Next
स्वदेशी फुलांना मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
‘ला फ्लोर’च्या वतीने आकर्षक पुष्पगुच्छ विक्री सेवा
BOI
Wednesday, May 08, 2019 | 03:13 PM
15 0 0
Share this article:


पुणे : भारतातील फुलांची बाजारपेठ झपाट्याने वाढत असून, २०२४ पर्यंत ती ४७२ बिलियन रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यामध्ये सजावट आणि पुष्पगुच्छांच्या उलाढालीचा मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर, स्वदेशी फुलांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ओरीयन फ्लोरा आणि इंडीफ्रेश या संस्थांनी संयुक्तपणे ‘ला फ्लोर’ या नव्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. 

‘या उपक्रमाद्वारे जागतिक दर्जानुसार उत्पादित केलेल्या फुलांचे सर्जनशीलतेने बनविलेले सुंदर असे पुष्पगुच्छ भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,’ अशी माहिती इंडीफ्रेशचे संचालक हरिहरन सुब्रमणियम् यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


‘ला फ्लोर’चे संचालक विश्वनाथन सुब्रमणियम्, तांत्रिक अधिकारी विल्यम व्हॅन ब्रॅग्ट, सुंदर पुष्पगुच्छ बनविणाऱ्या इंग्लंडच्या प्रसिद्ध डिझायनर जो मूडी आणि ‘ला फ्लोर’च्या तळेगाव प्रकल्पाच्या प्रमुख पवित्रा कोचना आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

पवित्रा कोचना, इंडीफ्रेशचे संचालक हरिहरन सुब्रमणियम व जो मूडी

याविषयी अधिक माहिती देताना हरिहरन सुब्रमणियम् म्हणाले, ‘कोणताही सण, समारंभ असला की,प्रसन्नता, आनंदाचे प्रतिक,शुभेच्छा म्हणून पुष्पगुच्छ दिले जातात. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुले वापरली जातात. मागणी वाढत असल्याने फुलोत्पादन क्षेत्रही वाढत आहे;मात्र असे असले तरी आज भारतात सुमारे ८५ टक्के फुलांची खरेदी ही रस्त्याच्या बाजूला उभे असलेले विक्रेते, स्थानिक विक्रेते यांच्या माध्यमातून होताना दिसते. जागतिक दर्जाची फुले सर्जनशीलतेने पुष्पगुच्छ स्वरूपात देत ग्राहकांच्या त्या खास क्षणांना अधिक खास बनविण्यासाठी आम्ही ‘ला फ्लोर’ या उपक्रमाला सुरुवात केली आहे. 

यामध्ये स्थानिक फुले उत्पादकांना जागतिक दर्जाची फुले उत्पादित करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीचे बुके डिझाइनर या फुलांचे आंतरराष्ट्रीय दर्जानुसार डिझाईन करतात आणि हे पुष्पगुच्छ ग्राहकांसाठी खास तयार केले जातात. हे पुष्पगुच्छ तयार करताना उच्च दर्जाचा पुनर्वापर करण्याजोगा पेपर वापरला जातो. याबरोबरच फुलांचा आणि पुष्पगुच्छांचा दर्जा अधिक काळ चांगला रहावा यासाठी या फुलांची व पुष्पगुच्छांची वाहतूकदेखील तापमान नियंत्रित ट्रक्समधून करण्यात येते.’    
                       
‘फुलांची इतकी मोठी बाजारपेठ असली, तरी भारतातील फुलशेती क्षेत्र हे असंघटीत आहे. यामागील मुख्य कारणे म्हणजे निश्चित ग्राहक, आवश्यक भांडवली गुंतवणूक, या क्षेत्रासंबंधीची माहिती यांचा अभाव हा होय. फुलशेती करणाऱ्यांबरोबरच विक्रेत्यांनादेखील आम्ही या माध्यमातून एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहोत,’ असे ‘ला फ्लोर’चे मुख्य तांत्रिक अधिकारी विल्यम व्हॅन ब्रॅग्ट यांनी नमूद केले.

‘फुलांच्या बाबतीत भारतीयांची मानसिकता आता बदलत आहे. केवळ पारंपारिक सण समारंभांनाच नव्हे, तर वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, व्हॅलेन्टाइन्स डे अशा विशेष दिवसांनाही फुले, पुष्पगुच्छ खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यातही आपण सर्जनशीलपणे आकर्षकरीत्या फुलांची मांडणी करून दिली, तर त्याला ग्राहकही विशेष पसंती देतात. हेच लक्षात घेत ‘ला फ्लोर’मध्ये आंतरराष्ट्रीय ट्रेंड्सचा अभ्यास करून आकर्षक पुष्पगुच्छ तयार करण्यावर भर दिला जातो,’ असे पंधरा वर्षांहून अधिक काळ फुलोत्पादन क्षेत्राचा अनुभव असलेल्या ‘ला फ्लोर’च्या प्रसिद्ध पुष्पगुच्छ डिझायनर प्रमुख जो मूडी यांनी सांगितले.   

‘भारतीय फुलांबरोबरच विदेशी जातीच्या फुलांचेही आम्ही उत्पादन करतो. त्यांची सुंदर सजावट करून हे पुष्पगुच्छ ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात. सध्या तळेगाव येथे ३० ते ४५ शेतकरी फुलोत्पादन करत असून, त्यांच्या शेतावर जाऊन फुले खरेदी केली जातात आणि त्यांना पैसे दिले जातात. फुले हवी तशी नसतील, तर लगेचच सांगितले जाते. शेतकऱ्यांना फुलांच्या जाती, त्याची लागवड, घ्यावयाची काळजी याबाबत सर्व माहिती दिली जाते. ही शेती कमी पाण्यात होते, तसेच हे वर्षभर मागणी असणारे उत्पादन आहे. वाढती मागणी, फुले खरेदीची हमी, चांगला दर आणि मध्यस्थाविना व्यवहार होत असल्याने फुलशेतीकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे,’ असे   तळेगाव दाभाडे येथे फुलांचे उत्पादन करणाऱ्या पवित्रा कोचाना यांनी सांगितले.       

‘‘ला फ्लोर’चे हे पुष्पगुच्छ २५० रुपयांपासून उपलब्ध असून, यामध्ये मोनोलाईन बुके, मिक्स्ड बुके आणि प्रीमियम बुके अशी विभागणी करण्यात आली आहे. यापैकी एकाच प्रकारच्या फुलांचे मोनोलाईन बुके हे ३६० रुपयांपासून, मिक्स्ड बुके ५८५ रुपयांपासून, तर प्रीमियम बुके ९२० रुपयांपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी सध्या पुणे, उटी, बेंगळुरू येथून फुले खरेदी केली जातात. कंपनीचा अत्याधुनिक प्रकल्प तळेगाव येथे असून, तेथे फुले आणल्यानंतर त्यांचे आकर्षक पुष्पगुच्छ बनवले जातात. त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून ते तापमाननियंत्रणाची सुविधा असलेल्या वाहनातून ठिकठिकाणी पाठवले जातात. सध्या पुणे, मुंबई, बेंगळूरू या देशातील प्रमुख शहरातील रिटेल शॉप्स, सुपरमार्केट यांबरोबर स्टार मार्केट, बिग बझार, गोदरेज नेचर्स बास्केट या ठिकाणी हे बुके उपलब्ध आहेत. पुण्यात १३ तर मुंबईतील १५ दुकानांमध्ये याची विक्री केली जाते. नजीकच्या काळात हैद्राबाद आणि दिल्ली यांसारख्या आणखी शहरात विस्तार करण्यात येणार आहे,’ असेही सुब्रमणियम् यांनी नमूद केले.               
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search