Next
आदिवासींच्या प्रत्येक बोलीभाषेसाठी पाठ्यपुस्तके तयार व्हावीत : डॉ. प्रकाश आमटे
‘माडिया शिकू या’ पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Tuesday, July 02, 2019 | 11:03 AM
15 0 0
Share this article:पुणे :
‘देशाच्या लोकसंख्येत दहा टक्के असणारा आदिवासी समाज एके काळी जंगलाचा राजा होता. या समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी शिक्षणाची गरज आहे; मात्र शिक्षण घेताना भाषा हीच त्यांच्या समोरची मुख्य अडचण आहे. ‘माडिया शिकू या’ या पुस्तकाच्या माध्यमातून ही अडचण दूर होण्यास मदत होईल. अशी पुस्तके आदिवासींच्या प्रत्येक बोलीभाषेत तयार करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. 

आदिवासी विकास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेले ‘माडिया शिकू या’ हे पाठ्यपुस्तक व अभ्यासपुस्तक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात एक जुलै रोजी प्रकाशित झाले. त्या वेळी डॉ. प्रकाश आमटे बोलत होते. या वेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे, जर्मन भाषातज्ज्ञ तथा माडी भाषेच्या अभ्यासक डॉ. मंजिरी परांजपे, संस्थेच्या उपसंचालिका माधुरी यादवाडकर, माडिया समाजाची विद्यार्थिनी मनीषा मदजी आदी उपस्थित होते. 

डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, ‘आदिवासी समाज आणि त्यांची संस्कृती ही मुळातच समृद्ध आहे; मात्र त्यांच्यात असणाऱ्या शिक्षणाच्या आभावामुळे त्यांना नागर संस्कृतीसोबत जुळवून घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत असून अंधश्रद्धेच्या जोखडातून हा समाज आता मुक्त होत आहे. या समाजातील अनेक तरुण शिक्षण घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत.’ 

डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, ‘सध्याचा मुख्य प्रवाहातील समाज अनेक प्रश्नांनी गोंधळला आहे. या समाजाच्या प्रश्नांची उत्तरे आदिवासी समाजाच्या संस्कृतीत दडलेली आहेत. आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अनेक उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. बोलीभाषा या संस्कृतीच्या वाहक असून, त्यांच्या संवर्धनाचे काम होणे आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या पाठीशी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था उभी राहणार आहे.’या वेळी ‘कोड ऑफ एथिक्स’ आणि प्रमुख ११ आदिवासी भाषांच्या क्रमिक पुस्तकांसाठी वापरण्याच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन, तसेच इयत्ता पहिलीसाठी मराठी अभ्यासक्रमावर आधारित बोलीभाषेतील दृक्श्राव्य साहित्य असलेल्या पेनड्राइव्हचे लोकार्पण करण्यात आले. 

या वेळी पुस्तकाच्या लेखिका डॉ. मंजिरी परांजपे, मनीषा मदजी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पुस्तकाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. 

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ओळख करून देऊन संस्थेच्या कार्याबाबतची माहिती संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले, तर आभार विनीत पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला अभ्यासक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

(मराठीच्या विविध बोलीभाषांबद्दलचा बोलू बोलीचे बोल हा लेख वाचण्यासाठी आणि विविध बोलींतील व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 94 Days ago
Why should anybody be inclined to learn this language ?
0
0
BDGramopadhye About 94 Days ago
Even books catering to entertainment do not sell well.
0
0
BDGramopadhye About 96 Days ago
They would be useful to specialists who study Languages . But ,as text-books ?
0
0

Select Language
Share Link
 
Search