Next
प्रत्येक स्त्रीने कराव्यात अशा १० महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या
BOI
Monday, February 04, 2019 | 05:45 PM
15 0 0
Share this article:

आजच्या आधुनिक काळातील स्त्री ही रोजच्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. त्यामुळे या सगळ्यांत फिट राहण्यासाठी तिचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने एका ठराविक वयानंतर काही विशेष शारीरिक तपासण्या नियमितपणे करणे आवश्यक आहे...
............................
प्रत्येक स्त्रीचे आरोग्य हे वेगवेगळे असते. ते वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते आणि या गोष्टींचा तिच्या आरोग्यावर परिणामही होत असतो. मधुमेह, रक्तातील साखर, कॅल्शियमची कमतरता, थायरॉईडमधील बिघाड यांसारख्या आरोग्य समस्यांचे साध्या-सोप्या चाचण्यांमधून निदान होऊ शकते. त्यामुळेच खाली दिलेल्या १० तपासण्यांची स्त्रियांनी दखल घेणे आवश्यक आहे.

बॉडी मास इंडेक्स : 
‘बॉडी मास इंडेक्स (बीएमआय)’ म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या उंची आणि वजनानुसार शरीरामधील स्थूलत्व तपासणे. सध्या वेगवेगळे अॅप्लिकेशन्स आणि ऑनलाइन बीएमआय कॅलक्युलेटरद्वारे प्रत्येकाला आपला ‘बीएमआय’ मोजता येणे शक्य झाले आहे. तुमच्या किलोग्रॅममधील वजनाला तुमच्या मीटरमधील उंची, वजन आणि वयाने भागले असता ‘बीएमआय’ काढता येतो. त्यानंतर ‘बीएमआय’ कॅलक्युलेटर प्रत्येकाच्या वैयक्तिक ‘बीएमआय’ची तीव्रता (उच्च, मध्यम आणि निम्न) नोंदवतो. तसेच या आकड्याची इतर व्यक्तींच्या ‘बीएमआय’शी तुलनादेखील करतो.

अशक्तपणा तपासणी
एखाद्या व्यक्तीच्या रक्तामधील लाल पेशींची संख्या कमी झाली असेल, तर ती व्यक्ती अशक्त मानली जाते. लाल पेशींमधील हिमोग्लोबिनच्या कमी पातळीमुळे रक्तात कमी प्रमाणात ऑक्सिजन शोषला जातो. त्यामुळे व्यक्तीला अशक्त किंवा अस्वस्थ वाटू लागते.

व्हिटॅमिन कमतरता 
भारतीय महिलांमध्ये सर्वसाधारणपणे व्हिटॅमिन ‘डी’ आणि ‘बी१२’ची कमतरता आढळते. ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्या मूल होण्यासाठी नियोजन करत आहेत, अशा महिलांमध्ये व्हिटॅमिन ‘बी१२’ची कमतरता आढळल्यास त्यांचे बाळंतपण अडचणीचे होऊ शकते. हाडे बळकट राहण्यासाठी कॅल्शियमची पातळी योग्य असणे आवश्यक असते. त्यासाठी व्हिटॅमिन ‘डी’ची शरीराला अत्यंत आवश्यकता असते. मात्र वयोमानानुसार शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाण घटत जाते.

रक्तदाब तपासणी
वयाच्या १८व्या वर्षापासून दर दोन वर्षांनी प्रत्येक स्त्रीने आपला रक्तदाब तपासला पाहिजे. हा रक्तदाब सर्वसाधारणपणे १२०/८० असतो. एखाद्या स्त्रीचा रक्तदाब जर सतत चढा राहत असेल, तर त्या स्त्रीने ‘स्ट्रेस टेस्ट’ करून घ्यावी.

शरीरामधील साखर तपासणी
प्रत्येक स्त्रीने वयाच्या चाळीशीनंतर मधुमेहाचे निदान करण्यासाठी दर तीन वर्षांनी रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी करणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबात जर मधुमेही व्यक्ती असतील तर तुम्ही ही तपासणी थोडी आधीच म्हणजे वयाच्या तिशीमध्येच करायला हवी.

कोलेस्टेरॉल तपासणी
प्रत्येक स्त्रीने आपल्या वयाच्या पंचविशीनंतर रक्तामधील कोलेस्टोरॉलची तपासणी करायला हवी. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळू शकतो. या तपासणीचा निकाल योग्य असेल, तर मग दर तीन वर्षांनी ही तपासणी करावी.

‘पेप स्मियर्स’ आणि ‘पेलविक’ तपासणी
२१ वर्षांवरील स्त्रिया किंवा ज्या स्त्रिया लैंगिक संबंध ठेवत असतील, त्यांनी ही तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. या आजारामुळे स्त्रिया मोठ्या प्रमाणावर आपला जीव गमावतात.

मेमोग्राम्स आणि स्तन चाचणी
२० ते ४० वयोगटामधील स्त्रियांची ही चाचणी डॉक्टर स्वत: करतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या सूचनेनुसार वयाच्या चाळीशी पार केलेल्या स्त्रियांनी दर एक किंवा दोन वर्षांनी ही तपासणी करावी.

हाडांचा ठिसूळपणा तपासणी
६५ वर्षांच्या स्त्रियांनी हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र ज्या स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता आढळली असेल, तसेच ज्यांच्या कुटुंबात हाडे ठिसूळ झाल्याची उदाहरणे असतील, त्यांनी ही तपासणी थोडी आधी करावी.

मोठ्या आतड्याचा किंवा कोलोन कर्करोग
सर्वसाधारणपणे वयाच्या पन्नाशीमधील स्त्रियांनी मोठ्या आतड्याच्या किंवा कोलोन कर्करोगाची तपासणी करणे गरजेचे आहे. ही तपासणी साधारणपणे दर पाच ते दहा वर्षांनी केली जाते. ही तपासणी जर सर्वसाधारण असेल, तर दर पाच ते दहा वर्षांनी सिगमोडोस्कोपी केली जाते, तर कोलोनोस्कोपीही दहा वर्षांनी केली जाते. ‘नॉनइन्व्हेसिव्ह वर्च्युअल कोलोनोस्कोपी’, हा आणखी एक पर्याय आहे. ज्यांना कोलोन कर्करोगाचा धोका आहे, अशांनी सातत्याने ही तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

- डॉ. निलेश शहा (अध्यक्ष आणि प्रमुख - सायन्स अॅंड इनोव्हेशन)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search