Next
‘घटक पक्षांची मदत घेऊन मोदी सरकार येईल’
ज्योतिषतज्ज्ञ सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकीत
प्रेस रिलीज
Tuesday, May 07, 2019 | 03:33 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘ग्रहस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला (भाजप) पूर्ण बहुमत मिळाले नाही, तरी घटक पक्षांची मदत घेऊन मोदी सरकार येईल,’ असे  भाकीत ज्योतिष तज्ज्ञ, ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि ‘ज्योतिष ज्ञान’ मासिकाचे संपादक सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले.

ज्योतिष विद्या प्रसारक मंडळातर्फे ‘मे महिन्यातील ग्रहमान आणि लोकसभा निवडणूक निकाल’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. हे व्याख्यान टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ येथे पाच मे २०१९ रोजी झाले. या व्याख्यानासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

‘पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल; मात्र लोकसभेत मोदी विजयी ठरतील,’ असे भाकीत पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी मारटकर यांनी पुण्यातील ज्योतिष अधिवेशनामध्ये वर्तवले होते.

मारटकर म्हणाले, ‘देशाच्या पत्रिकेत राहू-मंगळ योग फारसा चांगला नाही. मोदींना निवडणुकीचा शेवटचा टप्पा चांगला नाही. धनू राशीतील नवपंचम योगामुळे सत्ताधारी ‘भाजप’ला पुन्हा सत्तास्थापनेची संधी मिळू शकते. गुरू ग्रह हा सत्ता टिकवायला उपयोगी पडेल; परंतु, रवी-शनी षडाष्टक योगामुळे ‘भाजप’ला पूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. घटक पक्षांची मदत घ्यावी लागेल. ‘भाजप’च्या राशीनुसार दशमेश गुरू लाभाचा आहे. सत्ता टिकू शकते.’

‘राहू, मंगळ भ्रमण राहुल गांधींना लाभाचे नाही, तरी काँग्रेस, राहुल यांची पत्रिका चांगली असल्याने १०० च्या आसपास जागा मिळतील. विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करणार; मात्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, तरी ‘भाजप’ची सत्ता येईल. चतुर्थेश शनी तृतीयस्थानी केतू-प्लूटोबरोबर असल्याने विरोधी पक्षासाठी बहुमत अवघड आहे,’ असे मारटकर यांनी सांगितले.  

‘राशी स्वामी मंगळ अष्टमात गेल्याने राहुल यांना सत्ता मिळणार नाही. काँग्रेसला पंतप्रधानपद मिळणार नाही, असे दिसते. मिथुन-रवीची पत्रिका असलेल्या राहुल गांधींना काही काळ धनू राशीत होणारे गुरुचे भ्रमण अनुकूल असल्याने काँग्रेसच्या जागा वाढतील; पण रवीसमोरून होणारे राहूचे भ्रमण त्यांना पंतप्रधानपदाचा योग नाही, असे दिसते. प्रियांका यांच्या धनु राशीत रवी आहे. त्यात गुरुचे भ्रमण असल्याने त्यांचा प्रभाव वाढला. त्या राहुल यांना मागे टाकून पुढे जातील. आता प्लूटोचे भ्रमण ‘भाजप’साठी महत्त्वाचे ठरेल,’ असे त्यांनी नमूद केले.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कन्या-रवीच्या पत्रिकेनुसार दशमस्थानी अनेक ग्रह असल्याने ‘भाजप’ला बळ मिळेल. रवी पत्रिकेच्या ‘भाजप’ला दशमेश गुरूचे भ्रमण दशमातून असल्याने, प्लूटो दशमात असल्याने यश मिळू शकते. रवी कुंडलीच्या नरेंद्र मोदी यांना चतुर्थातून होणारे गुरूचे भ्रमण सत्ता मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. २०२२ नंतर मंदी, बेरोजगारीचे प्रश्न पुढे येतील. मोदींना त्यावेळी अपयश स्वीकारावे लागेल. मोठे संक्रमण त्यावेळी होऊ शकते. मकरेचा शनी, मकरेचा प्लूटो बदल घडवेल. हर्षलचा प्रभाव २०२० नंतर दिसेल. तेव्हा प्रियांका गांधींचा प्रभाव वाढेल,’ असे ते म्हणाले.

‘मकर रास ही सेवेची असल्याने मोदींच्या बोलण्यात सेवक, चौकीदार शब्द येतात,’ असे नमूद करून मारटकर पुढे म्हणाले, ‘शरद पवार यांच्या पत्रिकेत वृश्चिक राशीतील रवीकडून शनी धन स्थानातून भ्रमण करीत असल्याने आठव्या स्थानात राहू-मंगळ आहे. त्यामुळे ते पंतप्रधान होणे कठीण दिसते. मायावती यांच्या जागा वाढतील, शनी बारावा असल्याने त्या पंतप्रधान होणार नाहीत. रवी शुभयोगात असल्याने शिवसेनेच्या एक -दोन जागा कमी झाल्या, तरी प्रभाव राहील. रवीवरून शनी भ्रमण असल्याने ममता यांना पंतप्रधान होता येणार नाही. एकूण त्यांची पत्रिका चांगली असली, तरी आता ग्रहस्थिती पूरक नाही.’

छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची राहील. त्यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता येणार नाही. वृषभ राशीच्या नितीन गडकरींना २०२२मध्ये चांगली परिस्थिती असल्याचेही मारटकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search