Next
जीना इसी का नाम है!
BOI
Wednesday, November 28, 2018 | 11:32 AM
15 0 0
Share this story

५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतल्या प्राथमिक फेरीच्या अखेरच्या दिवशी (२७ नोव्हेंबर २०१८) ‘जीना इसी का नाम है’ हे नाटक सादर झालं. संध्या देशपांडे यांनी लिहिलेलं आणि ऋत्विज आपटे यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक रत्नागिरीच्या ‘श्रीरंग’ या संस्थेनं सादर केलं. त्या नाटकाचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेला हा परिचय...
........
रिअॅलिटी शो हा जणू आज परवलीचा शब्दच झाला आहे. नृत्य, गायन, अभिनय यांबरोबरच खडतर कामगिरी करणं, जवळजवळ लावलेल्या काटेरी तारांची कुंपणं  ओलांडणं यांसारख्या स्पर्धादेखील आयोजित करून छोट्या पडद्यावरून त्यांचं थेट प्रक्षेपण केलं जातं. अशा स्पर्धांमधल्या विजेत्यांना बक्षिसंही मोठमोठ्या रकमांची दिली जातात. अशाच एका स्पर्धेत सहभागी होऊन दहा कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावणाऱ्या सुरेश हरी केळुसकर नावाच्या मनुष्याची गोष्ट ‘जीना इसी का नाम है’ या नाट्य कलाकृतीच्या रूपाने रत्नागिरीकरांना पाहायला मिळाली. संध्या देशपांडे यांनी लिहिलेलं हे नाटक ऋत्विज आपटे यांनी दिग्दर्शित केलं होतं नि रत्नागिरीच्या ‘श्रीरंग’ या संस्थेनं रंगमंचावर आणलं होतं. 

दहा कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक जिंकण्यासाठी ज्या स्पर्धेत भाग घ्यायचा, ती तशी खूपच साधी अन सोपी होती. स्पर्धकानं १०० दिवस एकट्यानं राहायचं... बस्स! संयोजक एक सुसज्ज खोली पुरवणार होते. तिथं एसी, टीव्ही अशा सुविधा होत्या. वाचायला पुस्तकं होती. ऑफिसची घाई नाही, बायकोची कटकट नाही, या कल्पनेनं सुरेश खूश झाला होता. त्यानं उत्साहानं स्पर्धेतली वाटचाल सुरू केली.

वरवर दिसायला सोपी वाटणारी ती स्पर्धा हळूहळू दात दाखवायला लागली. तिथं एसी होता, टीव्ही होता; पण त्यांचे रिमोट नव्हते. संयोजकांची एक कार्यकर्ती येऊन ते सुरू करून देऊन गेली. जाताना पुस्तकं घेऊन गेली. टीव्ही सुरू झाला, तरी वीज बऱ्याचदा गेलेली. सुरुवातीला छान वाटलेलं एकटेपण हळूहळू खायला उठू लागलं.

बरं, ते ‘एकांता’त राहणं म्हणजे नुसतं काही बसून-झोपून-खाऊन दिवस काढणं नव्हतं. त्याच्यावर सीसी कॅमेऱ्यांचा पहारा होता आणि खोलीत बसविलेल्या स्पीकरवरून आता त्यानं काय केलं पाहिजे, त्याबद्दल सूचनाही दिल्या जायच्या. स्पर्धेला सुरुवात होताच त्यानं त्याच्या पत्नीच्या भूमिकेत जायचं, असा पहिला आदेश मिळाला. खोलीतल्या कपाटात त्यासाठी कपडे वगैरे तयार होतेच. हे आदेश नसतील, तेव्हाचं राहणं मात्र जिवावर यायचं. मग तो कवितेतून आपली व्यथा मांडायचा. नाव रिअॅलिटी शो असलो, तरी प्रत्यक्षात सगळं खोटं-खोटं!

आदेश पण त्याला काय काय मिळत! ७५व्या मजल्यावर त्याच्या पत्नीचा फ्लॅट आहे. तिला भेटायला जायचं, पण वीज गेल्यानं लिफ्ट बंद पडलीय. त्यामुळे जिने चढून जायला हवं. तो जातो. ४० मजले चढतो. शेवटी घेरी येऊन पडतो. त्याचा स्पर्धक थोटा नि लंगडा आहे. म्हणून त्यानंही स्वतःला तसं मानून त्या दोन भूमिका करायच्या. त्या १०० दिवसांच्या वास्तव्यात त्याची नावंही कितीदा बदलतात. बाबूराव, बाबू कासीम, केळुसकरचा कडलासकर काय होतो, करमाळकर काय होतो. कुणीही त्याला कुठल्याही नावानं पुकारतं. छे! वेड लागायची पाळी! अहो पाळी काय? वेड लागतंच त्याला!

शेवटी कसेबसे हे १०० दिवस पुरे होतात. तो जिंकतो. १० कोटी रुपयांचा भला थोरला चेक त्याला देण्यात येतो.

इकडे त्यानं ५० दिवस पुरे केले, तेव्हाच फायनान्स कंपन्यांची माणसं येऊन त्याच्या पत्नीला आलिशान फ्लॅट, फर्निचर, भारीतली मोटार देऊन गेली. लाखो रुपयांची फी आकारणाऱ्या एका श्रीमंती रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तिनं मुलांना दाखलसुद्धा केलं. त्याला मात्र लंगड्या-पांगळ्यांसाठी काही करायचं होतं; पण पैसे संपले. ते राहून गेलं. मग तो पुन्हा आणखी मोठ्ठं बक्षीस ठेवलेल्या स्पर्धेत भाग घेतो. ही स्पर्धा आणखी कठीण असते. त्याला राहायच्या खोलीत जेमतेम उभं राहण्याइतपतच जागा असते. तो मनाची तयारी करू लागतो... पडदा पडतो.

नाटकाच्या कथानकाचं लेखन प्रभावी झालंय. सुरेशची भूमिका करणाऱ्या गोपाळ जोशी या कलाकारानं आपलं कौशल्य पणाला लावलंय. जिने चढणं, धापा टाकणं, लंगडणं, एका हातानं वावरणं, वेड्याचे हावभाव करणं, आईच्या निधनाची खबर येताच व्यथित होणं, या सगळ्या क्रिया त्यांनी कमालीच्या ताकदीनं सादर केल्यात.

‘जीना इसी का नाम है’ या नावाच्या नाटकाबरोबरच ५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची रत्नागिरीतली प्राथमिक फेरी समाप्त झाली. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सुरू झालेल्या या फेरीत ११ नाटकांचा स्पर्धक म्हणून सहभाग होता. प्रत्यक्षात त्यापैकी १० नाटकं सादर झाली. रत्नागिरी शहरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडली. प्रा. रमेश कोटस्थाने, प्रवीण तथा पी. डी. कुलकर्णी आणि वैशाली खरे या ज्येष्ठ रंगकर्मींनी या फेरीच्या परीक्षणाची जबाबदारी सांभाळली.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धा संचालक स्वाती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध फेऱ्यांच्या माध्यमातून राज्याच्या निरनिराळ्या विभागांत होत आहेत. रत्नागिरी येथील फेरीच्या समन्वयाची जबाबदारी नंदकिशोर जुवेकर यांच्या नेतृत्वाखाली कश्ती शेख, रोहित नागले यांनी पार पाडली.

संपर्क : राजेंद्रप्रसाद मसुरकर : ९९६०२ ४५६०१

(या स्पर्धेतील सर्व नाटकांचे परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link