Next
वैजयंतीमाला, श्रीदेवी, अल्फ्रेड हिचकॉक
BOI
Monday, August 13, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

हिंदी चित्रपटसृष्टीतली ५० आणि ६० अशी दोन दशकं गाजवणारी आघाडीची अभिनेत्री वैजयंतीमाला, ८०च्या दशकातली हिंदी चित्रपटसृष्टीची सुपरस्टार श्रीदेवी आणि रहस्यमय थरारपटांचा सम्राट अल्फ्रेड हिचकॉक यांचा १३ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’ मध्ये त्यांचा अल्प परिचय...
........
वैजयंतीमाला 

१३ ऑगस्ट १९३६ रोजी चेन्नईजवळ जन्मलेली वैजयंतीमाला ही हिंदी चित्रपटसृष्टीतली १९५०चं आणि ६०चं – अशी दोन दशकं गाजवणारी आघाडीची अभिनेत्री! ती भरतनाट्यनिपुण नृत्यांगना होती. तिची पडद्यावरची नृत्यं ही अत्यंत आकर्षक आणि कमालीच्या चपळतेने साकार केलेली असत. एके काळी उत्तर भारतीय अभिनेत्रींचा दबदबा असणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या आगमनानंतर दाक्षिणात्य नायिकांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुकर झाला होता. ती कुशल अभिनेत्रीही होती आणि बिमल रॉय, बी. आर. चोपडा, राज कपूर, नितीन बोस, लेख टंडन, विजय आनंद, मोहन सेहगल अशा सर्वच आघाडीच्या दिग्दर्शकांबरोबर तिने काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. दिलीपकुमार आणि सुचित्रा सेनबरोबर ‘देवदास’मध्ये तिने ताकदीने साकारलेली चंद्रमुखी जितकी अविस्मरणीय होती, तितकीच ‘आम्रपाली’मधली आम्रपाली आणि जितकी ‘गंगा जमुना’मधली धन्नो जबरदस्त होती, तितकीच ‘साधना’मधली चंपाबाई आणि तितकीच ‘संगम’मधली राधा! त्या वेळच्या राज-दिलीप-देव या महानायकांबरोबरच तिने राजेंद्रकुमार, शम्मी कपूरबरोबरही एकाहून एक हिट सिनेमे दिले. सैंया दिल में आना रे, नील गगन की छांव में, तडप ये दिन रात की, तुम्हे याद करते करते, जाओ रे जोगी, जिसे तू कबूल कर ले, अब आगे तेरी मर्जी, वो न आयेंगे पलटकर, औरत ने जनम दिया मर्दों को, मांग के साथ तुम्हारा, उडे जब जब झुल्फे तेरी, आजा रे परदेसी, जुलमी संग आंख लडी, घडी घडी मेरा, चढ गयो पापी बिछुआ, इना मीना डिका, मन डोले मेरा, मेरा दिल ये पुकारे, जादूगर सैया, ढूंढो ढूंढो रे साजना, दो हंसो का जोडा, इतना है तुमसे प्यार मेरे, रुलाके गया, दिल पुकारे, होठों पे ऐसी बात, मेरा प्यार भी तू है - अशी तिच्यावर चित्रित झालेली गाणी प्रचंड गाजली आहेत. तिला चार फिल्मफेअर पुरस्कार, बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचे मानाचे दोन पुरस्कार आणि याशिवाय इतर दहा पुरस्कार, तसंच भरतनाट्यम सेवेबद्दल सुमारे २० विविध संस्थांकडून सन्मान मिळाले आहेत.
(वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेल्या ‘मोहब्बत में पहला कदम रखनेवालो...’ या गीताचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
.........

श्रीदेवी 

१३ ऑगस्ट १९६३ रोजी शिवकाशीमध्ये जन्मलेली श्रीदेवी ही ८०च्या दशकातली हिंदी चित्रपटसृष्टीची सुपरस्टार म्हणून अफाट लोकप्रिय असणारी नृत्यनिपुण दाक्षिणात्य अभिनेत्री. बालकलाकार म्हणून तिने १९६७ सालीच तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाला सुरुवात केली होती. १९७५ सालच्या ‘ज्युली’ या हिंदी सिनेमातही ती अभिनेत्री लक्ष्मीच्या लहान बहिणीच्या रोलमध्ये होती. १९७९ सालच्या ‘सोलहवां सावन’ या सिनेमातून तिने अमोल पालेकरची नायिका म्हणून हिंदी पडद्यावर एन्ट्री केली; पण तिचा खऱ्या अर्थाने गाजलेला सिनेमा म्हणजे १९८३ सालचा हिम्मतवाला. यात जितेंद्रबरोबर डान्सिंग स्टार म्हणून ती लोकांना पसंत पडली. त्याच वर्षी आलेल्या सदमा या सिनेमातून तिच्या जबरदस्त अभिनयाचंही दर्शन प्रेक्षकांना घडलं. पुढे नागिन, नगिना, चांदनी, चालबाज, लम्हें यांसारख्या सिनेमांतून आपली अभिनयाची ‘रेंज’ दाखवत तिने ८०चं दशक गाजवत आपलं सुपरस्टारपद सिद्ध केलं. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड याही भाषांमध्ये तिचे सिनेमे येत होतेच! रजनीकांत, कमल हासन, अमिताभ, जितेंद्र या सीनियर अभिनेत्यांबरोबरच तिने अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, सनी देओल, ऋषी कपूर यांच्यासोबत चित्रपटात मुख्य भूमिका मिळवल्या. लग्न केल्यानंतर पंधरा वर्षांचा ब्रेक घेऊन इंग्लिश विंग्लिश  या सिनेमातून तिने पुन्हा जोमदार पदार्पण केलं होतं. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी तिचा अकस्मात अपघाती मृत्यू झाला. तिने आपल्या कारकिर्दीत फिल्मफेअर, स्क्रीन, झी सिने असे एकूण १७ पुरस्कार मिळवले होते. 
.......

अल्फ्रेड हिचकॉक 

१३ ऑगस्ट १८९९ रोजी लंडनमध्ये जन्मलेला अल्फ्रेड हिचकॉक हा रहस्यमय थरारपटांचा सम्राट मानला जातो. लंडन युनिव्हर्सिटीतून ड्रॉइंग आणि डिझायनिंग शिकलेल्या हिचकॉकला फेमस प्लेयर्स या लास्कीच्या अमेरिकन कंपनीच्या इस्लिन्ग्टन शाखेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि तिथेच तो प्रॉडक्शन डिझायनिंग, एडिटिंग, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन शिकला. मिसेस पीबॉडी, ऑल्वेज टेल युअर वाइफ, दी प्लेझर गार्डन, माउंटन ईगल, दी लॉजर अशा छोट्या फिल्म्स करत असताना त्याला नाव मिळवून दिलं ते ‘ब्लॅकमेल’ या १९२९ सालच्या सिनेमाने! पुढे ‘दी मॅन हू न्यू टू मच’ या सिनेमाने त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून दिली. ३९ स्टेप्स, सिक्रेट एजंट, यंग अँड इनोसंट अशा सुरुवातीच्या सिनेमांनंतर त्याचे दी लेडी व्हॅनिशेस, जमेका इन्न, डायल एम फॉर मर्डर, मिस्टर अँड मिसेस स्मिथ, लाइफबोट, स्ट्रेंजर्स ऑन ए ट्रेन, आय कन्फेस, टू कॅच ए थीफ, व्हर्टिगो, फ्रेन्झी असे उत्तरोत्तर एकाहून एक जबरदस्त थरारपट येत गेले. दुसरीकडे त्याचं इंग्रिड बर्गमनशी अफलातून ट्युनिंग जमून तिच्याबरोबर त्याने स्पेलबाउंड, नटोरीयस आणि अंडर केप्रिकॉर्न यांसारखे रहस्यपट बनवले. त्याची मास्टरी समजले गेलेले सिनेमे म्हणजे रिबेका, सायको, नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट, रिअर विंडो आणि दी बर्डस्! २९ एप्रिल १९८० रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला. त्याला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, आठ लॉरेल पुरस्कार आणि पाच जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते. रिबेका सिनेमाला एकूण ११ ऑस्कर नामांकनं मिळाली होती आणि एक ऑस्कर मिळाला. 

यांचाही आज जन्मदिन :

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे आचार्य अत्रे (जन्म : १३ ऑगस्ट १८९८, मृत्यू : १३ जून १९६९) 
‘रणांगण’ लिहिणारे विश्राम बेडेकर (जन्म : १३ ऑगस्ट १९०६, मृत्यू : ३० ऑक्टोबर १९९८) 
अप्रतिम निसर्गकविता लिहिणारे बालकवी (जन्म : १३ ऑगस्ट १८९०, मृत्यू : पाच मे १९१८) 
या सर्वांबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 
प्रसिद्ध सिनेतारका मधुर जाफरी (जन्म : १३ ऑगस्ट १९३३) 
सिनेतारका योगिता बाली (जन्म : १३ ऑगस्ट १९५२) 
सिनेतारका अनिता राज (जन्म : १३ ऑगस्ट १९६२) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link