Next
माझा ‘नसामान्य’ मित्र शरद माडीकर
BOI
Sunday, April 15, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

शरद माडीकरएके काळी ‘अन्न, वस्त्र, निवारा’ या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या. त्यात पुढे ‘शिक्षण आणि आरोग्य’ यांची भर पडली. मनुष्यप्राण्याची सहावी महत्त्वाची गरज म्हणजे ‘मित्र’ असे म्हणता येईल. मित्रांच्या अस्तित्वानेच जीवन सुलभ आणि सुसह्य होत असते. मित्रांवरूनच माणसाची खरी ओळख पटते. चांगले मित्र जितके अधिक, तितके आपण श्रीमंत!...आपल्या अशाच एका ‘नसामान्य’ मित्राबद्दल सांगत आहेत ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
.............
एके काळी ‘अन्न, वस्त्र, निवारा’ या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या. त्यात पुढे ‘शिक्षण आणि आरोग्य’ यांची भर पडली. मनुष्यप्राण्याची सहावी महत्त्वाची गरज म्हणजे ‘मित्र’ असे म्हणता येईल. मित्रांच्या अस्तित्वानेच जीवन सुलभ आणि सुसह्य होत असते. मित्रांवरूनच माणसाची खरी ओळख पटते. चांगले मित्र जितके अधिक, तितके आपण श्रीमंत!
मित्रांचे अनेक प्रकार असतात. त्यातील ‘बिनधास्त’, ‘पोचलेला’, ‘निवांत’ हे वर्णन ज्याला लागू पडेल, असा माझा एक मित्र होता - म्हणजे आता नाही - त्याचे नाव शरद माडीकर. पुण्यात रिक्षाने स्टेशनला जाताना, सोमवार पेठेत आगरकर हायस्कूलसमोर डाव्या हाताला ‘अलंकार स्टोअर्स’ नावाचे एक दुकान आहे. ते या मित्राच्या मालकीचे. आज त्याची मुले ते चालवतात.

पुस्तकाच्या वाचकांना आणि चित्रपटाच्या प्रेक्षकांना ‘सामान्य’ म्हणण्याची प्रथा आहे. वास्तविक त्यांच्या जिवावरच पुस्तके किंवा चित्रपट चालतात. ते ‘असामान्य’ नसतील; पण सामान्यही नसतात. म्हणून अशांसाठी ‘नसामान्य’ हा शब्द मी वापरतो. तर शरद माडीकर हा माझा एक नसामान्य मित्र होता. त्याला वाचनाचे अफाट वेड होते. त्यातूनच आमची मैत्री झाली. अगदी सुरुवातीला मी सुहास शिरवळकरांबरोबर त्याच्या दुकानात गेलो. लेखक आणि पोलिस अधिकारी हे त्याचे खास मित्र. त्यांच्यापैकी कोणीतरी नेहमी दुकानात बसलेले असायचेच. मग चहा, नाश्ता यांचा आग्रह आणि न संपणाऱ्या गप्पा! दुकानातील सर्व कपाटांमध्ये नावापुरती स्टेशनरी, काही शालेय पुस्तके, गणपती सीझनला मूर्ती आणि दिवाळीत फटाके यांची विक्री चालायची. त्याचा मुख्य धंदा म्हणजे रेल्वे तिकिटांची विक्री. त्या ‘उद्योगां’च्या खूपच गमतीजमती सांगण्यासारख्या आहेत.
 
शरद सुरुवातीला सरकारी नोकरी करत होता. पुण्यातील कलेक्टर कचेरी, मध्यवर्ती इमारत आणि मुंबईचे मंत्रालय या ठिकाणी त्याचे असंख्य जिवलग मित्र होते. खालपासून ते अगदी मुख्य सचिव पदापर्यंतचे. काही काळ त्याने त्या संस्थांना स्टेशनरी पुरवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला. पुढे नोकरी-धंदा सोडून त्याने रेल्वेची तिकिटे काढून देण्याचा उद्योग सुरू केला. स्वत: रांगेत उभे राहून तिकीट काढणे सर्वांना जमत नाही. ‘ऑनलाइन’ खरेदीची सोय त्या दिवसांत नव्हती. ओळखपत्रालाही तेव्हा फार महत्त्व नव्हते. त्यामुळे हा उद्योग हा हा म्हणता भरभराटीला आला. दुकानात स्टेशनरी देखाव्यापुरती असायची. कोणी गिऱ्हाईक त्यासाठी आले, की शरद त्याला समोरच्या दुकानात पाठवायचा.
 
स्टेशनवर तिकिटाच्या रांगेत उभे राहण्यासाठी शरदकडे अनेक मुले कामाला होती. समजा ‘व्हीटी’ला (आताचे सीएसएमटी) जाण्यासाठी चार वेगवेगळ्या लोकांनी मागणी केली असेल, तर एकाच फॉर्मवर चौघांची नावे लिहून, मुख्य तिकीट एकाजवळ आणि बाकी तिघांना तो झेरॉक्स प्रती काढून देई. कमिशनही भरपूर असायचे. अगदी पोलिस अधिकाऱ्यांकडूनही शरद पैसे घेई. अशी ही त्याची ‘उलटी तऱ्हा’ होती. भीती नावाचा प्रकार त्याला ठाऊकच नव्हता.
 
एकदा पुणे स्टेशनवर तिकिट तपासनीसांचे ‘स्पेशल स्क्वाड’ आले. मासिक पासवाले लोक रिझर्व्हेशनसाठी आपले पास शरदकडे देत आणि मुले रांगेत उभे राहून त्यांच्यासाठी जागा ‘रिझर्व्ह’ करत. त्या दिवशी रेल्वे अधिकाऱ्यांनी त्या मुलांकडून सगळे पास काढून घेतले. शरदला हा प्रकार समजला. तो गडबडला नाही. प्रथम एक चहा मागवून त्याने पाच मिनिटे विचार केला. नंतर तडक त्याने स्टेशन गाठले. तिथले सगळेच सेवक ओळखीचे. त्यांनी शरदला सावध केले. ‘इथे थांबू नकोस. निघून जा’ इ. इ. पण त्याने आवाज टिपेला चढवला.... ‘कोण ते xxxxx आहेत? मुलांकडून पासेस कोणी काढून घेतले? आपला पास एखाद्या मुलाकडे देऊन त्याला रांगेत उभं करणं कोणत्या गुन्ह्याखाली येतं? आत्ताच्या आत्ता सगळे पासेस परत करा, नाही तर चोरी आणि बळजबरीच्या आरोपावरून सगळ्यांना आत टाकायची व्यवस्था करतो. नाही सगळ्यांना याच स्टेशनसमोर फुटाणे विकायला लावलं, तर नाव सांगणार नाही!’ हे धारिष्ट्य केवळ शरदलाच शक्य होते. पासेस परत मिळाले, हे वेगळे सांगायला नकोच.

महिन्या-दोन महिन्यांनी त्याच्या दुकानात जाऊन बसणे, हा एक छंदच झाला होता. तासन्‌तास वेळ कसा जायचा, हे कळतच नसे. मी एकदा पुस्तक प्रकाशन सुरू करण्यासाठी एका बँकेकडून कर्ज घेतले होते. मराठी माणूस कर्जाला नेहमीच घाबरतो. शरद म्हणायचा, ‘गुर्जर, तुमची ही कर्जफेडीची तळमळ पाहून मला फार दु:ख होते. बँकांना असं कधी घाबरायचं नसतं. आमची ‘प्रकरणं’ कशी असतात ठाऊक आहे? आमच्या कर्जाला शनिवारवाडा गहाण आणि शिवाजी महाराज जामीन असतात. कोणाला पकडता किंवा ताब्यात घेता?’ एकदा बँकेची नोटीस घेऊन एक कर्मचारी दुकानात आला. ‘शरद माडीकर कोण?’ त्याने विचारले. शरदने स्वत:च सांगितले, ‘अहो, ते सहा महिन्यांपूर्वीच मयत झाले!’ तो बिचारा बँकेचा माणूस जास्त काही एक न बोलता निघून गेला. आता बोला!
 
माझी पुस्तके तर त्याला प्रचंड आवडायची. अनुवाद करताना मी पुस्तकातला काही भाग गाळला असेल, तर मला तो सांगायला लावायचा. तो म्हणायचा, ‘अहो, तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायलाच पाहिजे. माझ्याकडे पैसे असते, तर मी फक्त माझ्यासाठी तुमच्याकडून अनुवाद करून घेतले असते.’
 
अनेक मोठमोठे लेखक शरदचे मित्र होते. कधी मुंबईहून श्रीकांत सिनकर यायचा. त्याच्याकडून पोलिस चातुर्यकथा ऐकायला मजा यायची. कविवर्य सुरेश भट नागपूरहून पुण्याला आले, की न चुकता शरदच्या दुकानावर यायचे. वरच्या मजल्यावरच त्याचे कुटुंब राहत असे. कधीकधी भट तिथे मुक्कामालाही असत. ते आले, की शरद विचारायचा, ‘उपमा घेणार का पोहे?’ ते सांगायचे, ‘पोहे होईपर्यंत उपमा चालेल!’ शरद म्हणे, ‘भलते लाड चालणार नाहीत. एकच पदार्थ पण भरपूर मिळेल!’ अशी त्याची मैत्री होती.

पोलिस खात्याबद्दल तर त्याला विलक्षण प्रेम! त्याच्यामुळे माझी अनेक अधिकाऱ्यांशी ओळख झाली. कित्येक जण माझे आधीपासूनच वाचक असायचे. एकदा एका कामवाल्या मुलाने शरदची लुना (दुचाकी) रस्त्यावर उभी केली आणि वाहतूक विभागाने ती उचलून नेली. अशी वाहने कुठे नेऊन ठेवतात, हे त्याला ठाऊक होतेच. त्याने तिथल्या कार्यालयाला फोन लावला. ‘साहेब, माझी दुचाकी आमच्या दुकानासमोरून चोरीला गेली आहे. त्याच्या डिकीत दोन लाख रुपये ठेवलेले आहेत. कोणाला तरी लगेच इकडे पाठवा.’

तिकडचा अधिकारी शरदला ओळखत होताच. ‘माझी खुर्ची घालवतोस काय रे शरद? मी लगेच माणसाबरोबर गाडी पाठवून देतो.’ हे चांगले का वाईट, योग्य-अयोग्य हे प्रश्नच इथे उपस्थित होत नाहीत. एकेकाचा विलक्षण, टोकाचा स्वभाव! काही जणांना त्याचा रागही यायचा; पण तो टिकायचा नाही. किरकोळ केसेस असतील, तर त्याने कितीतरी मित्रांना पोलिसांच्या कचाट्यातून सोडवले होते.

१९७८ ते ९२ अशी चौदा वर्षे आम्ही गुर्जर कुटुंबीय डेक्कन कॉलेजच्या कॅम्पसवर राहत होतो. त्याच काळात शरदबरोबरची मैत्री बहरली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्कराने कॉलेजमध्ये बऱ्याच बरॅक्स बांधलेल्या होत्या. त्यात आम्ही ७०-८० कुटुंबे राहत असू. दर वर्षी गणपती उत्सव मोठ्या थाटात साजरा होत असे. अशाच एका कार्यक्रमात आम्ही सगळे संध्याकाळी सहभागी झालो होतो. त्यात केळकर नावाचे एक कुटुंब होते. काही वेळाने काहीतरी आणण्यासाठी त्यांचा १२-१३ वर्षांचा मुलगा घरी गेला. घराला कुलूप होते; पण आत गेल्यावर एक गोदरेजचे कपाट उघडे दिसले. त्यातल्या वस्तूंची उलथापालथ झालेली होती. आणि सोन्याचे दागिने चोरीला गेलेले! म्हणजे घरफोडी झाली होती. दार तर बंद होते. मग चोर आले कुठून? आमची घरे कौलारू एकमजली होती. काही कौले उचकटून ते खाली उतरले होते. काही मिनिटांतच आपले ‘काम’ उरकून चोर पसारही झाले. ही चोरी चालू असताना केळकरांचा मुलगा घरी गेला असता, तर काय झाले असते हीच आम्हाला काळजी!
 
मी लगेच शरदला फोन केला. त्याने, इनामदार नावाचे एक वरिष्ठ पोलिस अधिकारी होते, त्यांना कळवले. अर्ध्या तासाच्या आत त्यांची ‘टीम’ दाखल झाली. त्यांनी घराची पाहणी केली. ‘हे मांग्याचं काम!’ त्यातला एक जण म्हणाला. चोरीच्या पद्धतीवरून संशयित कोण ते त्यांना समजले. सगळी माहिती घेऊन पोलिस निघून गेले. खरी गंमत तर पुढेच आहे. सकाळी सहाच्या आत पोलिस मुद्देमालासह चोरांना घेऊन केळकरांच्या दारात हजर झाले. दागिन्यांची खूण पटवून ते त्यांच्या कामाला लागले. यथावकाश ते दागिने परत मिळाले. आम्ही कॉलेजवर इनामदार साहेबांचा छोटा सत्कार केला. आपले पोलिस हुशार आहेतच. परंतु ओळख असली की कसा फरक पडतो ते इथे लक्षात येते.
 
शरद माडीकरने सांगून ठेवलेले होते, ‘मध्यरात्री जरी काही अडचण आली, तरी मला लगेच बोलवा.’ असा हा आमचा मनस्वी, बिनधास्त मित्र! त्याला बिडी ओढायची सवय होती. सतत चहा आणि बिडी. त्यामुळेच असे म्हणता येणार नाही, पण हृदयविकार उद्भवला. २००२ मध्ये अँजिओप्लास्टी आणि २००५मध्ये बायपास शस्त्रक्रिया करावी लागली. स्नेही परिवार एवढा मोठा, की सगळ्या खर्चाची तरतूद झाली. त्यातून तो बाहेर पडला. आमच्या भेटी अधूनमधून चालूच होत्या. त्याला एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी. रेल्वे-तिकिटांचा उद्योग कमी करून, दुकानात स्टेशनरीसह शालेय पुस्तके आणि अन्य सामान भरले. गणपती आणि फटाके विक्री हंगामात चालूच होती. ‘कालनिर्णय’ची एजन्सी मिळाली. धंदा वाढवण्यात मुलांनी पुढाकार घेतला.
 
मे २०१० मध्ये अचानक त्याच्या मुलाचा फोन आला : ‘बाबा गेले!’ सुमारे ३५ वर्षांच्या आमच्या मैत्रीला पूर्णविराम मिळाला. आज आठ वर्षे झाली तरी त्याची आठवण येत राहते आणि काळजात कळ उठते. आमच्या नात्यामधील जिव्हाळा होताच तसा. ‘अलंकार स्टोअर्स’ आज भरभराटीला आलेले आहे. इच्छा असूनही तिकडे फारसे जाणे होत नाही. काउंटरच्या पलीकडे उंच लाकडी खुर्चीवर बसलेला शरद माडीकर तिथे नसतो ना!

रवींद्र गुर्जर
असे शरदसारखे चित्र-विचित्र स्वभावाचे मित्र आपले जीवन नटवत असतात.

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pandurang Kulkarni About 343 Days ago
लेख फारच छान वाटला . शरद खरोखरच एक किमयागार होता हे रेल्वे तिकीट प्रसंगावरून पटते . धन्यवाद !
1
0

Select Language
Share Link