Next
‘गडकरी समजावण्याचा नव्हे, तर अनुभवण्याचा विषय’
प्रेस रिलीज
Monday, December 24, 2018 | 12:05 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘राम गणेश गडकरी समजून घेण्यासाठी आधी शेक्सपिअर समजून घ्यावा लागतो; मात्र गडकरींना गुरू माणणार्‍यांनी त्यांना समजून घेतलेच नाही. गडकरी हा समजावून सांगण्याचा विषय नाही, तर अनुभवण्याचा विषय आहे,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.

लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) यांच्या संयुक्त विद्यमाने राम गणेश गडकरी साहित्य महोत्सव ‘मसाप’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित केला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन हर्डीकर यांच्या हस्ते २१ डिसेंबर २०१८ रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, शिरीष चिटणीस, डॉ. वर्षा तोडमल, प्रा. विश्वास वसेकर उपस्थित होते.

हर्डीकर म्हणाले, ‘गडकरी हे स्वयंभू होते. त्यांच्या नंतरच्या नाटककारांनी गडकरींच्या नाटकांतील सर्व आयाम घेतले; मात्र त्यांच्यासारखा नाटककार झाला नाही. त्यांच्याकडे अफाट कल्पनाशक्ती, सात्विक विनोद, व्यक्तीचित्रण, निसर्गाचा अभ्यास होता. त्यांनी नाटके, अभंग, कविता, विनोदी लेख लिहिले. गडकरींच्या नाटकांत नऊ रसांचा समावेश आहे. त्यांच्या नाटकातील विनोदामागे कारुण्य दडलेले असायचे. त्यामुळे गडकरींसारखा नाटककार होणे नाही.’



प्रा. जोशी म्हणाले, ‘गडकरी हे प्रतिभेचे उत्तुंग शिखर आहे. गडकरी यांची बुद्धिमत्ता आणि मार्मिकता पाहून कोल्हटकरही प्रभावित झाले होते. त्यांच्याडे विलक्षण विनोदबुद्धी होती. गडकरींच्या भाषा वैभवाचा तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. गडकरींच्या साहित्याचे चिंतनही झाले पाहिजे.’

स्वप्नील पोरे यांनी प्रास्ताविक केले. शिरीष चिटणीस यांनी महोत्सव आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search