Next
‘सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार व व्यायामाची गरज’
गिरीश बापट यांचा सल्ला
BOI
Saturday, December 08, 2018 | 12:42 PM
15 0 0
Share this story

‘स्वस्थ भारत’ कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुणे विभागीय आयुक्त सुरेश देशमुख, महापालिका आरोग्य अधिकारी अंजली साबणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे :  ‘लहान मुले ही देशाचे भविष्य आहेत. त्यांचे आरोग्य सुदृढ राहिले पाहिजे, त्यासाठी सकस आहार व योग्य व्यायाम गरजेचा आहे’, असे मत अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘स्वस्थ भारत’ कार्यक्रमात ते बोलत होते.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुणे विभागीय आयुक्त सुरेश देशमुख, महापालिका आरोग्य अधिकारी अंजली साबणे, अन्न प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे, पल्लवी भाईटे, वि. म. जावडेकर, संशोधक डॉ. नाईकनवरे, आहारतज्ञ अनुजा किणीकर, ‘अन्न अमृत फाउंडेशन इस्कॉन’चे सुरेश भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.  

बापट पुढे म्हणाले, ‘देशातील अबालवृद्ध सुदृढ राहावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इट राईट इंडिया’ ही संकल्पना मांडली.  भारतीय अन्न व मानके प्राधिकरणाने ही संकल्पना उचलून धरली. त्यातून एक लोकचळवळ उभी राहिली. ही चळवळ सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘स्वस्थ भारत यात्रा’आयोजित करण्यात आली आहे. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब यासारख्या आजाराने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हे लक्षात घेऊन बालकांना असे आजार होऊ नयेत अशी काळजी आपण घेतली पाहिजे. मुलांना सकस आहार दिला पाहिजे. त्यांना मैदानावर खेळू दिले पाहिजे. तेल, मीठ आणि साखर यांचे अतिसेवन आरोग्यास हानिकारक आहे, हे समजावून सांगण्यासाठी पालकांचे प्रबोधन व्हायला हवे. या यात्रेमधून असे प्रबोधन होणार आहे. अशा प्रयत्नातून नक्कीच भावी पिढी सदृढ होऊन, नरेंद्र मोदींचे स्वस्थ भारत हे स्वप्न पूर्णत्वास जाईल.’


महात्मा गांधी यांच्या १५० वी जयंती, तसेच जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने (१६ ऑक्टोबर ) देशातील सहा शहरांमधून या यात्रेला सुरुवात झाली. २७ जानेवारीपर्यंत ही यात्रा देशातील सर्व शहरात पोहोचणार आहे. पुणे शहरात गुरुवारी (दि. ६) ही यात्रा दाखल झाली. यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी  कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी शनिवारवाड्यापासून काढलेल्या प्रभात फेरींमध्ये सुमारे एक हजार शालेय विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. मुख्य कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. सूत्रसंचालन अदिती कुलकर्णी यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link