Next
हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनात देवरुखच्या देवेंद्रची ग्राउंड कोरिओग्राफी
आव्हानात्मक क्षेत्रात रंगतदार कामगिरी
संदेश सप्रे
Wednesday, November 28, 2018 | 12:13 PM
15 0 0
Share this article:

उद्घाटन सोहळ्याची रंगीत तालीम

देवरुख :
जगभरातील हॉकीप्रेमींसाठी पर्वणी असलेली पुरुषांची हॉकी विश्वचषक स्पर्धा २८ नोव्हेंबर २०१८पासून ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू होत आहे. या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा २७ नोव्हेंबर रोजी पार पडला. चित्त वेधून घेणाऱ्या त्या कार्यक्रमातील ‘ग्राउंड कोरिओग्राफी’ रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमधील देवेंद्र शेलार या तरुण कलाकाराने केली होती. आतापर्यंत त्याने अनेक राष्ट्रीय स्पर्धांसह क्रिकेट, फुटबॉल स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमात आपले कौशल्य दाखविले आहे.

मूळचा रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वार तालुक्यातील सांगवे गावच्या असलेल्या देवेंद्रचे देवरुखशीही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वडिलांच्या नोकरीमुळे बालपणापासूनच तो मुंबईत वास्तव्याला असतो. गावाकडची ओढ असल्याने सणासुदीला तो गावी येतो. मराठीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे ही देवेंद्रची सख्खी मोठी बहीण. आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून तो या क्षेत्रात उतरला; मात्र त्याने चित्रपट अथवा दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमांमध्ये नृत्य दिग्दर्शन करण्यापेक्षा ग्राउंड कोरिओग्राफी हे सर्वांत आव्हानात्मक क्षेत्र स्वीकारले. 

त्याने १९९४ साली झालेल्या पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये छोटेखानी ग्राउंड कोरिओग्राफी (मैदानावरील नृत्यदिग्दर्शन) केली. त्याच वेळी पुण्यातील मानाच्या गणेशोत्सवात विविध मंडळांतर्फे सादर होणाऱ्या रस्त्यावरील कार्यक्रमांची कोरिओग्राफी तो सलग १० वर्षे करत होता. हैदराबाद येथे २००० साली झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, २००३मध्ये हैदराबादला झालेल्या आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धा, २००४मध्ये आसाममध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आदींमध्ये त्याने आपले कौशल्य दाखविले. २००६ साली त्याला परदेशात आपल्या कलेची छाप पाडण्याची संधी मिळाली. त्या वेळी ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा समारोप देवेंद्रच्या कार्यक्रमाने झाला. २००८ साली पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि दिल्लीत २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमांत देवेंद्रने आपल्या ग्राउंड कोरीओग्राफीने रंगत आणली होती. 

२०१५मध्ये दिल्लीत झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात देवेंद्रला तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसमोर चमकण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याला आयपीएलच्या रूपाने क्रिकेटच्या मैदानावर आपली कोरिओग्राफी दाखवायची संधी मिळाली. २०१७ आणि २०१८च्या आयपीएल उद्घाटन कार्यक्रमात नृत्यदिग्दर्शनातील आपले कौशल्य देवेंद्रने पुन्हा एकदा सिद्ध केले. गेल्या वर्षी शिलाँगच्या मेघालय मिशन फुटबॉल स्पर्धेत त्याने १४ आणि १७ वयोगटातील तब्बल १२०० खेळाडूंना एकत्र आणून उद्घाटन सोहळ्यातील अदाकारी सादर केली. 

ओडिशात २७ नोव्हेंबर रोजी कलिंगा स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात प्रत्यक्ष रंगमंचावर २०० नृत्य कलाकार आणि मैदानात ११०० सहकलाकारांना घेऊन देवेंद्रने कलेचा आविष्कार सादर केला.

श्यामक दावर आणि सहकाऱ्यांसमवेत देवेंद्र शेलार (लाल टी-शर्टमध्ये)

‘क्रिकेट आणि फुटबॉलपाठोपाठ जगात प्रसिद्ध असलेल्या हॉकीच्या विश्वचषक स्पर्धेत मला नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी मिळाली, हे भाग्यच आहे. ग्राउंड कोरिओग्राफी हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. यात मला नृत्यदिग्दर्शक श्यामक दावर यांची साथ लाभते. यापुढेही असेच काम करत राहून कोकणाचे नाव उज्ज्वल करणार आहे,’ अशी भावना देवेंद्र शेलार याने व्यक्त केली. 

(उद्घाटन सोहळ्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search