Next
‘चारा छावण्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करा’
मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
प्रेस रिलीज
Thursday, March 07, 2019 | 04:48 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ज्या जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी छावण्यांचे प्रस्ताव आले आहेत, तेथील प्रस्ताव तातडीने मंजूर करून छावण्या सुरू करावेत. तसेच नादुरुस्त जुन्या पाणी पुरवठा योजना तातडीने दुरुस्त करून सुरू कराव्यात,’ अशा सूचना महसूल मंत्री तथा मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना तातडीने मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पाटील यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर आदी या वेळी उपस्थित होते.

दुष्काळ निवारणासाठी योजलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पाटील म्हणाले, ‘दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित केलेल्या निधीतील सुमारे दोन हजार ७०० कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. ऊर्वरित निधी तातडीने वितरीत करण्यात यावा. आतापर्यंत राज्यात २८ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यात चारा छावण्यांची मागणी आहे, तेथील छावण्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत. छावण्यातील जनावरांच्या औषधांसाठी पशुसंवर्धन विभागास निधी देण्याचा तसेच छावण्यातील जनावरांची संख्येची मर्यादा ५०० वरून तीन हजार करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा.’

‘पाणी टंचाई असलेल्या गावातील दुरुस्तीअभावी बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना, तसेच नवीन पाणी पुरवठा योजना तातडीने दुरुस्त करून सुरू कराव्यात. या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा स्थापन करावी. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठ्यासाठी १४७ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. एप्रिल-मे महिन्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नवे स्त्रोत शोधून ठेवावेत. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला कामे देण्यात यावीत,’ अशा सूचनाही पाटील यांनी या वेळी दिल्या.

रोजगार हमी योजनेअंतर्गत १५१ दुष्काळी तालुक्यांमध्ये ५० दिवस अतिरिक्त काम देण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. सध्या राज्यात रोजगार हमी योजनेतील ४२ हजार ७७० कामे सुरू असून, त्यावर तीन लाख ७४ हजार ६८६ मजूर काम करत आहेत. पाच लाख ७९ हजार ४४० कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहेत. कामाची मागणी होताच, तातडीने मागेल त्याला कामे देण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. दुष्काळीभागातील सध्या शेती कर्जाची वसुली थांबविण्यात आली असून, कर्जाच्या पुनर्गठणाची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search