Next
‘सुखकर्ता बंधारा हे पोलीस दलाचे रचनात्मक काम’
BOI
Monday, May 22, 2017 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

सांगली : ‘गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीद्वारे ध्वनिप्रदूषण करण्याऐवजी जलसंचयाकरिता निधी दिला. जिथे जलसंचय होईल त्याच ठिकाणी समृद्धी येईल, हा मंत्र समजून सांगली पोलीस विभागाने काम केले आहे. सुखकर्ता बंधाऱ्याचे काम पोलीस दलाचे रचनात्मक काम असून, यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडेल. इतरही ठिकाणी सर्वांनी अशा प्रकारचा पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गेल्या वर्षीच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथील सिमेंट नाला बांधाचे नुकतेच लोकार्पण झाले. पोलीस विभागाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवून जमा केलेल्या निधीतून हा बंधारा बांधण्यात आला आहे. या वेळी सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व पोलीस टीमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. ‘सुखकर्ता बंधाऱ्याचे काम अतिशय मूलभूत आहे. पाणी थांबले, मुरवले, जमिनीत गेले, पाण्याची पातळी वाढली, तर शेतकरी समृद्घ होऊन अर्थव्यवस्था मजबूत होते. अशा मूलभूत कामामध्ये पोलीस विभागानेही पुढाकार घेतला आहे. शिव बंधारा, भीम बंधारा, दुर्गा बंधारा ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. ध्वनिप्रदूषण करण्याऐवजी एक रचनात्मक काम करून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये या पाण्यातून परिवर्तन आणण्याचा हा प्रयत्न आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांचे, पोलीस विभागाचे व गावच्या नागरिकांचे अभिनंदन केले.

अशी राबवली संकल्पना
विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि दत्तात्रय शिंदे यांच्या पुढाकारातून जिल्हा पोलीस दलातर्फे गेल्या वर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन करण्यात आले होते. ‘डॉल्बीमुक्तीकडून जलयुक्त’कडे या नावीन्यपूर्ण आणि अभिनव योजनेच्या आवाहनाला जिल्ह्यातील ८६३ गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून २७ लाख ८० हजार रुपयांची रक्कम उभी राहिली. ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेस मदत म्हणून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या जमा रकमेतील १३ लाख २४ हजार ७९१ रुपयांतून मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे सिमेंट बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यास सुखकर्ता बंधारा असे नाव देण्यात आले. या बंधाऱ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ अंतर्गत मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे सिमेंट नाला बांधाचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. हे काम मार्च २०१७मध्ये पूर्ण झाले आहे. या सिमेंट बंधाऱ्याची लांबी ३० मीटर आहे. त्याची उंची १.७५ मीटर असून, पाणीसाठ्याची क्षमता ७.५० सहस्र घनमीटर आहे. हा सिमेंट बंधारा बांधल्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवून शेतीसाठी, तसेच विहिरींची व कूपनलिकांची पाणीपातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search