पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्रच्या द्रष्ट्या संस्थापकांनी लावलेल्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, बँकिंग सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा सन्माननीय ग्राहकांना आपुलकीच्या सेवेसह देत असल्याने अडीच कोटींपेक्षा अधिक ग्राहकांचा विश्वास या बँकेने संपादन केला आहे आणि हीच या बँकेची खरी शक्ती आहे,’ असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी केले.
बँकेचा ८४ वा व्यवसाय वर्धापन दिन शनिवारी, नऊ फेब्रुवारी २०१९ रोजी येथील मुख्य कार्यालयासह बँकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. हा दिवस कर्मचाऱ्यांचा ‘प्रतिबद्धता दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. त्या वेळी राजीव बोलत होते.
बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राउत म्हणाले, ‘कालानुरूप घडणारे बदल स्वीकारताना बँकेने कर्तव्यास ‘सेवा’ म्हणून स्वीकारल्याने कठीण काळातही बँक स्वत:चे अस्तित्व टिकवू शकली आणि या सेवाभावामुळेच बँकेच्या प्रगतीसह ग्राहकांचे हित जपू शकली.’
बँकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा म्हणाले, ‘खडतर काळात अधिक परिश्रमांची आवश्यकता असून, पुढील प्रत्येक दिवस कठोर स्पर्धेचा आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने सजग राहून जिव्हाळ्याची सेवा ग्राहकांना दिली, तर बँक अधिक सक्षम होईल. सर्व कर्मचारी ग्राहकांना अपेक्षित अशी आपुलकीची सेवा भविष्यातही देतील, असा मला विश्वास आहे.’
या वेळी कर्मचाऱ्यांनी गायन, एकपात्री नाट्यप्रयोग, नकला आदी कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. या वेळी पुणे शहर आणि पुणे पश्चिम विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह सर्व उच्चपदस्थ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.