Next
देशातील प्रत्येक विमानतळावर सुरू होणार ‘जीआय स्टोअर’
गोव्यात पहिले स्टोअर सुरू ; स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना बाजारपेठ
BOI
Wednesday, January 30, 2019 | 11:52 AM
15 0 0
Share this article:

पहिल्या जीआय स्टोअरमधील उत्पादने पाहताना सुरेश प्रभू (सर्व फोटो : सुरेश प्रभू यांचे ट्विटर अकाउंट)

पणजी :
‘भौगोलिक निर्देशन (जिऑग्राफिकल इंडिकेशन - जीआय) मिळालेल्या म्हणजेच संबंधित स्थानिक भागाचे वैशिष्ट्य असलेल्या हस्तकलेच्या वस्तू, तसेच कृषी उत्पादने यांची विक्री करणारी जीआय स्टोअर्स देशातील प्रत्येक विमानतळावर सुरू केली जाणार आहेत. स्थानिक उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. देशातील पहिल्या जिऑग्राफिकल इंडिकेशन स्टोअरचे (जीआय स्टोअर) उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते गोव्यातील दाबोळी विमानतळावर करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

कोकणातील हापूस, मराठवाड्यातील केसर आंब्यासह देशभरातील विविध ठिकाणच्या जीआय टॅग मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या उत्पादकांना याचा लाभ होणार आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना योग्य ते मूल्य मिळणार असून, ग्राहकांनाही फसवणूक न होता खात्रीशीर, दर्जेदार उत्पादने मिळू शकतील.‘देशात सध्या १०० विमानतळ असून, येत्या काही काळात आणखी तेवढेच विमानतळ देशात उभारले जाणार आहेत. या प्रत्येक विमानतळावर जीआय स्टोअर उभारले जाणार आहे. वर्षानुवर्षांच्या परंपरेतून विशिष्ट भौगोलिक प्रदेशात काही कौशल्ये विकसित झालेली असतात, जी अन्य कोणत्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. गोव्याच्या बाबतीत बोलायचे झाले, तर येथील कला, संस्कृती या गोष्टी येथील वैशिष्ट्येच आहेत. जीआय स्टोअर्समधून स्थानिक कलाकारांच्या बुद्धिमत्तेला, कलेला वाव मिळेल. त्यांच्या कलेला विमानतळावरील स्टोअर्समध्ये योग्य ते मूल्य मिळेल. गोव्यात येणाऱ्या पर्यटकाला येथून छोटीशी का होईना, पण एकमेवाद्वितीय अशी काही तरी हस्तकलेची वस्तू किंवा लक्षात राहण्यासारखी अन्नपदार्थाची चव अशा काही गोष्टी आपल्यासोबत न्यायच्या असतात. तसा अनुभव जीआय स्टोअर्समधून मिळू शकेल,’ असे प्रभू यांनी सांगितले.गोव्यातील जीआय स्टोअरमध्ये काजूगर आणि अन्य उत्पादने मिळणार आहेत. भौगोलिक निर्देशनाबाबतची जागृती आता देशात वाढू लागली आहे. त्यामुळे अशी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्यास स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.

देशातील सुमारे ३२५ कृषी उत्पादने किंवा वस्तूंना भौगोलिक निर्देशन मिळाले आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील काही कृषी उत्पादने/वस्तू अशा - 
कोकणातील हापूस आंबा, कोकम, वेंगुर्ला काजू, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्षे, नाशिकची वाइन, कोल्हापूरचा गूळ, मंगळवेढ्याची ज्वारी, नवापूरची तूरडाळ, आंबेमोहोर तांदूळ, जळगावची केळी, जळगावची भरताची वांगी, पुरंदरची अंजीर, लासलगावचा कांदा, डहाणू घोलवड चिकू, मराठवाड्याचा केसर आंबा, सोलापूरची डाळिंबे, वाघ्या घेवडा, जालन्याची मोसंबी, बीडचे सीताफळ, आजरा घनसाळ भात, वायगावची हळद, सांगलीच्या मनुका, येवला पैठणी, करवत काठी साड्या, पुणेरी पगडी, सोलापुरी चादर आणि टॉवेल, वारली चित्रे, इत्यादी

भौगोलिक निर्देशन म्हणजे काय?
एखाद्या भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमुळे त्या भागातील एखाद्या उत्पादनाला विशिष्ट गुणधर्म असतील, त्याला एक ठरावीक दर्जा, रंग, वास, चव असेल आणि हे गुणधर्म अनेक वर्षे कायम राहिलेले असतील, तर अशा उत्पादनांना भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र मिळण्यासाठी चेन्नई येथील कार्यालयात अर्ज करता येतो. भौगोलिक निर्देशन हा बौद्धिक संपदा हक्क आहे आणि त्याची अंमलबजावणी जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार संपूर्ण जगभरात करण्यात आली आहे. पेटंट किंवा ट्रेडमार्क हे बौद्धिक संपदा हक्क एखादी व्यक्ती किंवा खासगी कंपनीला मिळतात आणि त्याचा वापर अन्य कोणालाही करता येत नाही. भौगोलिक निर्देशन मात्र त्या भौगोलिक प्रदेशातील नोंदणीकृत संस्थेला मिळते. त्या संस्थेकडे नोंदणी करणाऱ्या सर्वांना त्या प्रमाणपत्राचा वापर करता येतो. त्यामुळे त्याचा लाभ संपूर्ण समूहाला होतो. संबंधित उत्पादनाची वैशिष्ट्ये ते उत्पादन विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उत्पादित होत असल्यामुळे असतात. त्यामुळेच संबंधित भौगोलिक प्रदेशाचे नाव त्या निर्देशनात अंतर्भूत असते.

भौगोलिक निर्देशनाचे फायदे
वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाच्या नावाचा गैरवापर किंवा त्यात होणारी भेसळ थांबविण्यासाठी भौगोलिक निर्देशनाचा उपयोग होतो. तसे करणाऱ्यांविरोधात नोंदणीकृत संस्था कारवाई करू शकते. त्यात गुन्ह्याच्या स्वरूपानुसार अगदी तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. संबंधित उत्पादनाच्या मूळ उत्पादकाला योग्य ते मूल्य मिळते.

(कोकणातील हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. त्या संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
mohan About 259 Days ago
. अशी केंद्रे आता देशभरातील रेल्वे स्टेशन , बस स्थानक व मंदिर परिसरात सुरू व्हायला हवीत .
0
0

Select Language
Share Link
 
Search