Next
‘पुलं म्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल’
‘साहित्यवेध’ व ‘संवाद’तर्फे छायाचित्र, व्यंग्यचित्र प्रदर्शन
प्रेस रिलीज
Monday, November 12, 2018 | 02:44 PM
15 0 0
Share this article:

व्यंग्यचित्र व छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी डावीकडून अलोक निरंतर, सुनील महाजन, डॉ. श्रीपाल सबनीस, कैलास भिंगारे, शि. द. फडणीस, कृष्णकुमार गोयल व दिनेश ठाकूर

पुणे : ‘छोट्या-छोट्या गोष्टींतून विनोदनिर्मिती करीत आनंद देण्यात पु. ल. देशपांडे (पुलं) यांचा हातखंडा होता. अफाट कल्पकता, प्रसंगावधान, विनोदबुद्धी, सगळ्या कलांविषयीची आस्था, मिश्कीलपणा आणि सदोदित हसरे व्यक्तिमत्त्व असणारे ‘पुलं’ म्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी ‘पुलं’बद्दल गौरवोद्गार काढले.

साहित्यवेध प्रतिष्ठान व पुणे येथील संवाद आयोजित आणि कोहिनूर ग्रुप प्रायोजित महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलुतून त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणाऱ्या व्यंग्यचित्र आणि त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन फडणीस यांच्या हस्ते झाले. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात झालेल्या या सोहळ्यावेळी शकुंतला फडणीस, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ‘पुलं’चे भाचे दिनेश ठाकूर, व्यंग्यचित्रकार अलोक निरंतर, साहित्यवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे आणि ‘संवाद’चे अध्यक्ष सुनील महाजन आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनात ‘पुलं’च्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, दुर्मिळ क्षण यांची माहिती देणारी छायाचित्रे, सहकलाकार, मित्रपरिवार, साहित्यिक यांच्याशी असलेले स्नेहबंध छायाचित्रांमधून उलगडण्यात आले आहेत. ‘गदिमा’, ‘बाबूजी’, शांता शेळके, राम गबाले, लता मंगेशकर यांच्यासमवेतची छायाचित्रे, अनेक चित्रपट, नाटकांतील त्यांच्या भूमिका आणि सुनीताबाईंबरोबरचा सहवास अशी दुर्मिळ छायाचित्रे येथे लावण्यात आली होती; तसेच त्यांच्या लेखनावर आणि विनोदांवर आधारित व्यंग्यचित्रांचाही यात समावेश होता.

व्यंग्यचित्र व छायाचित्र प्रदर्शन पाहताना डॉ. श्रीपाल सबनीस, शि. द. फडणीस, कृष्णकुमार गोयल व दिनेश ठाकूर, सुनील महाजन, कैलास भिंगारे व इतर.

फडणीस म्हणाले, ‘सगळ्याच क्षेत्रातील लोकांशी स्नेहबंध असल्याने ‘पुलं’चे आयुष्य समृद्ध झाले आहे. त्यांच्यासारखी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली हे आपले भाग्य आहे. त्यांच्याबरोबर मला काम करता आले. तो अनुभव अतिशय विलक्षण होता. त्यांच्यातील चित्रकार, साहित्यिक, अभिनेता, लेखक, सामाजिक कार्यकर्ता आणि सढळ हाताने दान केलेला देणगीदार जवळून पहिला आहे.’

डॉ. सबनीस म्हणाले, ‘पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या व्यंगचित्रांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले याचा आनंद आहे. देशपांडे दाम्पत्याकडे पाहिल्यानंतर सहजीवन कसे असावे, हे शिकायला मिळते. त्यांचे व्यक्तिमत्त्व आनंदी जीवनासाठी प्रेरणादायी आहे. वक्ता, लेखक, नायक, दिग्दर्शक, संगीतकार, गायक अशा विविधांगी भूमिका जगलेल्या ‘पुलं’च्या जीवनावर संशोधन व्हावे.’

या प्रसंगी कृष्णकुमार गोयल, दिनेश ठाकूर, आलोक निरंतर यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कैलास भिंगारे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search