Next
तमिळनाडूतील मसिलामणी ठरली देशातील पहिली अस्थिमज्जादाती
तीन महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन
BOI
Friday, March 15, 2019 | 04:13 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोनवी दिल्ली : तमिळनाडूतील एका छोट्या गावातील मसिलामणी या २६ वर्षांच्या महिलेने केलेल्या अस्थिमज्जा (बोन मॅरो) दानाच्या कार्यामुळे नवी दिल्लीतील एका तीन महिन्यांच्या मुलाला नवे जीवन मिळाले आहे. त्याला असलेल्या असाध्य विकारावर केवळ अस्थिमज्जा प्रत्यारोपण एवढाच उपाय होता. मसिलामणीच्या स्वतःच्या मुलीला थॅलेसेमिया हा गंभीर विकार आहे. त्यामुळे त्या मुलाच्या आई-वडिलांचे दुःख समजून घेऊन स्वतःचा मुलगा समजूनच त्या बाळासाठी अस्थिमज्जा दान केल्याचे मसिलामणीने सांगितले. अस्थिमज्जा दान करणारी ती देशातील पहिली महिला ठरली आहे. 

कोईमतूरजवळच्या मुदलिपालयम या खेड्यातील मसिलामणीचे वयाच्या विसाव्या वर्षी कवियारासन यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर वर्षभरातच त्यांना मुलगी झाली आणि तिला थॅलसेमिया मेजर हा विकार असल्याचे काही काळातच स्पष्ट झाले. या विकारात रक्तातील ऑक्सिजनचे वहन करणाऱ्या हिमोग्लोबिन या घटकाचे प्रमाण वारंवार घटते. त्यामुळे वारंवार रक्त बदलावे (ब्लड ट्रान्स्फ्युजन) लागते. रक्तातील मूळ पेशींद्वारे (ब्लड स्टेम सेल्स) या विकारावर उपचार होऊ शकतात आणि त्या पेशी दात्यांकडून मिळविता येऊ शकतात; मात्र त्यासाठी दात्यांच्या आणि रुग्णाच्या रक्तातील ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन (HLA) हा घटक जुळावा लागतो. रक्तातील मूळ पेशींचे दान करू इच्छिणाऱ्या दात्यांची नोंद ठेवण्याचे काम ‘दात्री’ ही संस्था करते. नात्यातील व्यक्तींच्या रक्तातील हा घटक जुळतोच, असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. तरीही आपल्या रक्तातील घटक जुळला, तर आपल्या मुलीला उपयोग होऊ शकेल, या आशेने मसिलामणी आणि तिच्या पतीने आपले नमुने ‘दात्री’कडे दिले होते. त्यातील घटक तिच्या मुलीशी जुळले नाहीत; नवी दिल्लीतील तीन महिन्यांच्या बाळाशी मात्र ते घटक जुळले. त्याला जन्मतःच असाध्य विकार असल्याने त्याची नोंद ‘दात्री’कडे करण्यात आली होती. मसिलामणीच्या रक्तातील घटक त्या बाळाशी जुळत असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. 

रक्तातील मूळ पेशी एक तर थेट रक्तातून काढल्या जातात किंवा बोन-मॅरो (अस्थिमज्जा - म्हणजेच हाडाच्या आतमधील गाभा) रूपात काढल्या जातात. त्या बाळाला रक्त बदलण्याच्या उपायाचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे त्याला अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची गरज होती. मसिलामणीच्या रक्तातील घटक जुळत असल्याने तिने अस्थिमज्जा दान केल्यास त्या बाळाचा जीव वाचणार होता. डॉक्टर्सनी तिला त्याबद्दल सांगितल्यावर ती लगेचच यासाठी तयार झाली. अर्थात निर्णय घेणे सोपे नव्हते. तिचे पती फॅब्रिकेटर म्हणून काम करतात. त्यांना तिने याची माहिती दिल्यावर तेही लगेचच तयार झाले; मात्र तिची सासू आणि नणंद यांनी मात्र तिला खूप विरोध केला.

‘आमचे गाव खूप छोटे असल्याने या नव्या गोष्टींबद्दल काही माहिती असत नाही. त्यामुळे सगळ्यांना भीती वाटते. त्यातही माझ्या मुलीला असाध्य विकार आहे. त्यामुळे अस्थिमज्जा दान केल्यानंतर मला काही झाले, तर त्या मुलीचे कोण बघणार, अशी काळजी त्यांना वाटत होती. शिवाय मला एक मुलगाही आहे. या सगळ्यामुळे मला विरोध होत होता; पण मी डॉक्टरांशी बोलून शंकांचे निरसन करून घेतले. यातून काहीही दुष्परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्वांचे गैरसमज दूर करून मला यासाठी परवानगी मिळाली. या महत्त्वाच्या प्रसंगी माझ्या पतीने मला दिलेली साथ खूप मोलाची आहे. आमच्याप्रमाणेच दुःख असलेल्या कुटुंबाचे दुःख आमच्यामुळे कमी होऊ शकत असल्याचा आनंद खूप मोठा आहे,’ असे मसिलामणीने सांगितले. 

त्या बाळावर जानेवारी २०१९मध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. अजूनही ते बाळ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे; मात्र प्रत्यारोपण केल्या गेलेल्या पेशी त्याच्या शरीराने स्वीकारल्या नसत्या, तर अल्पावधीतच बाळाचा मृत्यू झाला असता, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. काही कालावधीतच या शस्त्रक्रियेचे यश नेमके दिसून येईल. 

‘बाळाला दुर्मीळ विकार असल्यास आणि त्यातही ती मुलगी असल्यास पत्नीच्या मागे उभे राहणाऱ्या पतींचे प्रमाण कमी आहे; पण माझे पती मात्र या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळेच मी अस्थिमज्जा दान करून दुसऱ्या एका बाळाला जीवदान देऊन शकले. तो आनंद काही वेगळाच आहे,’ असे मसिलामणीने सांगितले. पुन्हा कधी असे दान करण्याची वेळ आली, तरी नक्की करीन, असेही तिने आवर्जून सांगितले. 

‘महिला प्रत्येक क्षेत्रातच उत्तम कामगिरी करत आहेत. मसिलामणीने मूळ पेशींचे दान करून केलेल्या कार्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘दात्री’चे सीईओ रघू राजगोपाल यांनी व्यक्त केली. मसिलामणीमुळे देशातील अन्य महिलांनाही मूळ पेशी दानाची प्रेरणा मिळू शकेल.

मूळ पेशी दानाबद्दल...
कोणीही निरोगी व्यक्ती रक्तातील मूळ पेशींचे दान करू शकते. त्यासाठी चेन्नईतील दात्री या संस्थेकडे अर्ज करावा लागतो. त्यांच्याकडून किट मिळते. अर्जासोबत आपल्या गालातील घटकांचे नमुने कापसाच्या ‘बड’वर घेऊन संस्थेकडे पाठवावे लागतात (हे घरच्या घरी करता येते.). त्यासोबत परीक्षण शुल्क भरावे लागते. त्यावरून एचएलए घटकांचे परीक्षण करून ते अन्य कोणत्या नोंदणीकृत व्यक्तीच्या (रुग्णांच्या) घटकांशी जुळतात का, ते पाहिले जाते. ते जुळले, तरच रक्ताची आणि संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष बोलावले जाते. ते झाल्यानंतर पेरिफेरल ब्लड स्टेम सेल डोनेशन किंवा बोन मॅरो डोनेशन यांपैकी एका पद्धतीने दात्याच्या शरीरातून मूळ पेशी काढून घेतल्या जातात. पहिल्या पद्धतीत दात्याच्या शरीरातील रक्त मशीनद्वारे काढून घेऊन, त्यातून मूळ पेशी काढून घेऊन रक्त पुन्हा शरीरात सोडले जाते. दुसऱ्या पद्धतीत, कमरेच्या हाडातून अस्थिमज्जा काढून घेतली जाते. दुसऱ्या पद्धतीत हॉस्पिटलमध्ये एक दिवस राहावे लागते; मात्र याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या भारतात दर वर्षी १० हजार मुलांना जन्मतःच थॅलेसेमिया विकार असतो. रक्ताशी निगडित विकारांचे प्रमाण वाढले असून, अशा विकारांचे निदान होणाऱ्यांची वार्षिक संख्या २०२०पर्यंत एक लाख ३० हजारांहून अधिक असेल, असे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचा अहवाल सांगतो. त्यामुळेच मूळ पेशींची नोंदणी करणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याची गरज आहे.

दात्री संस्थेबद्दल...
दात्री ही ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था २००९मध्ये सुरू करण्यात आली. रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया, अप्लास्टिक अॅनिमिया असे रक्ताशी संबंधित विकार असलेल्यांचे प्राण वाचविणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. मूळ पेशींच्या संभाव्य दात्यांची नोंदणी करण्याचे महत्त्वाचे काम ही संस्था करते. मूळ पेशी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या जगभरातील कोणत्याही रुग्णाला या माहितीचा उपयोग होऊ शकतो. डॉ. नीजिह सेरेब आणि डॉ. सू यंग यांनी स्थापन केलेली हिस्टोजेनेटिक्स ही लॅबोरेटरी ‘एचएलए टायपिंग’चे काम करते. त्या संस्थेच्या सहकार्याने रघू राजगोपाल यांनी चेन्नईत दात्री ही संस्था सुरू केली.

अधिक माहितीसाठी दात्री संस्थेची वेबसाइट : https://datri.org/
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search