Next
‘बालगुन्हेगारी रोखण्यासाठी समाजाची साथ आवश्यक’
डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, July 03, 2019 | 06:04 PM
15 0 0
Share this article:

वंचित विकास संस्थेतर्फे डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांना सुकृत पुरस्कार प्रदान करताना रवीबाला काकतकर. शेजारी डावीकडून विजयकुमार मर्लेचा, सोनाली गोगटे, डॉ. सहस्रबुद्धे, जिग्नेश फुरीया व माधुरी सहस्रबुद्धे.

पुणे : ‘शिक्षणाचा अभाव, नकारात्मक वागणूक, पैशांची लालसा यांसह क्षणिक रागातून बालगुन्हेगार जन्माला येतात. लहानपणी एखादा गुन्हा त्याच्या हातून घडला आणि त्याचवेळी त्याला चांगले मार्गदर्शन मिळाले, त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर केला आणि अभ्यासाची गोडी लावली, तर ही बालके गुन्हेगारीच्या वाटेला जात नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवत, मायेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर ही मुले नक्की चांगल्या मार्गाला लागतात. त्यामुळे बालगुन्हेगारी रोखायची असेल, तर समाजाच्या सकारात्मक वागणुकीची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन ज्ञानदेवी संस्थेच्या प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांनी केले.
 
वंचित विकास संस्थेतर्फे दिला जाणारा शुभदा-सारस्वत प्रकाशन पुरस्कृत सुकृत पुरस्कार डॉ. सहस्रबुद्धे यांना प्रदान करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी समुपदेशिका रविबाला काकतकर, सामाजिक कार्यकर्ते रवी चौधरी, शुभदा-सारस्वत प्रकाशनच्या सोनाली गोगटे, निराली प्रकाशनचे जिग्नेश फुरीया, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.

सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘झोपडपट्टीतील शंभर टक्के शाळांमधील गळती बंद करण्यात यशस्वी झालो आहोत. लहानपणीच मुलांना चांगले शिक्षण दिले, तर ते गुन्ह्यांपासून परावृत्त होतात. त्यासाठी गंमत शाळा उपयुक्त ठरली. मुलांचे प्रवेश करून घेतले. ते टिकविण्यासाठी प्रयत्न केले. गंमत शाळेतून त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयावर काम करायला सांगितले. आत्मविश्वास देत खेळाच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी लावली. मुलांना माया, ममता आणि त्यांचे ऐकून घेणारे कोणीतरी हवे असते. त्यामुळे आम्ही त्या गोष्टी त्यांना देण्याचा प्रयत्न केला.’

काकतकर म्हणाल्या, ‘गुन्हेगारी रोखण्यासाठी होत असलेले काम समाजातील सकारात्मक विचार दाखवणारे आहे. कौर्य, संतापाच्या भरात आपल्या हातून वाईट काम होते. त्यामुळे इतरांनी सकारात्मकतेने पहायला हवे. शारीरिक हालचाली, भाषा आणि आंतरिक भावना यांचा योग्य मिलाफ आपल्याला नकारात्मक भावनेतून बाहेर काढतो. भूतकाळातील दुःख देणाऱ्या गोष्टी मानेवरून पुसून टाकत नव्या जीवनाचा आनंद घेत राहिले पाहिजे.’

रवी चौधरी, विजयकुमार मर्लेचा यांनीही मनोगत व्यक्त केले. चैत्राली वाघ यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली.  सूत्रसंचालन मीना कुर्लेकर यांनी केले. आभार देवयानी गोंगले यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search