Next
सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरातील सभेत घोषणा
BOI
Wednesday, January 09, 2019 | 06:36 PM
15 0 0
Share this article:


सोलापूर :  सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या एक हजार कोटींच्या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी, नऊ जानेवारी रोजी सोलापूर येथे जाहीर सभेत केली.  

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भूमिगत मलनिस्सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या तीन यंत्रणांचे लोकार्पण आणि सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विभागवार आधारित पाणी पुरवठा व स्वच्छता यंत्रणा सुधारणा विषयक संयुक्त प्रकल्प, उजनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी; तसेच अमृत योजनेंतर्गत भूमिगत मलनिस्सारण योजनेची पायाभरणी आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीस हजार घरांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. 

 या वेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसय्या आडम आदी मान्यवर उपस्थित होते. 

भाषणाची सुरुवात मराठीतून आणि सोलापूरच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. 

‘राज्यातील चार विमानतळांचा विकास करण्याचे काम सुरू असून, लवकरच उडान योजनेतून सोलापूरहूनही विमानसेवा सुरू होईल’, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले. ‘सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करत आणली असून, ग्रामसडक योजना, राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरण आणि सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज, पाणी आणि चांगल्या रस्त्यांसाठी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. काही बाबी पूर्ण झाल्या असून, उर्वरित कामांनीही गती घेतली आहे,’ असे ते म्हणाले. 

‘स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या सर्व सोयीसुविधा सोलापूर शहराला मिळतील. देशात स्मार्ट सिटी अंतर्गत लाखो कोटींची कामे सुरू आहेत. पुढील काही वर्षांत जगातील सर्वाधिक विकसित होत असणाऱ्या दहा शहरांच्या यादीत सर्व शहरे आपल्या देशातील असतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

‘सबका साथ,सबका विकास’ ही आमच्या कामाची संस्कृती आणि परंपरा आहे. त्याला अनुसरून देशातील गोरगरीब, कामगार, मध्यमवर्गाच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर आमचा भर आहे. योजनांची वेळेत आणि गतीने पूर्ण करणे आणि सामान्यांसाठी त्याचा थेट लाभ मिळवून देणे याला आमचे प्राधान्य आहे,’ असेही मोदी यांनी नमूद केले. 

‘सोलापूर-उस्मानाबाद चारपदरी महामार्गामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची सोय उपलब्ध करुन देणार आहेत.भारतमाला योजनेंतर्गत अनेक रोजगाराच्या संधी युवा वर्गाला उपलबद्ध झाल्या आहेत’, असे मोदी यांनी सांगितले.  

‘देशात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे केंद्र शासनाने ठरवले आहे. गेल्या चार वर्षांत १४  लाख घरे तयार झाली असून, नजीकच्या काळात ३७ लाख घरे पूर्ण होणार आहेत. यापूर्वीच्या काळात घरकुल तयार करण्याच्या कामांचा वेग पाहता, ही गती सामान्यांना अधिक घरे उपलब्ध करुन देणारी ठरली आहे,’ असे मोदी यांनी स्पष्ट केले. 

या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते रे-नगर गृहनिर्माण संस्थेतील दोन महिला लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले.

‘देशात आतापर्यंत जी कामे वेगाने पूर्ण झाली, ती या सरकारच्या काळातच झाली आहेत. सध्या देशात एक  लाख तीस हजार किलोमीटरचे रस्ते तयार झाले असून, गेल्या साडेचार वर्षात ४० हजार किलोमीटर रस्ते तयार केले आहेत. याशिवाय, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, चौपदरीकरण आणि विद्युतीकरण या कामांनाही गती दिली आहे. केवळ देशाच्या एका भागावर लक्ष केंद्रीत न करता सर्वसमावेशक विकास करण्यावर भर आहे’, असे त्यांनी सांगितले.

‘केंद्र सरकारने कालच सामान्य वर्गासाठी कोणत्याही वर्गाचे आरक्षण न बदलता दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभेत घेतला आहे. गरिबांनाही विकासाची संधी मिळण्यासाठी आणि त्यांच्यातील अन्यायाची भावना या निर्णयामुळे संपेल. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामकाजाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध आहे. एक हजार कोटी रुपयांची कामे आज सुरू होत आहेत. रोजगारनिर्मिती करणारी शहरे तयार होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी ४५० कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. उजनी धरणातून थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेमुळे नागरिकांची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मलनिस्सारण आणि सांडपाणी व्यवस्थापनामुळे उपलब्ध होणारे पाणी राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे उजनी धरणातून या प्रकल्पासाठी देण्यात येणारे पाणी सिंचनासाठी वापरता येईल. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरू होत आहेत. आवास योजनेंतर्गत ३० हजार घरांचा सर्वात मोठा प्रकल्प तयार होत आहे.’

‘या सरकारच्या काळातच भूमिपूजन झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळाही याच काळात होत आहे. पालखी मार्गाचा विकास केल्याने लाखो वारकऱ्यांची सोय झाली आहे. राज्याला सर्वोत्तम बनविण्याचा आमचा संकल्प असून, केंद्र सरकारच्या मदतीने हे काम पूर्ण करू,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून, याकामी केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी आहे. तत्काळ दुष्काळ पाहणीसाठी पथक पाठविण्यात आले. त्यांनी केंद्राकडे अहवाल सादर केला असून, राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत लवकर मिळावी’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी, विशेष करुन रस्ते विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. याशिवाय, जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या आणि मोठ्या प्रमाणात होणारे ऊसाचे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती आहे. यातून मार्ग काढण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन घेणे आणि त्याचा वापर वाढविणे यास प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

पालकमंत्री देशमुख यांनी प्रास्ताविक केले.  विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 177 Days ago
Map of the route ? When will the work start ? How long will it take ?
0
0
Arun Mali, Tal Pandharpur About 256 Days ago
Khup Chhan
0
0

Select Language
Share Link
 
Search