Next
सहगायन आणि व्हायोलिन वादनाने गानसरस्वती महोत्सवाला सुरुवात
देवकी पंडित यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
BOI
Saturday, February 02, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

गानसरस्वती महोत्सवात गायन सादर करताना एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या पणती एस. ऐश्वर्या आणि एस. सौंदर्या.

पुणे : पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गानसरस्वती महोत्सवा’ला शुक्रवारी, एक फेब्रुवारी २०१९ रोजी शानदार सुरुवात झाली. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचा हा सातवा महोत्सव महालक्ष्मी लॉन्स येथे होत आहे.

प्रसिद्ध कर्नाटकी गायिका भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या पणती एस. ऐश्वर्या आणि एस. सौंदर्या यांच्या गायनाने महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी गायलेल्या वर्णम, साहित्य आणि स्वर यांचा मिलाफ असलेल्या राग शंकराभरणम् आणि राग सावेरीने उपस्थितांची मने जिंकली. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांनी १९६६ साली युनायटेड नेशन्स येथे गायलेली ‘मैत्रीम भजत’ ही कांची परमाचार्य यांनी लिहिलेली, संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली विश्वशांतीचा संदेश देणारी रचनादेखील या दोघींनी सादर केली.  याबरोबरच ‘मै हरी चरणन की दासी...’ ही रचनादेखील त्यांनी सादर केली. या दोघींनीही गानसरस्वती महोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुण्यात सादरीकरण केले. त्यांना विश्वजित मट्टूर (व्हायोलिन), फणिंद्र भास्कर (मृदंगम्), भाग्यलक्ष्मी कृष्णा (मोरचंग), अश्विनी पुरोहित व शुभम खंडाळकर (तानपुरा व स्वरसाथ) यांनी साथसंगत केली.

व्हायोलिन वादक एन. राजम यांच्या कन्या डॉ. संगीता शंकर आणि नात नंदिनी शंकर व्हायोलिन वादन सादर करताना

यानंतर सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक एन. राजम यांच्या कन्या डॉ. संगीता शंकर आणि नात नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांनी राग श्यामकल्याणने वादनाला सुरुवात करत, विलंबित एकताल, मध्य आणि धृत लयीत आडाचौताल सादर केला. ‘न मानुंगी ना मानूंगी उनके मनाये बिना...’ ही राग खमाजमधील ठुमरी आणि ‘नरवर कृष्णा समान’ हे नाट्यगीत सादर करून त्यांनी रसिकांना मोहवून टाकले. त्यांना मुकेश जाधव यांनी तबल्याची साथ केली. 

गायिका देवकी पंडित

त्यानंतर पहिल्या दिवसाच्या समारोपाचे सत्र रंगले ते आग्रा जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्या स्वरांनी. त्यांनी राग रागेश्रीमध्ये ‘आली री पलक न लागी...’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर ‘देखो श्याम गेहेलीनी बैया मोरी...’ ही रचना सादर केली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी) आणि भरत कामत (तबला), सुस्मिरता डवाळकर (तानपुरा व स्वरसाथ) यांनी साथसंगत केली.

शनिवारी दि. दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता अंकिता जोशी आणि ऋतुजा लाड यांचे गायन, देबोप्रिया आणि सुचीस्मिता चॅटर्जी यांचे बासरीवादन आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांचे सादरीकरण होईल. 

याबरोबरच दर वर्षीप्रमाणे या वर्षी नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ ‘ पं. शरद साठे यांना तर ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार’ गोव्याचे सुप्रसिद्ध संगतकार पं. राया कोरगावकर (हार्मोनियम) आणि पं. दयानिधेश कोसंबे (तबला) यांना एकत्रितपणे दिला जाईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search