Next
पाठराखण
BOI
Thursday, May 18, 2017 | 10:28 AM
15 0 0
Share this article:

विष्णू जोशीएप्रिल २०१०मध्ये विदर्भातील वाशिम येथून सुरू झालेले काव्याग्रह हे अनियतकालिक आता इंग्रजी आणि हिंदी भाषेतूनही प्रकाशित होणार आहे. या महिन्याच्या अखेरीला ‘काव्याग्रह’चा पहिला इंग्रजी अंक प्रकाशित होईल. विष्णू जोशी यांनी एक ध्यास घेऊन सुरू केलेल्या ‘काव्याग्रह’ने उत्कृष्ट अनियतकालिकाचा पहिला गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार मिळाला आहे. तसेच, येत्या २६ मे रोजी ‘मसाप’तर्फे पुण्यात त्यांचा सत्कार होणार आहे. त्या निमित्ताने विष्णू जोशी या तरुण संपादकाच्या ध्येयवेड्या वाटचालीबद्दल त्यांच्या सुहृदाने व्यक्त केलेले हे मनोगत...
............ 
विष्णू जोशी हे नाव आता महाराष्ट्रातील सर्व कविताप्रेमी लोकांना आणि लेखक समीक्षकांना परिचित झालेलं आहे. काव्याग्रह प्रकाशनाचा सर्वेसर्वा. विष्णू सर्वांत आधी एक खूप संवेदनशील कवी आहे. माणसांशी विणलेल्या नात्यांच्या गुंतागुंतीचा शोध घेत तो आपल्या कवितेतून माणसांवर विनाअट नि:स्वार्थ आणि एकतर्फी जीव लावतो. त्याची कविता जीवनाची खचणारी बाजू सावरण्याची तगमग व्यक्त करते. परंतु स्वत:च्या कवितेबाबत अत्यंत संकोची असलेला विष्णू मित्रांच्या कविता सर्वांपर्यंत पोहोचवण्याची सतत धडपड करताना आपण नेहमीच पाहत असतो. आणि हे कविताप्रेम फार काळजातलं आहे. कृत्रिमता आणि विष्णू यांचं फार शत्रुत्व आहे; पण व्यक्ती म्हणून विष्णू हा अजातशत्रू आहे. ‘सगळा गोतावळा माझाय’ या जिव्हाळ्याने त्याने माणसं जोडलीत. कुणाबद्दल आकस नाही, अनादर नाही, मत्सर नाही, कटुता नाही. माणसातलं चांगलं वेचत तो पुढे जातो.

वाशिमसारख्या फारसं वाङ्मयीन वातावरण नसलेल्या शहरात राहून नागपूर ते कणकवली, मुंबई ते गोवा, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, नांदेड असा सगळीकडे त्याचा सगळ्या वयोगटातील कवी-लेखकांशी आत्मीय संबंध आहे. आणि विष्णूच्या विनम्र व लाघवी स्वभावामुळे तो सर्वांना आपला वाटतो. असं सगळं असलं, तरीही विष्णू स्वाभिमानाशी कधीही तडजोड करत नाही. 

आजवर विष्णूने ‘काव्याग्रह’ची वर्गणीदेखील स्वत:हून कुणाकडेही मागितली नाही. अंक मात्र लेखक-वाचकांचा शोध घेऊन पाठवलाय नेहमी. अशा या मित्रानं ‘काव्याग्रह’चं स्वप्न पाहिलं. शिकण्यात मनच लागेना. असा ध्यास. असं झपाटलेपण. कविवर्य नारायण कुलकर्णी कवठेकरांनी शिकताना खूप आधार दिल्याचं तो सांगतो. कवठेकर सरांशी मी जेव्हा विष्णूबद्दल बोललो, तेव्हा त्यांनी फार काळजीच्या स्वरात म्हटलं होतं, की अरे विष्णूला या जगाचे नियम कळत नाहीत. व्यवहार कळत नाही. त्याच्या या कविताप्रेमानं त्याला समाधान मिळेल; पण आयुष्याचा गाडा रेटणं कठीण जाईल. विष्णूनं ही कठीण वहिवाट निवडली. आणि त्या वाटेवर तो चालतोय. निरपेक्षतेनं वाङ्मयसेवा करतोय. विनायक येवले, सारिका उबाळे यांचे देखणे कवितासंग्रह त्याने काव्याग्रह प्रकाशनातर्फे काढलेत. त्यांचं चांगलं स्वागत मराठी कवितेत होत आहे. विष्णूची धडपड थांबेल अशी काही चिन्हं दिसत नाहीत.

त्याला दरम्यान असं वाटलं, की काव्याग्रह आता इंग्लिश आणि हिंदीतूनदेखील काढायला हवं. निदान प्रयोग म्हणून सुरुवातीचा एक एक अंक काढावा आणि प्रतिसाद पाहावा. कल्पना मनात आली. मित्रांशी लगेच सल्लामसलत. लगेच निर्णय. लगेच कामाला सुरुवात आणि आता पुढल्या आठ दिवसांत ‘काव्याग्रह’चा इंग्रजी भाषेतील पहिला अंक प्रकाशित होतो आहे.

खरं तर विष्णूच्या या जिद्दीची पाठराखण करण्यासाठी मी ही नोंद आवर्जून घेतोय. आपण सर्वांनी त्याच्या धडपडीला समजून घ्यावं, उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. अंकाची निश्चित नसली तरी काही एक वर्गणी पाठवावी. त्याला सहकार्य करावं. मराठी भाषाशिक्षकांनी हा मित्र आपल्यासाठी अप्रत्यक्षपणे भाषेचं प्रसारकार्य करतोय म्हणून जरा आस्थेनं पहावं. कविमित्रांनी कौतुक करावं अशी माझी साधी अपेक्षा आहे हे लिहिण्यामागे. विष्णू तर त्याचं काम करतच राहणार. आपली साथ मिळाली तर त्याला आणखी मूठभर मांस चढेल.

पहिल्या इंग्रजी अंकाचे मुखपृष्ठ‘KAVYAGRAHA’ अशी सुबक अक्षरं असलेलं इंग्लिश अंकाचं अत्यंत आकर्षक अन् सुंदर मुखपृष्ठ केलंय कवी, चित्रकार, कलासमीक्षक, अनुवादक गणेश विसपुते या मित्रानं. गणेशनं मलाही प्रतिष्ठानचा कार्यकारी संपादक असताना अशीच उत्कटतेनं मदत केलीय. छुपेपणानं हवी ती मदत करून नामानिराळं राहणं हे गणेशचं वैशिष्ट्य. शांतपणे तासन् तास काम करत राहणं व मग अचानक ‘माय नेम इज रेड’सारखी पाचशे पानांची जाडजूड अनुवादित कादंबरी आपल्या हाती ठेवणं त्याला सहज जमतं. याच अंकात गणेशच्या स्वत: अनुवाद केलेल्या कविताही आहेत.

नेहमीप्रमाणेच प्रदीप खेतमर या धडपड्या मित्रानं या अंकाचीदेखील अत्यंत देखणी मांडणी केली आहे. फाँटची निवड, अक्षरमांडणी इतकी छान करतो प्रदीप, की अंक हातातून खाली ठेवावासाच वाटत नाही. या अंकातली मांडणी तर अप्रतिम झालीय. आणि विष्णूवरच्या प्रेमापोटी ती अधिकच छान जमून येते. मैत्रीचे बंध असे घट्ट होत जातात.

आपल्या सर्वांचे आवडते कथालेखक आसाराम लोमटे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारताना केलेलं अप्रतिम भाषण, काव्यात्मतेची चिकित्सा करणारा आशुतोष जावडेकरांचा आणि ममता कालियांच्या कवितेवरील डॉ. योगिनी सातारकर-पांडे यांचा लेख, प्रणव सखदेव यांची कथा, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी लिहिलेलं ऐश्वर्य पाटेकर यांच्या खूप प्रतिसाद मिळत असलेल्या आत्मनिवेदनात्मक कादंबरी असलेल्या ‘जू’ या ग्रंथावरील परीक्षण, एरिक फ्रीड या ऑस्ट्रियन कवीच्या कवितांचा जर्मन भाषेतून इंग्लिशमधे जयश्री हरी जोशी यांनी केलेला अनुवाद, तसेच मराठीतील सुप्रसिद्ध कवी प्रज्ञा दया पवार, अजय कांडर, रवी कोरडे, ऐश्वर्य पाटेकर, फेलिक्स डिसोझा यांच्या कवितांचे अनुवादही या अंकात आहेत. या अंकासाठी अनुवादाचे अत्यंत जिकिरीचे व मोलाचे सहकार्य प्रा. दिलीप चव्हाण (कार्यकारी संपादक, यशश्री, पुणे), मित्र कृष्णा किंबहुने, दीपक जाधव, महेश लीला पंडित, प्रा. अनिल फराकटे, जयश्री हरी जोशी, रमा हर्डीकर व गणेश विसपुते यांनी केले आहे. हा अंक खरं तर त्यांच्या, तसेच विष्णू व प्रदीप यांच्या अपार कष्टाचं फलित आहे. 

‘काव्याग्रह’चा प्रवास दशकभराची दमदार वाटचाल करतोय. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट वाङ्मयीन नियतकालिकाचा पुरस्कार नुकताच जाहीर झालाय. सव्वीस मे रोजी पुरस्कार वितरण होईपर्यंत कदाचित ‘काव्याग्रह’चा देखणा इंग्रजी अंक आपल्या हाती असेल.

अखंड धडपड करणाऱ्या या मित्राचं मनापासून अभिनंदन! त्याच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!

- श्रीधर नांदेडकर
ई-मेल : shri.nandedkar@gmail.com
मोबाइल : ९४२३२ ३३६३१

(लेखक नव्वदोत्तरी पिढीतील गांभीर्याने कवितालेखन करणारे कवी आहेत. ‘परतीचा रस्ता नाहीय’ हा त्यांचा बहुचर्चित कवितासंग्रह आहे.)

(‘काव्याग्रह’मधील निवडक लेख आपल्याला दर पंधरा दिवसांनी, शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचता येतील.) 
(‘काव्याग्रह’च्या वर्गणीसाठी संपर्क : विष्णू जोशी, संपादक, काव्याग्रह - ९६२३१ ९३४८०, ७५८८९ ६३२०२)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
रावसाहेब कुवर About
काव्याग्रहच्या इंग्रजी अंकाचे स्वागत.
0
0
पांडुरंग सुतार About
काव्याग्रहला मनःपुर्वक शुभेच्छा !! श्रीधर नांदेडकर सर, आपण यथोचीत पाठराखन केली आहे. काव्याग्रहचे साक्षेपी संपादक विष्णू जोशी यांचे अभिनंदन !!
0
0

Select Language
Share Link
 
Search