Next
‘बोलीभाषा वाढवते प्रमाणभाषेची समृद्धी’
राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचा समारोप
प्रेस रिलीज
Tuesday, November 27, 2018 | 03:33 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘बोलीभाषा या प्रमाणभाषेच्या पूरक नाही, तर प्रेरक भाषा आहेत. टप्प्याटप्प्यांवर बोलल्या जाणाऱ्या या बोलीभाषा प्रमाणभाषेची समृद्धी वाढवत असतात. त्यामुळे बोलीभाषा टिकवणे आवश्यक आहे. राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनामुळे तत्वदर्शन आणि साहित्यदर्शन घडण्याबरोबरच बोलीभाषांच्या संवर्धनास मदत होणार आहे,’ असे प्रतिपादन लेखक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी डॉ. देखणे बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील श्री वर्धमान प्रतिष्ठान येथे आयोजित या संमेलनाच्या समारोपावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, ज्येष्ठ लेखक भारत सासणे, कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, संमेलनाध्यक्ष रंगनाथ नाईकडे, स्वागताध्यक्ष कवयित्री मंदा नाईक, कार्याध्यक्ष चंद्रकांत शहासने, संमेलन दिंडी प्रमुख उर्मिला कराड, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे ज्योतिराम कदम, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त मंजिरी शहासने, अॅड. नंदिनी शहासने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या वेळी ‘मराठी-अहिराणी-झाडी बोलीभाषा’ यावर परिसंवाद झाले. सैनिकीकरणाच्या कार्यासाठी बहादूरवाडी येथील मामा देसावळे, स्वातंत्र्यसेनानी मोरेश्वर गोपाळ बवरे व सुशीलाबाई बवरे (मरणोत्तर) जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मराठीच्या बोलीभाषेतून रंगलेल्या आद्यकवी मुकुंदराज कवी संमेलनाला श्रोत्यांच्या उत्तम प्रतिसाद मिळाला. डॉ. मुळीक यांनी वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले.

डॉ. देखणे म्हणाले, ‘अनेक प्रकारची साहित्य संमेलने होतात. पण राष्ट्रभक्ती जागविणारे हे पहिलेच संमेलन असावे. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवड, तसेच बोलीभाषांचे संवर्धन करण्याचा विचार मांडू पाहणारे हे संमेलन वेगळी उंची गाठेल. आज समाजात राष्ट्रीय जाणिवेचा अभाव दिसून येतो. अशावेळी हे संमेलन उपयुक्त ठरेल.’प्रा. कराड म्हणाले, ‘जागतिक पातळीवर तापमान वाढ आणि पर्यावरणाचा ऱ्हास या दोन समस्या भेडसावत आहेत. यावर उपाय म्हणून वृक्षलागवड करणे अत्यावश्यक आहे. त्याची सुरुवात शाळा-महाविद्यालयातून होणे गरजेचे आहे. एमआयटीने आपल्या सर्वच संस्थांच्या परिसरात वृक्षलागवडीवर भर दिलेला आहे. युवा पिढीला घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यायला हवा.’

चंद्रकांत शहासने म्हणाले, ‘या संमेलनाला मिळालेला प्रतिसाद आनंददायी आहे. राष्ट्रभक्तीचा वेगळा विचार पेरण्याचे सामर्थ्य या संमेलनाने दाखवून दिले आहे. झाडे लावणे, जगवणे आणि पर्यावरण रक्षण ही राष्ट्रभक्ती समजून आपण काम करावे.’

अॅड. नंदिनी शहासने, उत्तम पवार, साधना जोशी, भंडारा येथील डॉ. हरिश्चंद्र बोरकर, प्रा. ना. गो. थुटे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रा. नीना देसाई, संजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. मंजिरी शहासने यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link