Next
‘सौंदर्य स्पर्धा हे महिलांसाठी उत्तम व्यासपीठ’
‘मिस ऑरा इंटरनॅशनल इंडिया’ नेहा कोकरे हिचे मत
BOI
Friday, May 10, 2019 | 12:18 PM
15 0 0
Share this article:

‘मिस ऑरा इंटरनॅशनल इंडिया’ नेहा कोकरे

पुणे : ‘सौंदर्य स्पर्धा या महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धा म्हणजे केवळ सौंदर्यावर आधारीत नसतात, तर इथे बुद्धीमत्तेचाही कस लागतो. आजकाल रंग, वय असे निकष खूप बदलले आहेत. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे सौंदर्य स्पर्धा या महिलांसाठी उत्तम व्यासपीठ आहेत,’ असे मत ‘मिस ऑरा इंटरनॅशनल इंडिया’ नेहा कोकरे हिने व्यक्त केले. 

‘मिस ऑरा इंटरनॅशनल इंडिया २०१९’ हा किताब तिने जिंकला असून, ती आता तुर्कस्तानातील अन्टाल्या येथे होणाऱ्या ‘मिस ऑरा इंटरनॅशनल २०१९’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ४२ देशांमधील स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या अनेक फेऱ्यांमधून २४८ स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी निवडक स्पर्धकांची निवड झाली आहे. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत नेहाने ‘मिस ऑरा इंटरनॅशनल इंडिया २०१९’चा किताब जिंकत अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान पटकावला. याचबरोबर तिने मिस बेस्ट कॅटवॉक, मिस ब्युटिफूल स्माइल व मिस कॉग्निॲलिटी असे किताबही जिंकले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, कविवर्य मोरोपंत पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी नेहाला सन्मानित करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झाल्याने नेहा खूपच उत्साही असून, या वेळी तिने सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. ‘भारताचे नाव जगाच्या नकाशावर झळकवण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे, ती नीट पार पाडू शकेन, अशी मला खात्री आहे’, असा विश्वास नेहाने व्यक्त केला. 


वयाच्या १७ व्या वर्षापासून सौंदर्य स्पर्धा, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणारी नेहा कोकरे मूळची बारामतीची असून, पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत आहे. सौंदर्यस्पर्धा, अभिनय अशा कोणत्याही क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना अभिनयाची आवड, मेहनतीची तयारी आणि घरच्या लोकांचा पाठिंबा, प्रोत्साहन यामुळे या क्षेत्रात आल्याचे नेहाने सांगितले. 

आपल्या या प्रवासाबद्दल आणि आगामी उद्दिष्टांबद्दल बोलताना नेहा म्हणाली, ‘ मी मूळची बारामतीची आहे. माझे वडील वकील आहेत. त्यामुळे मी देखील १२ वी पर्यंत बारामतीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आले. नवलमल फिरोदिया विधि महाविद्यालयात शिकत असताना, माझी पाच फूट नऊ इंच अशी ताडमाड उंची बघून आणि अभिनयाची आवड बघून मैत्रिणी मॉडेलिंग करण्याचा सल्ला देत. माझ्या आईचेही मला प्रोत्साहन मिळत असे. त्यामुळे मी सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. ‘मिस बेंगळुरू’ स्पर्धेत भाग घेतला आणि वयाच्या १७ व्या वर्षी ‘मिस बेंगळुरू’चा किताब जिंकला. या स्पर्धेत उतरण्यासाठी मी पुण्यात संदीप धर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ‘मिस नेव्ही क्वीन’ आणि अशा विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन विजेतेपद मिळवले. वेगवेगळ्या फॅशनविक्स मध्ये भाग घेतला. अभिनयाची आवड असल्याने त्यात प्रभुत्व मिळवण्यासाठी मुंबईत प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या ॲक्टिंग स्कूलमधून ‘ॲक्टर प्रीपेअर्स’ची पदविका घेतली. अनुपम खेर यांनी स्वतः माझी काही प्रोजेक्टसाठी खास तयारी करून घेतली. त्यानंतर कलर्स मराठी वाहिनीवरील ‘माझा होशिल का?’, कॉमेडीची बुलेट ट्रेन, स्टार प्लसवरील ‘ये है मुहब्बतें’ या मालिकांमध्ये काम केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक जयराज नायर यांची मल्याळी फिल्म कॅमल सफारीमध्येही काम केले. आता या स्पर्धेद्वारे नवीन संधी मिळाली आहे, ती सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे.’


‘माझ्या आजवरच्या या सगळ्या प्रवासात मी खूप शिकत गेले. खूप मेहनत घेतली आणि अजूनही घेत आहे. या क्षेत्रात काम करताना तुमची शरीरयष्टी राखण्याबरोबरच आरोग्य राखणेही महत्त्वाचे असते. आहारावर कठोर नियंत्रण ठेवावे लागते. व्यायाम न चुकता करावा लागतो. कामाच्या वेळा अनिश्चित असतात, धावपळ असते, या सगळ्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्यावी लागते. अडचणी येतात पण त्यातून आपण मार्ग काढत जातो. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आपले व्यक्तिमत्व खुलवण्याची संधी मिळते. या क्षेत्रामुळे जगभरातील लोकांशी संपर्क येतो, अनेक नव्या गोष्टी शिकता येतात. त्यामुळे मुलींनी अशा सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे, असे मला वाटते,’ असेही नेहाने नमूद केले. 

ग्रामीण भागातील मुली, महिलांनासाठी काम करणार ‘सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना जगभरात आपल्या देशाची संस्कृती, जीवनशैली, विचारधारा दर्शविण्याची संधी मिळते. समाजासाठी काम करण्यासाठी पाठबळ मिळते. त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागातील मुली, महिला यांना सौंदर्य स्पर्धा, मॉडेलिंगमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना आहे,’ असेही नेहाने सांगितले. ती म्हणाली, ‘ग्रामीण भागातील मुलींना या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा असते;मात्र गुणवत्ता, पात्रता असूनही योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने त्या मागे राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहे. बारामती येथे या आधी असा एक प्रयोग करून बघितला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता असे उपक्रम राबवण्यावर भर देणार आहे. महिलांनी पुढे येऊन आपली स्वतंत्र ओळख घडवावी यासाठी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे’. 

(नेहाच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(ही बातमी इंग्रजीतून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search