Next
गुलजारांच्या साहित्याचा रसास्वाद
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Saturday, February 24 | 04:38 PM
15 0 0
Share this story

‘प्रेमा तुझा रंग कसा, हा प्रश्नच कधीही पडला नाही, आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत, हाच रंग अजून उतरला नाही’ अशी काव्यमय दाद आपल्या आवडत्या गुलजारांच्या साहित्याला देणारे चंद्रशेखर टिळक यांचं गुलजारजींविषयीचं प्रेम आणि भक्ती त्यांच्या ‘मला भावलेले गुलजार’ या पुस्तकाच्या पानापानांतून दिसत राहते. त्या पुस्तकाचा हा परिचय...
...............
तरुणपणात आणीबाणीच्या काळात, ‘अभाविप’चं काम करताना, ‘आंधी’ सिनेमावरच्या बंदीवरच्या चर्चेतून गुलजार थोडेफार समजल्यावर, त्यांची गाणी ऐकण्यातून आणि साहित्य वाचण्यातून गुलजाररूपी गारूड पुढची ४० वर्षं चंद्रशेखर टिळक यांच्या डोक्यावर स्वार झालं. ... आणि त्या खुशीच्या मामल्याचा परिपाक म्हणजे त्यांच्या लेखणीतून उतरलेलं गुलजार यांचे विविध पैलू मांडणारं ‘मला भावलेले गुलजार’ हे सुंदर पुस्तक!

पुस्तकाचं स्वरूप अतिशय सुटसुटीत आणि सोपं. गुलजार यांच्या कथा, कविता वाचताना, गाणी ऐकताना, कलाकृती पाहताना मनात उमटलेले पडसाद आणि त्या निमित्ताने दाटून आलेल्या अनेक आठवणी यांना टिळक यांनी दिलेलं शब्दरूप, म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना टिळक यांची मराठीवरची पकड त्यांच्या चमकदार वाक्यांमधून ठायी ठायी जाणवते. 

गुलजारजींच्या वाढदिवसावरच्या लेखात टिळक म्हणून जातात, ‘प्रणय ते प्रस्थान, प्रेयस ते श्रेयस असा हा वाढदिवस असतो.’ गुलजार यांच्या ‘दिल अगर है तो दर्द भी होगा, इसका कोई हल नही है शायद’ या ओळींचा संदर्भ देऊन गुलजारांविषयी बोलताना ते म्हणतात, ‘समेवर येण्याची व्याख्या कधी बदलत नसली तरी समेवर येण्याची प्रत्येकाची तऱ्हा, मात्रा वेगळी आणि बदलती असते,’ याचे भान गुलजार आपल्याला सातत्याने देत असतात!’

गुलजारच्या मायकल एन्जेलोवरच्या लेखाची सुरुवातच त्यांनी ‘चव, रंग, रूप, वास आणि सहवास यांची चव संबंधित अवयवापेक्षा मनावर जास्त रेंगाळते ना!’ अशा लक्षवेधी वाक्याने केली आहे. पुढच्याच ‘विसाल’ या ध्वनिफितीसंदर्भातल्या लेखात टिळक लिहितात्त – ‘विसाल’ म्हणजे एकत्र येणे किंवा मीलन. रसिकांच्या भावना आणि गुलजारजींची शब्दकळा यातील नातेसंबंधांचे वर्णन करायला याहून दुसरा योग्य शब्दच सापडणार नाही. कारण रसिकांना अगदी प्रेमात पडल्यासारखे आकर्षण आहे त्यांच्या कवितांचे! तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या भावना हा गृहस्थ अलगदपणे पकडतो आणि अत्यंत अचूक शब्दांत पुन्हा आपल्यासमोर मांडतो. हे मांडणे इतके मनोहारी असते की त्या जाणिवा आमच्या आहेत असे सांगत त्यावर आपला मालकी हक्क सांगण्याचे आपल्या मनातसुद्धा येत नाही’. ....किती सहज लिहून गेलेत टिळक! पुढे ‘श्याम के साये बालिश्तोंसे नापे है’ या ओळीवर टिळक फार सुंदर लिहितात –‘आपली प्रत्येक संध्याकाळ आपण तळव्यांनी मोजत राहतो (बालिश्ते म्हणजे तळवे). बालपणी शाळा सुटल्यावर घरी नेणाऱ्या आईच्या तळव्यांची आठवण येऊ लागते...ओढ लागलेल्या दिवसांत प्रियजनांचे तळवे कधीच विस्मरणात जात नाहीत.. .वृद्धापकाळात परमेश्वराच्या नामसंकीर्तनात टाळ्या वाजवताना तळव्यांचे भान येतेच; पण मनाच्या त्या एकाकी अवस्थेत इतरांचे तळवे आपुलकीने पुढे येतील ना अशीही काळजी वाटू लागते’...

‘मरासिम’वर (नातेसंबंध) बोलताना टिळक वाचकांना प्रश्न करतात - ‘आपण सगळेच नेहमी गर्दीत असतो; आपल्या माणसांत असतो का? आपण माणसांना कमी आणि आठवणींना जास्त भेटतो का? जिथे शरीराने नाईलाजाने असावेच लागते, तिथे कधीतरी मनानेही खरेच असतो का?’... आता यावर उत्तरं शोधताना वाचकाला मदत व्हावी म्हणून ते इंदिरा संत आणि गुलजार यांच्या कवितांमधले दाखले देतात. इंदिरा संतांच्या ओळी - ‘असेच काही द्यावे घ्यावे, दिला एकदा ताजा मरवा, देता घेता त्यात मिसळला, गंध मनातील त्याहूनही हिरवा’ यांतून कळणारे नातेसंबंध आणि गुलजार यांच्या चपखल ओळी ‘हाथ छूटे भी तो रिश्ते नाही तोडा करते, वक़्त की शाख से लम्हें नही तोडा करते’...वा! गुलजार! 

पुढच्या काही प्रकरणांमध्ये टिळक यांनी ‘रावी के पार’ ही कथा, ‘इजाजत’ सिनेमा, ‘दिल पडोसी है’ ही गैरफिल्मी गीतांची कॅसेट, ‘पोर्ट्रेट’अंतर्गत केलेल्या कविता, ‘देवडी’ पुस्तक, ‘जीना यहाँ’ कथासंग्रह अशा गुलजार यांच्या विविध साहित्य आणि कलाविष्कारांवर सविस्तर आणि सुरेख टिप्पणी केली आहे. 

शेवटच्या प्रकरणात टिळक यांची गुलजारांविषयीची भावना आपल्याला भिडते ती त्यांच्या या वाक्यातून –‘ईश्वराविषयी वाटणाऱ्या प्रीतीला भक्ती म्हणतात आणि मानवी नातेबंधातील भक्तीला प्रीती म्हणतात!’ 

असे हे चंद्रशेखर टिळक यांचे, त्यांचे लाडके कवी गुलजार यांच्याविषयीचे पुस्तक. गुलजार यांच्या चाहत्यांनी तर वाचावेच; पण ज्यांनी अजून गुलजार समजून घेतला नाही त्यांनी तर अवश्य वाचावे आणि गुलजार यांचे भक्त व्हावे! 

पुस्तक : मला भावलेले गुलजार 
लेखक : चंद्रशेखर टिळक 
प्रकाशन : मोरया प्रकाशन, ४०/१०, एरंडवणा, पुणे - ४११०३८
पृष्ठे : १९२
मूल्य : १७५ ₹ 
संपर्क : चंद्रशेखर टिळक – ९८२०२ ९२३७६

(‘मला भावलेले गुलजार’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link