Next
बिनशब्दाची कॉमेडी...
BOI
Monday, November 13 | 06:45 PM
15 1 0
Share this story


चार्ली चॅप्लिनची बिनशब्दाची कॉमेडी सर्वांनाच भावते. त्याने माइम ॲक्टची एक वेगळी ओळख जगाला करून दिली. ‘आयपार फेस्टिव्हल’मध्ये आणखी एक माइम प्ले सादर करण्यात आला. मॅन्ड्रागोरा सर्कसनंतर त्यानेही प्रेक्षकांमध्ये भरपूर हशा पिकविला व धमाल केली. टर्कीतून आलेल्या इल्कर किलीसर या कलाकाराने ‘मिमडोज कॉल’ ही कलाकृती सादर करून रसिकांची मने जिंकली....
..................................
चार्ली चॅपलिनची बिनशब्दाची कॉमेडी सर्वांनाच भावते. त्याने माइम ॲक्टची एक वेगळी ओळख जगाला करून दिली. आयपार फेस्टिव्हलमध्ये आणखी एक माइम प्ले सादर करण्यात आला. मॅन्ड्रागोरा सर्कसनंतर त्यानेही प्रेक्षकांमध्ये भरपूर हशा पिकविला व धमाल केली. टर्कीतून आलेल्या इल्कर किलीसर या कलाकाराने ‘मिमडोज कॉल’ ही कलाकृती सादर करत रसिकांची मने जिंकली. 

तोंडावर पांढरा रंग फासलेला, मोठे ओठ, मोठ्या भुवयांचा विदूषक टोपी घालून रंगमंचावर आला आणि सादरीकरणाची सुरुवात झाली. पहिल्यांदा या विदूषकाने माणसाच्या पोकळ व खोट्या वागण्यावर प्रकाश टाकला. आपण कसे खोटे मुखवटे चढवून, खोट्या मनाने, इच्छा नसताना अनेक गोष्टी करत असतो, येणारा दिवस पुढे ढकलत असतो, हे त्याने दाखवून दिले. त्यानंतर अर्थात टाळ्यांचा कडकडाट झाला, हे सांगायची गरज नाही. 

पुढील भागात त्याने एका कथेचे सादरीकरण केले. रस्त्याने चाललेला एक व्यक्ती व त्याच्या अंगावर घाण करुन गेलेला पक्षी या दोघांची ही कथा होती. आपल्या अंगावर घाण केली म्हणून पक्षाला गलोलने दगड मारुन त्याला जखमी करत हा मुलगा पक्षाला पिंजऱ्यात बंदिस्त करतो. पण, नंतर पक्षाची तडफड पाहून त्याला वाईट वाटू लागते व तो पक्षाला सोडून देतो. असा साधारण कथेचा प्लॉट होता. त्यात या कलाकाराने त्या मुलासोबतच पक्षाचाही अभिनय केला. त्यातून दिसणारी त्याची तडफड अस्वस्थ करत होती. शिवाय हे सगळं करत असताना त्यात प्रेक्षकांना सहभागी करुन घेतल्यामुळे आणखी मजा आली. त्याने पिंजऱ्यात पकडलेल्या या पक्षाला दाणा-पाणी देण्यासाठी आलेल्या एका मुलीने चांगलीच धमाल केली. तिला विदूषकाने सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात न आल्यामुळे खरे तर मोठा विनोद झाला. एकूनच प्रेक्षकांचा सहभाग व कलाकाराची इच्छा यातून ‘मिमडोज कॉल’मध्ये रंगत आली. 

माइमच्या पॅन्टोमाइम या प्रकारातील हे सादरीकरण होते. मूळ इंग्लंडमध्ये उगमस्थान असलेला हा कलाप्रकार आज जगभर प्रसिद्ध आहे व सादरही केला जातो. पॅन्टोमाइम हे मुख्यतः लहान मुलांसाठी सादर केले जाते. यात संगीताचा समावेश होतो, तसेच प्रसंगानुरुप विनोद केले जातात. यामध्ये बऱ्याचदा लहान मुलांच्या गोष्टींवरून सादरीकरण केले जाते. विशेषतः ख्रिसमसच्या काळात या प्रकारचे माइम सादर केले जातात.
  
सादरीकरणानंतर डॉ. अजय जोशी यांनी कलाकारांशी संवाद साधला. त्यातदेखील परफॉर्मन्सइतकीच किंबहुना जास्त मजा आली. कारण त्या कलाकारास टर्किश भाषेशिवाय दुसरी कोणतीच भाषा येत नव्हती व संयोजकांकडे त्यावर काही उतारा नव्हता. त्यामुळे मग गुगलच्या साथीने हा सोहळा पार पाडण्यात आला. त्यातही अनेक अडचणी आल्या व त्यातून विनोद घडत गेले. शेवटी माइमचा वापर कलाकाराला इथेसुद्धा करावा लागला. त्याने सांगितलेले व गुगलकडून व्यवस्थित भाषांतरीत होऊ शकलेले एक वाक्य होते, – ‘लाइफ इज ऑल्वेज लर्निंग. सो, नो नीड टू स्टडी!’

याच्या आधीच्या दिवशी सादर करण्यात आलेले ‘स्विंग ऑफ लव्ह’ हे सादरीकरणदेखील वेगळ्याच धाटणीचे होते. फेमिनिटी व लव्ह या दोन विषयांवर मुख्यतः केंद्रित असलेला हा परफॉर्मन्स होता. ज्युलिया फिलिपो हिने हा परफॉर्मन्स सादर केला. यात ओमर खय्याम व ओशो यांच्या कविता व कडवी यांचं अनोख्या पद्धतीने रंगमंचावर सादरीकरण करण्यात आले. वेगवेगळ्या हालचाली, ताल व आवाज यांच्या माध्यमातून ज्युलियाने या कविता रंगमंचावर उभ्या केल्या.
 
यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे पाच झोके वापरण्यात आले. हे झोके व त्यांच्या रंगांमागे काही ना काही अर्थ दडलेला होता. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही कलाकार झोक्यांवर खेळत राहते व आपल्याला या कवितांची अंगे अलगदपणे उलगडून दाखविते. मंजुला वेदिवार्देना यांनी या सादरीकरणाचे लेखन केले आहे. एम. सफीर यांनी याचे दिग्दर्शन केले होते. श्रीलंकेतील गटाने याचे सादरीकरण केले. एकूणच या सादरीकरणाने ओशो व ओमर खय्याम यांच्या कवितांकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन रसिकांना दिला. 

- आकाश गुळाणकर
ई-मेल : akash.gulankar@gmail.com

(‘आयपार महोत्सवा’चे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन वाचण्यासाठी https://goo.gl/12cDAa इथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link