Next
पक्ष्यांना जलसंजीवनी
मुंबई, ठाण्यात पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवण्याचे प्रमाण वाढले
प्रशांत सिनकर
Monday, October 22 | 12:34 PM
15 2 0
Share this storyठाणे :
हवेतील उष्णता वाढली, की पक्ष्यांना साहजिकच त्रास होतो. हवेत विहार करताना पोटातील पाण्याचा अंश कमी झाला, की उष्माघातामुळे पक्षी मूर्च्छित होऊन खाली पडतात. त्यामुळे तीव्र उष्णतेच्या कालावधीत म्हणजे एप्रिल-मे महिन्यांत आणि ऑक्टोबर महिन्यात शहरांतील सोसायट्यांमध्ये किंवा घरांच्या बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवण्याबद्दल जागृती केली जाऊ लागली आहे. त्याचा परिणामही दिसू लागला असून, मुंबई-ठाण्यात अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी दिसू लागली आहेत. त्यावर पक्षी येऊन पाणी पीत असल्याचेही दिसू लागले आहे. उष्म्याच्या कालावधीत पक्ष्यांना जलसंजीवनी मिळाल्याचे हे चित्र दिलासादायक आहे.

यंदा सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी गेल्या दीड महिन्यापासून त्याने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे उष्मा अधिकच जाणवतो आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘ऑक्टोबर हीट’ चांगलीच जाणवत आहे. या उष्म्याचा तडाखा माणसांबरोबर पक्ष्यांनाही बसतो. शहरात सिमेट-काँक्रीटच्या जंगलामुळे पक्ष्यांचा निवाराच हरवला असून दयाळ, सातभाई यांसारखे अनेक पक्षी मुंबई-ठाणे शहरात दिसणे दुर्लभ झाले आहे. गेल्या काही दिवसांत सर्वाधिक कमाल तापमान ३७ अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले गेले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पक्ष्यांना उष्मा सहन न झाल्यामुळे बऱ्याचदा या कालावधीत पक्षी कोसळण्याच्या घटना घडतात. परंतु यंदा मुंबई-ठाण्याच्या काही भागांत अशा घटनांचे प्रमाण आतापर्यंत तरी कमी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. पर्यावरण आणि पक्षिप्रेमींनी केलेल्या जनजागृतीमुळे अनेक सोसायट्यांतील बाल्कनी, टेरेस अथवा खिडकीवर पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी पक्षी पाणी पिण्यासाठी येत आहेत. त्यांची तृष्णा भागत असल्यामुळेच पक्षी पडण्याच्या घटना कमी झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक मंदार बापट यांनी दिली.पक्षी उष्ण रक्ताचे असतात. अनेक प्रकारच्या पिसांनी त्यांचे शरीर आच्छादलेले असते. त्यामुळे उष्म्याच्या काळात त्यांच्या शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढते. पक्षी मुळात पाणी कमी पीत असले, तरी उन्हाळ्यात त्यांना पाण्याची आवश्यकता असते. पोटामधील पाण्याचा अंश कमी झाला, की त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवण्याचे आवाहन बऱ्याचदा केले जाते. सोशल मीडियाद्वारेही जनजागृती केली जाते. या जनजागृतीचा परिणाम आता दिसू लागला आहे, असे मंदार बापट यांनी सांगितले

मुंबई-ठाण्यात केवळ कावळा, चिमणी, कबुतर, घार यांसारखे पक्षी प्राधान्याने दिसतात. परंतु घराच्या बाल्कनीत अथवा टेरेसवर पाण्याची भांडी ठेवण्याचे प्रमाण वाढल्यापासून पोपट, सुगरण, किंगफिशर, भारद्वाज अशा एरव्ही न आढळणाऱ्या पक्ष्यांचेही दर्शन घडू लागले आहे. 

(सोबत दिलेला व्हिडिओ जरूर पाहा. सुगरण पक्ष्याच्या घरट्यासंबंधीची रोचक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा. बदललेल्या पर्यावरणात पक्ष्यांच्या राहण्याच्या सवयीही कशा बदलत आहेत, याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ) 
15 2 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link