Next
वाढदिवसाला रक्तदान करण्याच्या व्रताची दशकपूर्ती
BOI
Thursday, January 03, 2019 | 03:40 PM
15 0 0
Share this article:

स्वतःच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान करताना संजय पटेल.देवरुख : स्वतःच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवणाऱ्यांची संख्या तशी फारच कमी असते. त्यापैकीच एक म्हणजे रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील युवा व्यापारी संजय पटेल. स्वतःच्या वाढदिवसाला रक्तदान करण्याचा गेल्या नऊ वर्षांचा नेम त्यांनी यंदा, दहाव्या वर्षी काटेकोरपणे पाळला आहे.

केवळ वाढदिवसालाच नव्हे, तर कुणाला ऐन वेळी गरज असेल, तर तेव्हाही रक्तदानासाठी ते हमखास धावतात. संजय पटेल आणि त्यांच्या बंधूंचे देवरुख बसस्थानकासमोर हार्डवेअरचे दुकान आहे. गेली अनेक वर्षे ते देवरुखात वास्तव्याला आहेत. समाजसेवा करता यावी यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी लायन्स क्लबचे सदस्यत्व स्वीकारले. आपल्या कामामुळे एक दिवस ते देवरुख लायन्स क्लबचे अध्यक्षही झाले. शक्य त्या मार्गांनी ते समाजसेवा करतात.  

१० वर्षांपूर्वी त्यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदानाच्या उपक्रमाची सुरुवात केली. दर वर्षी ते रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत जाऊन ते रक्तदान करतात. 

अलीकडे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्ताचा वारंवार तुटवडा जाणवतो. अनेकदा सोशल मीडियावरून आवाहन करूनही रक्तदाते मिळत नाहीत. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो. अशा स्थितीत त्या रुग्णाचे होणारे हाल आणि नातेवाईकांची होणारी धावपळ पाहून चुकचुकणारे अनेक जण असतात; मात्र त्यावर ठोस उपाय करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. यावर उपाय म्हणून निदान संगमेश्वर तालुक्यातील विविध गटांचे रक्तदाते एकत्र यावेत, त्यांची नावे, पत्ता, फोन नंबर एकत्र मिळावेत यासाठी संजय पटेल गेली काही वर्षे सोशल मीडियावर अभियान राबवत आहेत. जोपर्यंत स्वतःवर प्रसंग येत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट गांभीर्याने न घेण्याच्या मानसिकतेमुळे या अभियानाला फारसा प्रतिसाद मिळत नाही; पण पटेल स्वतःच्या पातळीवर होईल ते प्रयत्न करत आहेत.

‘मी स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. याचा कित्ता सर्वांनी गिरवल्यास रक्ताचा तुटवडा कमी होईल. शिवाय आपल्यालाही एक चांगली सवय लागेल,’ असे संजय पटेल म्हणतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search