Next
‘तरुणांनी ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत’
पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Thursday, February 14, 2019 | 05:03 PM
15 0 0
Share this article:औंध : ‘आज तरुणांसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीत अपयश आले, तर दुसरा पर्याय निवडायला हवा. आपण अनुभवांमधून अनेक गोष्टी शिकत असल्यामुळे आजच्या तरुणांनी डोळ्यासमोर कोणतेतरी ध्येय ठेऊन ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि सकारात्मक वृत्तीने जीवन जगाले पाहिजे,’ असे प्रतिपादन पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले.

औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी आशियाई शरीरसौष्ठव क्रीडापटू आकाश आवटे, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ आदी मान्यवर उपस्थित होते.बर्गे म्हणाले, ‘आपण स्वबळावर आपले कर्तृत्व सिद्ध करायला हवे. आपण ज्या स्तरामधून आलो आहोत त्याचा आपण विचार केल्यास त्यामधून बाहेर पडण्याची प्रेरणा आपणास मिळू शकते. तरुणांसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एखाद्या गोष्टीत आपणास अपयश आले, तर आपण दुसरा पर्याय निवडायला पाहिजे. वेळेचे योग्य नियोजन करायला शिकले पाहिजे. दोन तासांचा अभ्यास एका तासात करण्याची क्षमता आपण आत्मसात करायला पाहिजे. आपण अनुभवांमधून अनेक गोष्टी शिकतो. त्यामुळे आजच्या तरुणांनी कोणतेतरी ध्येय ठेऊन सकारात्मक वृत्तीने जीवन जगायला पाहिजे.’आशियाई शरीरसौष्ठव क्रीडापटू आवटे यांनी आजच्या तरुणांना प्रत्येक क्षेत्रात चांगली संधी उपलब्ध असल्याने आपल्यातील कलागुणांना ओळखून आजच्या तरुणांनी वाटचाल करण्याचा सल्ला संदेश दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नारखेडे म्हणाले, ‘महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना ओळखावे आणि त्यानुसार मार्गक्रमण करावे. आज प्रत्येक क्षेत्रात चांगली क्षमता असणाऱ्या माणसांची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील चांगल्या कलागुणांना अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न करावा.’प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी महाविद्यालयातील क्रीडा विभाग आणि सांस्कृतिक विभाग उत्कृष्ट कार्य करीत आहे. या विभागांमार्फत वर्षभर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळविले आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, तसेच त्याने त्या क्षेत्रात अधिकाधिक उंच भरारी घ्यावी म्हणून या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले आहे.’वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्याध्यक्षा डॉ. शशी कराळे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे, प्रा. भीमराव पाटील यांनी क्रीडा विभागाच्या अहवालाचे, तर डॉ. सुहास निंबाळकर यांनी सांस्कृतिक विभागाच्या अहवालाचे वाचन केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. निंबाळकर यांनी करून दिला. डॉ. संजय नगरकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सदाफळ यांनी आभार मानले. या वेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search