Next
रोबोटिक सर्जरीने मूत्रपिंडातील ट्यूमर काढण्यात यश
रुबी हॉल क्लिनिकमध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
BOI
Friday, May 17, 2019 | 05:24 PM
15 0 0
Share this article:

पुणे : रोबोटिक सर्जरीच्या मदतीने एका ५५ वर्षीय गृहस्थांच्या मूत्रपिंडात असलेला मोठा ट्यूमर काढण्यात रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे या व्यक्तीचे मूत्रपिंड वाचवणे शक्य झाले असून, तीव्र पोटदुखीपासून त्यांची मुक्तता झाली आहे. 

तीव्र पोटदुखीमुळे पिंपरी चिंचवडमधील या ५५ वर्षीय गृहस्थांचे जगणे असह्य झाले होते. सोनोग्राफीत मूत्रपिंडात मांस असल्याचे आढळून आल्याने रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. हॉस्पिटलमध्ये आणखी काही चाचण्या केल्यानंतर ट्यूमर संपूर्णपणे मूत्रपिंडाच्या आतमध्ये विकसित झाला असल्याचे स्पष्ट झाले. मूत्रपिंडाच्या फक्त २० टक्के कर्करोगांमध्ये अशी दुर्मिळ स्थिती उद्भवते. या रुग्णाचे मूत्रपिंड चांगले असल्याने ट्यूमरसह मूत्रपिंड काढण्याऐवजी फक्त ट्यूमर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. रोबोटिक सर्जरीच्या सहाय्याने ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अवघ्या दोन तासात यशस्वीपणे करण्यात आली. 

याबाबत अधिक माहिती देताना रूबी हॉल क्लिनिकमधील रूपा राहुल बजाज सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक सर्जरीचे संचालक डॉ. हिमेश गांधी म्हणाले, ‘सामान्यत: ट्यूमर मूत्रपिंडावर आढळून येतात. मूत्रपिंडाच्या कर्करोगांमध्ये अशी दुर्मिळ स्थिती आढळण्याचे प्रमाण फक्त २० टक्के आहे. यामुळे अनेक आव्हाने तयार होतात. सामान्यत: पृष्ठभागावर आढळून येणाऱ्या ट्यूमरचे ठिकाण आपल्याला कळू शकते;परंतु हा ट्यूमर मूत्रपिंडाच्या संपूर्णपणे आत असल्याने त्याचे नेमके ठिकाण कळणे अवघड होते. त्यामुळे शस्त्रक्रियेद्वारे असे ट्यूमर काढण्यामध्ये अनेक अडचणी उद्भवतात आणि गुंतागुंतीचा धोकादेखील बळावतो. अशा स्थितीत मूत्रपिंड काढणे किंवा ट्यूमर काढून टाकणे हे दोन पर्याय असतात, मात्र या रूग्णाचे मूत्रपिंड ट्यूमर वगळता चांगल्या स्थितीत होते आणि त्यामुळे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रोबोटिक्सच्या साहाय्याने ट्यूमर काढण्याचा पर्याय निवडला. रोबोटिक असिस्टेड सर्जरीमुळे मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेमध्ये कमीत कमी छेद, कमी रक्तस्त्राव आणि रूग्णांचे लवकर बरे होणे शक्य झाले आहे.’ 

डॉ. गांधी पुढे म्हणाले, ‘मूत्रपिंडात झालेली कुठलीही ट्यूमरची छोटी वाढ ही कुठल्याही ढीगातून सुई शोधण्यासारखे आहे, मात्र अल्ट्रासाऊंडमुळे याची खोली व कडा, त्याची जाडी व संभाव्य प्रभावित होऊ शकणाऱ्या वाहिन्यांबाबत माहिती मिळू शकते. त्यामुळे आम्ही मूत्रपिंडाच्या पृष्ठभागावर अल्ट्रासाऊंडचा वापर करून त्यातील ट्यूमरचे नेमके ठिकाण शोधून ते काढण्यात यश मिळविले. या दोन तासांच्या शस्त्रक्रियेमध्ये फक्त २० मिली रक्तस्त्राव झाला आणि चार सेंटीमीटरचा मास्क काढण्यात यश मिळाले. शस्त्रक्रियेनंतर बायोप्सी करण्यात आली. ज्यामध्ये ट्यूमर संपूर्णपणे काढला गेला आहे हे निश्चि्त झाले, परिणामी आम्हाला मूत्रपिंड वाचविण्यात यश मिळाले.’

रोबोटिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. मनिषा करमरकर म्हणाल्या, ‘ही स्थिती आव्हानात्मक असूनदेखील शस्त्रक्रिया केल्यानंतर तीन दिवसांतच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही वर्षात रोबोटिक सर्जरी तंत्राने नवा मापदंड प्रस्थापित केला असून, शल्यविशारदांचे कौशल्य, बहुआयामी सांघिक कार्य आणि रूग्णाच्या गरजेनुसार असलेला दृष्टीकोन यामुळेच हा बदल घडून आला आहे.’

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘रूबी हॉल क्लिनिकच्या रोबोटिक सर्जरी विभागाने सुरूवातीपासूनच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी नावलौकिक कमावला आहे. अल्ट्रासाऊंडसारखी सहाय्यक उपकरणे जोडलेला हा एकमेव ‘दा विन्सी रोबोट’ रुबीमध्ये उपलब्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे परिणामांमध्येही चांगला बदल दिसून येत आहे. वैद्यकीय सेवांमध्ये सतत सुधारणा करून रूग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी आम्ही यापुढेही तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत राहू.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search