Next
१५ ऑगस्टला रत्नागिरीत ‘आर्ट सर्कल’तर्फे स्वरभास्कर बैठक
पं. भीमसेन जोशींना आदरांजलीसाठी सलग सातव्या वर्षी आयोजन
BOI
Monday, August 06, 2018 | 05:40 PM
15 1 0
Share this story

रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्ट सर्कल या संस्थेतर्फे येत्या १५ ऑगस्टला स्वरभास्कर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना संगीतमय आदरांजली वाहिली जाणार आहे. आयोजनाचे हे सलग सातवे वर्ष असून, यंदा मुंबईतील ‘संगीत साधक’ संस्थेचे युवा गायक व रत्नागिरीतील स्थानिक गायकांचे सादरीकरण होणार आहे.

हा कार्यक्रम शास्त्रीय संगीताला वाहिलेला असून, नव्या पिढीतील कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. ‘संगीत साधक’च्या कलाकारांचे रत्नागिरीत प्रथमच सादरीकरण होत आहे. रत्नागिरीकरांनी स्वरभास्कर बैठकीचा जरूर आस्वाद घ्यावा, असे आवाहन ‘आर्ट सर्कल’ने केले आहे.

हा कार्यक्रम रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात १५ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी चार ते रात्री १२ या वेळेत होणार आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर २०११मध्ये ‘आर्ट सर्कल’ने रत्नागिरीतील कलाकारांना एकत्र करून तब्बल १८ तास स्वरांजली अर्पण केली होती. त्याच वेळी स्वरभास्कर बैठकीच्या संकल्पनेचे बीज रोवले गेले. शास्त्रीय संगीतातील नवोदित कलाकारांचा एक स्वतंत्र मंच या बैठकीमुळे निर्माण झाला. गेली सहा वर्षे या मंचावर अनेक गुणी कलाकारांनी शास्त्रीय संगीत सादर केले आहे.

‘संगीत साधक’ संस्थेबद्दल...
भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल आपले विचार, नावीन्यपूर्ण कल्पना, प्रयोग, सांगीतिक देवाणघेवाण एकाच छताखाली व्हावी या हेतूने आदित्य मोडक व रमाकांत गायकवाड यांनी २०१४मध्ये संगीत साधक या समूहाची स्थापना केली. हल्लीच्या काळात एका कलाकाराने कार्यक्रमाला उपस्थित राहून दुसऱ्या कलाकारांबरोबर आपले विचार मांडणे, खूप दुर्मीळ झाले आहे. हे लक्षात घेऊन आदित्य आणि रमाकांत यांनी सर्व साधकांना एकत्र करून आपापली कला सर्वांसमोर मांडण्यासाठी बैठक या नावाने मैफलीचे आयोजन केले. २०१४ साली सात-आठ साधकांपासून सुरू झालेल्या समूहाच्या सदस्यांची संख्या आज ५०हून अधिक आहे. यात अनेक शहरांतील, तसेच इतर राज्यांतील कलाकारांचाही सहभाग आहे. या सर्व साधकांचे गुरू, घराणे तसेच गायकीचे अंग वेगवेगळे असले, तरी ‘संगीत साधक’च्या माध्यमातून ते एकत्र आले आहेत.

‘स्वरभास्कर’मध्ये असतील हे कलाकार...
‘स्वरभास्कर’ बैठकीत ‘संगीत साधक’चे कलाकार आदित्य मोडक, रमाकांत गायकवाड, गंधार देशपांडे, कौस्तुभ गांगुली, मानस विश्वरूप, गायत्री गायकवाड, पौलमी देशमुख, जयदीप वैद्य यांचे सादरीकरण होईल. त्यांना सुधांशु घारपुरे, रामकृष्ण करंबेळकर, तेजोवृष जोशी, विशाल म्हात्रे संगीतसाथ करतील. तसेच रत्नागिरीतील गायक वरद केळकर, कुणाल भिडे, सिद्धी बोन्द्रे, अजिंक्य पोंक्षे यांचेही सादरीकरण होणार असून, हेरंब जोगळेकर, केदार लिंगायत, वरद सोहनी, मधुसूदन लेले त्यांना संगीतसाथ करतील.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : बुधवार, १५ ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link