलेले राजराजेश्वर मंदिर मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सजावटीच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन झाले. या वेळी पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त आशू जैन, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, उल्हास भट, राजेश सांकला, मंगेश सूर्यवंशी, सुनील जाधव यांच्यासह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. 

‘अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात आलेली ही प्रतिकृती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. मोतिया रंगाच्या लाखो दिव्यांनी हे मंदिर उजळून निघाले आहे. अत्याधुनिक दिव्यांनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून उंची ९० फूट आहे’, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष गोडसे यांनी दिली. (राजराजेश्वर मंदिराविषयी अधिक माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुसऱ्या दिवशी ट्रस्टच्या वतीने सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात होते. या वेळी पुण्यातील विविध शाळांमधील सुमारे ८०० ते १००० विद्यार्थ्यांनी मंदिरासमोर सूर्यनमस्कार घातले. योगाचार्य विदुला शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्याचबरोबर सामूहिक अथर्वशीर्ष पठणाच्या उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. तब्बल २५ हजारांपेक्षा अधिक महिलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. पारंपरिक वेशात पहाटे चार वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली. 

गणेश नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत झालेली महाआरती आणि ‘इंधन वाचवा’ असा संदेश देत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. या वेळी फिनोलेक्सच्या रितू छाब्रिया, वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पं. वसंतराव गाडगीळ, एमएनजीएलचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. भक्तिरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे हे ३२वे वर्ष होते. 

अरुण भालेराव म्हणाले, ‘महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा, याकरिता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या विचारातून तब्बल ३२ वर्षांपूर्वी या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ १०१ महिलांपासून सुरू झालेल्या उपक्रमात आज २५हजारांहून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत,’ अशा शब्दांत अरुण भालेराव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

(मंडळाच्या यंदाच्या सजावटीचा व्हिडिओ सोबत देत आहोत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील. )

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search