Next
मुरबाडच्या म्हसा यात्रेत पशुप्रदर्शन
BOI
Monday, January 21, 2019 | 11:17 AM
15 0 0
Share this story

म्हसा यात्रेचा संग्रहित फोटोठाणे : जिल्ह्यात पशुपालन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने या वर्षी म्हसा यात्रेचे औचित्य साधून एक दिवसाचे भव्य जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शन २१ जानेवारी २०१९ रोजी आयोजित केले आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन भरेल. 

या वेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप व ठाणे जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यात्रेत एक भव्य सभामंडपामध्ये ३५ हून अधिक विविध माहितीचे स्टॉल लावले जाणार असून, पशुसंवर्धनविषयक माहिती ज्ञानाचे महापर्व शेतकरी, पशुपालक, बचत गट, युवा, महिला, डेअरी संस्था यांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

प्रदर्शनामध्ये विविध संकरित गायी, देशी जातीवंत गीर, थारपारकर, लालकंधारी, कांकरेज, राठी, डांगी, खिलार आदी गायी व वळू यांच्या जाती तसेच, अधिक दूध देणारी म्हैस व रेडे, शेळीपालनामधील नामवंत सिरोही, बीटल, सोजत, तोतापुरी, सुरती, उस्मानाबादी या जातीच्या दुर्मिळ शेळ्या पाहायला मिळणार आहेत. विविध जातीचे घोडे, कुक्कुटपालनमधील कोंबड्याच्या जातीही या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पशुखाद्य, पशुऔषधी, गोशाळा, औषधी चारा साक्षरता, स्वयंम योजना, शासकीय योजना, चारा पिके, दूध धारा काढणारी मिल्क मशीन, पशुसंवर्धन साहित्य व यंत्र उपकरणे या विषयांची अभ्यासपूर्ण दालने यात सजणार आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने पशुज्ञानाचा खजिनाच शेतकरी, पशुपालक, शिक्षित बेरोजगार आणि महिलांसाठी खुला होणार आहे.

म्हसा यात्रेत विक्रीसाठी ठेवलेल्या जातिवंत बैलांचा संग्रहित फोटोठाणे जिल्ह्यात शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यांत आता दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे; तसेच अनेक युवक शेळीपालन व गावरान देशी कुक्कुटपालनाकडे वळत आहेत. या सर्वांना दिशा देणारे हे प्रदर्शन आहे. म्हसा यात्रेत शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरे खरेदी-विक्रीसाठी महाराष्ट्रभरातून येतात. जनावरांचा मोठा बाजारच येथे भरतो. खिलार बैलजोडी हे या यात्रेचे मोठे वैशिष्ट्य समजले जाते. या यात्रेला भेट देण्यासाठी कर्जत रायगड, पालघर, ठाणे, नगर, नाशिक येथून अनेक लोक येतात.

याचेच औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे बोरीवली रोडवर या वर्षी यात्रेच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील शेतकरी पशुपालकांना व नागरिकांना ही संधी निर्माण करून दिली आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती उज्वला गुळवी, उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विनोद राईकवार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक समिती विविध पातळीवर कार्यरत आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी, सर्व जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक आमदार किसनराव कथोरे यांचेही सहकार्य लाभले आहे.

‘या प्रदर्शनात आदर्श पशुवैद्यकीय अधिकारी व आदर्श पशुपालक शेतकऱ्यांना उल्लेखनीय कामाबद्दल गौरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचा फायदा ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. या निमित्ताने पशुज्ञानाची महागंगाच अवतरणार आहे. यातून पशुक्रांती नक्कीच घडेल,’ असा विश्वास मुरबाड पंचायत समिती सभापती जनार्दन पादीर व उपसभापती सीमा घरत यांनी व्यक्त केला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link