Next
रंगभाषेचे वारकरी, बोलती तयांचे हात...!
प्राची गावस्कर
Tuesday, June 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

सुधाकर रेमणे‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे!’... सुधाकर रेमणे यांना भेटल्यानंतर प्रकर्षाने या ओळी आठवतात. जन्मजात कर्णबधिरपणा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या शारीरिक मर्यादांमुळे त्यांना सामान्य व्यक्तीसारखे आयुष्य जगणे खूप कठीण होते; मात्र हार न मानता त्यांनी चित्रकलेची साधना केली. हुबेहूब व्यक्तिचित्रे ही तर त्यांची खासियतच. रंगभाषेचा वारकरी असलेल्या या कलाकाराबद्दल विशेष लेख...
...........
कोणत्याही प्रकारचे शारीरिक अपंगत्व असले, की सर्वसामान्य आयुष्य जगणे खरोखर कठीण असते. सर्वसामान्य माणसाला याची कल्पना येणे फार अवघड असते. त्यामुळे कोणत्याही शारीरिक अपंगत्वावर मात करून, येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊन आनंदाने आयुष्य जगणारी माणसे समाजात सकारात्मक संदेश देत असतात. अशा लोकांचे कौतुक करावे तितके कमी आहे. असेच एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे सुधाकर रेमणे. जन्मजात असलेल्या कर्णबधिरपणावर मात करून, त्यांनी चित्रकलेत प्रावीण्य मिळवले आहे. विविध प्रकारची अप्रतिम चित्रे ते काढतात. कोणी गुरू नसतानाही त्यांनी चित्रकलेत मिळवलेले प्रावीण्य नक्कीच प्रेरणादायी आहे. आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याची त्यांची मनीषा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

सुधाकर रेमणे सध्या पुण्यात स्थायिक झाले असले, तरी ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरप्याचे. जन्मतःच त्यांना ऐकू येत नव्हते. साखरपा हे छोटे गाव असल्याने तिथे चांगल्या वैद्यकीय सुविधाही फारशा नव्हत्या. अशा परिस्थितीत त्यांच्या आईने त्यांना जोराने शब्द बोलून आणि तोंडाच्या हालचाली आदींच्या साह्याने बोलायला शिकवले. वयाच्या पाच-सहा वर्षांपर्यंत त्यांना फार बोलता येत नव्हते. त्यामुळे शाळेत जाणेही लांबले. शाळेत उशिरा घातले गेले; मात्र शिक्षक काय बोलतात ते नीट ऐकू येत नसल्याने समजत नसे. तसेच प्रयत्न करत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. ऐकू येण्याचे मशीन लावायला मिळाले; पण तेही तसे उशिराच; पण त्याच्या मदतीने त्यांनी प्रयत्नपूर्वक आपले बोलणे सुधारले. लहानपणापासूनच त्यांना चित्रे काढण्याची आवड होती. त्यांच्यातील ही अंगभूत कला लक्षात घेऊन घरच्यांनी त्यांना चित्रकलेच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला पाठवले. त्यांचा थोरला आणि धाकटा भाऊही शिक्षणासाठी कोल्हापुरातच होता. 

कोल्हापुरात सुधाकर रेमणे यांनी अतिशय कष्टाने आर्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केला. चित्रे काढण्याची आवड असल्याने ते पेपरमध्ये आलेली चित्रे, पुस्तके, प्रसिद्ध चित्रकारांची मासिके, पुस्तके यात आलेली चित्रे बघून ती काढण्याचा सराव करत. वॉटर कलर, ऑइल पेंट या दोन्ही प्रकारच्या रंगांच्या साह्याने चित्रे रंगवण्यात त्यांनी कौशल्य प्राप्त केले. हुबेहूबपणा हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य. युरोपीय चित्रकारांनी रंगवलेले नेपोलियन, युरोपियन स्त्री, बाहुली आदींची त्यांनी रंगवलेली चित्रे नजर खिळवून ठेवतात. व्यक्तिचित्रे ही त्यांची खासियत आहे. कोणत्याही व्यक्तीचे हुबेहूब चित्र ते काढू शकतात. स्वामी समर्थांची त्यांनी रंगवलेली प्रतिमा अत्यंत जिवंत वाटते. श्री. संत ज्ञानेश्वर,श्री. गोंदवलेकर महाराज, श्री. गजानन महाराज, श्री. साईबाबा, श्रीराम-सीता, गणपती बाप्पा यांची त्यांनी साकारलेली चित्रे डोळ्याचे पारणे फेडतात. इंदिरा गांधीचेही चित्र त्यांनी अगदी हुबेहूब चितारले आहे. त्या व्यक्तीची वैशिष्ट्ये त्यांच्या चित्रात अगदी ठळकपणे उतरलेली दिसतात.  

निसर्गचित्रांतील रंगसंगतीही ते अत्यंत मोहक पद्धतीने साधतात. त्यामुळे गावाकडच्या देवळांमध्ये, कोणाच्या घरी देवाची, साधू-संतांची मोठी प्रतिमा करून हवी असेल, तर लोक त्यांना आवर्जून सांगू लागले. त्यांची चित्रे बघून लोक कौतुक करतात; पण पैसे देताना मात्र हात आखडता घेतात. लोकांच्या या मानसिकतेचे त्यांना खूप वाईट वाटते. एखाद्याचे कष्ट कवडीमोलाने विकत घेण्याची लोकांची वृत्ती त्यांना राग आणते आणि त्यामुळे कामे मिळण्यात त्यांना अडचणी येतात. उदरनिर्वाहासाठी त्यांना या कलेचाच आधार असल्याने अशा तडजोडींचा एक कलाकार म्हणून त्यांना मानसिक त्रास होतो; पण याचा परिणाम ते आपल्या साधनेवर होऊ देत नाहीत. नवनवीन चित्रे काढण्याचे त्यांचे काम सुरूच असते. त्यांची ही सकारात्मक वृत्तीच त्यांना जगण्याचे बळ देते. 

त्यांनी नोकरी मिळण्यासाठीही प्रयत्न केले. कोल्हापूरला मतिमंद मुलांच्या एका शाळेत, तसेच पुण्यात एका शाळेत त्यांनी काही काळ नोकरी केली; पण त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळू शकली नाही. मतिमंद मुलांच्या शाळेत त्या मुलांना शिकवताना त्यांना खूप कष्ट घ्यावे लागत. त्या मुलांना शिकवलेल्या चित्रकलेमुळे काही बक्षिसेही संस्थेला मिळाली. त्या वेळी संस्थेने सुधाकर रेमणे यांचे कौतुक केले. असे काही आनंदाचे क्षणही त्यांच्या वाट्याला आले; पण ते अगदी अल्पच. त्यामुळे चित्रकला हे आनंदनिधान असले, तरी जगण्याचे साधन ठरावे यासाठी धडपड करण्याशिवाय पर्याय उरला नाही. तसे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले आहेत; पण समाजाचा प्रतिसाद उदासीन असल्याने त्यांची धडपड सुरूच आहे. 

सुधाकर रेमणे स्वतःच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याकरता सुधाकर धडपडत आहेत. त्यांच्या या धडपडीला साथ हवी आहे ती संवेदनशील मनांची आणि भक्कम हातांची. तुम्हालाही अशीच काही सुंदर चित्रे काढून घेऊन सुधाकर रेमणे यांना मदत करायची असेल, तर त्यांच्याशी जरूर संपर्क साधा.

संपर्क :
सुधाकर रेमणे : ९३७१६ ०७९५८
मुरलीधर रेमणे : ९८८१३ ७२६०४
राजन रेमणे : ९८२०१ ९६७०९
ई-मेल : muralidarremane@gmail.com

(सुधाकर रेमणे यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search