Next
डॉ. पवार यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
प्रेस रिलीज
Friday, November 17, 2017 | 02:14 PM
15 0 0
Share this article:

डॉ. जयसिंगराव पवारजयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थ आणि साहित्य-सुधा मंचतर्फे दिले जाणारे विविध पुरस्कार १६ नोव्हेंबर रोजी येथे जाहीर करण्यात आले.

पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या नावे दिला जाणारा सामाजिक कार्याचा पुरस्कार कोल्हापूरातील ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि शाहूंचे चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांना, तर ‘पी. बी. पाटील साहित्यरत्न पुरस्कार’ धामणे (ता. आजरा) येथील ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील यांना देण्यात येणार आहे. याचबरोबर कृषी क्षेत्रात वेगळे योगदान देणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठीचा ‘शेतकरी राजा पुरस्कार’ दुधारी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी अमोल लकेसर यांना देणार असल्याची घोषणा निमशिरगाव ग्रामीण साहित्य संमेलनाचे संयोजक पद्माकर पाटील, रावसाहेब पुजारी, प्रा. शांतराम कांबळे, सचिव गोमटेश पाटील यांनी केली.

या पुरस्कारांचे वितरण १० डिसेंबर रोजी निमशिरगाव येथे होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सत्रात संमेलनाध्यक्ष राजन खान व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाईल. निमशिरगाव येथे गेली २० वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविले जात आहे. यंदा साहित्य संमेलनामध्ये बाळासाहेब सांगळे यांच्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंच्या चित्राचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.

अमोल लकेसरचार सत्रात चालणाऱ्या या संमेलनात उदघाटनानंतर ‘धर्म, समाजकारण आणि साहित्य’ या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये प्राचार्य श्रीधर हेरवाडे, डॉ. बी. एम. हिर्डेकर आणि प्रा. प्रकाश पवार सहभागी होतील. दुपारच्या सत्रात वाटंबरे येथील जोतिराम फडतरे कथाकथन करतील. नव्या-जुन्या कवींची ‘काव्य मैफल’ इस्लामपूर येथील प्रा. एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

पुरस्कार विजेते डॉ. पवार ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आहेत. राजर्षि शाहू महाराजांचे चरित्रकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे हे चरित्र अनेक भाषेत भाषांतरित झालेले आहे. त्याचबरोबर त्यांनी ताराराणीचा इतिहास लिहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्मरणार्थ समाजरत्न पुरस्कार दिला जाणार आहे.

धामणे येथील ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील यांना ‘पी. बी. पाटील साहित्यरत्न पुरस्कार’ दिला जाणार आहे. पाटील यांचे नऊ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून कथालेखनाला प्राधान्य देणाऱ्या या साहित्यिकाचा साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

ऊस शेतीमध्ये एकरी १४५ टन उत्पादन आणि खोडव्यामध्ये ११९ टन ऊसाचे उत्पादन घेणारे दुधारी येथील प्रयोगशील शेतकरी अमोल आनंदराव लकेसर यांना ‘शेतकरी राजा पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. लकेसर यांची दखल यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसह अनेक संस्थांनी घेतली आहे. दुग्धव्यवसाय, हळद, आले, द्राक्ष शेतीमध्येही त्यांनी विशेष लौकिक मिळविला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search