Next
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला १६वा कोळी महोत्सव
प्रशांत सिनकर
Tuesday, May 14, 2019 | 04:03 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : ‘चेंदणी-कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचा’च्या वतीने नुकताच ‘१६वा कोळी महोत्सव’ साजरा करण्यात आला. वाद्य-वृंदांच्या साथीने रंगलेला नृत्यसोहळा, कलाकारांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी रंगलेल्या या महोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.   

१२मे रोजी सायंकाळी सात ते ११ या वेळेत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी गेला महिनाभर आयोजक, संयोजक, कार्यकर्ते, गायक, वादक, नृत्य कलाकार, नेपथ्यकार यांनी घेतलेल्या मेहनतीला आणि त्यांच्या परिश्रमाला, मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रसिकांनी कौतुकाची आणि शाबासकीची पावती दिली.

सर्वप्रथम मिरवत, वाजत-गाजत आणि नाचत आणलेल्या पालखीचे ‘चेंदणी मीठ बंदरा’वर आगमन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी महेश कोळी आणि कन्या नुपूर यांच्या कला कौशल्याने साकारलेल्या ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचा’च्या रेखीव बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. त्यापाठोपाठ महोत्सवाचे उद्घाटन करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना आदराने गौरविण्यात आले.

दूरदर्शन कलाकार विजय ठाणेकर यांनी ईशस्तवनाचे गीत गाऊन श्रोत्यांमध्ये चैतन्य भरले. त्यानंतर कलाकारांनी सादर केलेल्या कोळी नृत्यांनी आणि गाण्यांनी कार्यक्रमाला चार चांद लावले. श्रोत्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. ‘नाखवा’ ग्रुपच्या बच्चे कंपनीने गोव्याच्या नाचात रंगत आणली. प्रफुल्ल कोळी यांचे वेगवेगळ्या नृत्यांचे दिग्दर्शन वाखाणण्याजोगे होते.

विशेषत: बाळुमामा मालिकेतील बाळुमामाची आई साकारलेल्या बेबी ताईंच्या, स्टेजवरील एन्ट्रीने, ‘हम भी कुछ कम नही’, हे दाखवून दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या प्राजक्ता कोळीने लावणीच्या तालावर सर्वांची मने जिंकली. तसेच इतर नृत्य समुहांची नृत्याची अदाकारीही वाखाणण्याजोगी होती.

विनोद नाखवा, आशिष मोरेकर, वैभव, हसमुख, सुकरे, ऋषीराज, अलका, अनुराधा, नुतन या जुन्या नव्या गायकांनी चांगले सूर लावले, तर विवेक, नागेश, निकेश, सम्राट, नितीन, आल्वीन, सुभाष, भरत, विक्रांत, सचिन, अभी, समर्थ, चेतन यांनी दणदणीत ह्रिदम आणि बहारदार मेलडीने सारा आसमंत दणाणून सोडला.
दरम्यान हा कार्यक्रम सुरू असतानाच, विशेष कामगिरी करणाऱ्या १० मान्यवरांचा तसेच कार्यक्रमास भेट देणारे राजकीय नेते, नगरसेवक, विविध संस्थांचे तसेच ठाणे महानगरपालिकेचे आणि पोलीस खात्याचे अधिकारी, आश्रयदाते, हितचिंतक यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित रसिकांनी खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.  

सचिन ठाणेकर, प्रमोद/प्रल्हाद नाखवा, गिरीश कोळी यांनी उत्तमरीत्या निवेदनाची कामगिरी पार पाडली. या वेळी आजच्या युगातील मॉडर्न धरतीचे ड्रोनच्या आधारे केलेले छायाचित्रण दाखवण्यात आले. उमेश, देवेशू आणि स्वप्नील यांनी उत्कृष्टपणे याचे सादरीकरण केले. 

कार्यक्रमाचे आयोजक विक्रांत आणि निशा या दाम्पत्याने व्यवस्थेवर चोख नजर ठेवली, तर कलाकारांना अल्पोपहाराची भेट देणाऱ्या हेमंत ठाणेकर यांनी अदबीने सगळ्यांना खाऊ घातले. या वेळी अष्टविनायक चोकातील कलादालनात आयोजित केलेल्या, कै. दत्तात्रय ठाणेकर (डायना) यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कादंबरी आणि पराग या दाम्पत्याने ही संकल्पना साकारली होती. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 127 Days ago
Hope , this becomes a regular event , well advertised , so that other communities can join and enjoy it.
0
0

Select Language
Share Link
 
Search