कर्जत (रायगड) : आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या वसुंधरेचे जतन आपण स्वतः करायचे असते याची जाण ठेवून सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून कर्जत येथे वृक्षारोपण केले. प्राणिप्रेमासाठी प्रसिद्ध असणारी जुई पर्यावरणप्रेमीदेखीलआहे याचा प्रत्यय या निमित्ताने आला.
या उपक्रमाबद्दल बोलताना जुई म्हणाली, ‘दर वर्षी पावसाळ्यात वर्षातून एकदा तरी आम्ही गडकरी कुटुंबीय स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने भेटतो आणि वृक्षारोपण करतो. हा आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला उपक्रम आहे. आम्ही शक्यतो औषधी गुणधर्म असणारी झाडे लावतो. म्हणजे तुळस, कडुनिंब, जास्वंद, निलगिरी, वड इत्यादी. तसेच लहानपणी आमच्या मुख्य घरी आम्हा सर्व भावंडांच्या हस्ते नारळाची झाडे लावण्यात आली होती. त्या माडांच्या रूपाने आमची लहानपणीची आठवणच जोपासली गेली आहे, असे आम्हालावाटते. सध्या वाढत्या प्रदूषणामुळे, औद्योगीकरणामुळे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होतआहे. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी पाच झाडे तरी लावावीत, असे मला मनापासून वाटते.’