Next
‘प्रमोद महाजन यांनी भाजप नेतृत्वाची पिढी घडवली’
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
प्रेस रिलीज
Saturday, May 04, 2019 | 03:57 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांनी ‘भाजप’ची आजची राज्यातील नेतृत्वाची पिढी घडवली. प्रमोदजींचा संघटक ते नेता हा प्रवास अनुभवताना त्यांच्याकडे पाहत आम्ही खूप काही शिकलो,’ असे कृतज्ञापूर्वक उद्गार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढले.

प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन मे २०१९ रोजी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘भाजप’ प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तावडे बोलत होते. या वेळी मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, माजी प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, प्रदेश सचिव सुरेश शहा, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले व प्रदेश कार्यालय सहसचिव शरद चव्हाण यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जाधव यांनी केले.

तावडे म्हणाले, ‘भाजपचे सध्या राज्यात काम करत असलेले आम्ही सर्व नेते प्रमोद महाजन यांच्याकडे पाहत राजकीयदृष्ट्या घडलो. त्यांच्याकडून राजकीय विश्लेषण आणि पक्षकार्यातील शिस्त शिकलो. प्रमोद महाजन यांचे आर्थिक व्यवहार काटेकोर असत. निवडणुकीसाठी गोळा केलेल्या निधीचा पूर्ण हिशेब ते पक्षाला सादर करत असत. त्यांच्या कृतीतून अनेक छोट्या छोट्या गोष्टी कार्यकर्ते शिकले. ‘भाजप’ची आजची आर्थिक शिस्त प्रमोद महाजन यांनी घालून दिलेल्या नियमांमुळे आहे. पक्षकार्यासाठी प्रवास करताना वाटेतल्या गावातही ‘भाजप’चे कार्य चालू आहे का आणि ते कसे वाढवता येईल याचा ते विचार करायचे. अनेक कार्यकर्ते त्यांनी हेरले आणि त्यांना पक्षकार्यात सहभागी केले.’

‘चौकटीच्या बाहेर पडून वेगळा विचार करणे हे प्रमोद महाजन यांचे वैशिष्ट्य होते. पुढच्या काळात कशा घडामोडी घडतील याचा त्यांना अचूक अंदाज होता. केंद्रीय दूरसंचारमंत्री असताना त्यांनी एक दिवस सर्वसामान्य माणसाच्या हातातही मोबाइल फोन असेल असा अंदाज वर्तवला होता. त्या काळात संपन्न लोकांकडेही मोबाइल फोन क्वचितच असे; पण काळाच्या ओघात प्रमोद महाजन यांचा अंदाज अचूक ठरला, हे आपण पाहतो,’ असे तावडे यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search