Next
आजही रेडिओचं अधिराज्य
प्रशांत सिनकर
Wednesday, February 13, 2019 | 10:45 AM
15 0 0
Share this story

साधारण ९० वर्षांपूर्वी भारतात पाऊल ठेवलेला रेडिओ बघता बघता घराघरातला सदस्य कधी झाला ते कळलेच नाही. मनोरंजनाचे नवे दालन याने खुले केले. काळाच्या ओघात त्याचे रूप, कार्यक्रमांचे स्वरूप बदलत गेले. इंटरनेट, व्हिडिओच्या वर्चस्वाने रेडिओ मागे पडला असला, तरी त्याची मोहिनी आजही कायम आहे. आजच्या रेडिओ दिनाच्या (१३ फेब्रुवारी) निमित्ताने घेतलेला वेध ...
.....
इंटरनेटच्या मोहजालात माणूस चांगलाच गुरफटून गेला आहे.एक वेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण इंटरनेट नाही, असे चालणार नाही. इंटरनेट थोडा वेळ नसले तरी त्याचा जीव कासावीस होतो. आज इंटरनेट हा जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी रेडिओसारखे माध्यम आजही तग धरून आहे. गरीब, श्रीमंत, आबालवृद्ध या सर्वांसाठी साधे, सोपे माध्यम म्हणून रेडिओकडे बघितले जाते. जगभरातील बहुतांश देशात रेडिओचा वापर केला जातो. आज या माध्यमाचा विशेष दिवस आहे. १३ फेब्रुवारी २०११ रोजी युनेस्कोने जागतिक रेडिओ दिन सुरू करून जगभरातील रेडिओ यंत्रणेला एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच हा दिवस जगभरात ‘रेडिओ डे’ म्हणून साजरा केला जातो.

भारतासारख्या विकसनशील देशात शहरी भागाबरोबर ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागांतही रेडिओचे प्रसारण पोहोचते. रेडिओ हे जगातील सर्वांत सुलभ आणि तितकेच परिणामकारक माध्यम आहे. तो कुठेही ऐकता येतो. ज्यांच्यापर्यंत अद्यापही अक्षरे पोहोचलेली नाहीत. लिहिणे, वाचणे ज्यांना माहीत नाही, अशा जगाशी नाते न जोडता आलेल्या लोकांपर्यंत रेडिओचे माध्यम पोहोचते. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविता येते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रेडिओची भूमिका देखील महत्वाची ठरते. त्यांना सावधानतेचा आणि बचावाचा संदेश देता येतो.

रशियामध्ये जगातील सर्वांत मोठ्या आणि सर्वांत जुन्या रेडिओ प्रसारण कंपन्या आहेत. रशियाने ८० वर्षांपूर्वी आपले प्रसारण सुरू केले. आज हे प्रसारण जगातील ४४ भाषांमध्ये जगभरातील लोक ऐकतात. रेडिओ संदेशांचा शोध मार्कोनी यांनी लावला. त्यांनी १८९५मध्ये इटलीमध्ये पहिला रेडिओ संदेश पाठविला होता. 

भारतामध्ये १९२६ मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या एका खासगी कंपनीने भारत सरकारसोबत एक करार करून, मुंबई व कलकत्ता येथे दोन रेडिओ केंद्रे सुरू केली. या केंद्रांचे कार्यक्रम ४८ किलोमीटर अंतराच्या परिघातच ऐकू येत. त्या वेळी देशात एक हजार रेडिओ परवाने होते; पण तत्पूर्वी १९२४ मध्ये चेन्नई येथे रेडिओचा पहिला क्लब स्थापन झाला होता. हौशी रेडिओ क्लब लाहोर, अलाहाबाद, पेशावर, डेहराडून येथे चालविले जात होते. म्हैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैद्राबाद आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी नभोवाणी केंद्रे सुरू होती. त्यानंतर १९३५मध्ये स्थापन झालेल्या रेडिओ केंद्राला आकाशवाणी हे नाव दिले गेले. 

रेडिओचा जनक मार्कोनी
आज देशात आणि जगात अनेक प्रसारमाध्यमांचा प्रवाह आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात तर या माध्यमांचा जणू भडिमारच होतो आहे. जगभरातील कोणतीही घटना अगदी एका क्षणात जशीच्या तशी आपल्या डोळ्यांसमोर येते. तेथील थेट प्रेक्षपण आपल्याला पाहायला मिळते. त्याचसोबत इतर माध्यमांमुळे ऐकायला आणि वाचायला मिळते, एवढी गती या माध्यमांना आली आहे. आज दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना महत्त्व आलेले असले, तरी रेडिओचा आवाजही कमी झालेला नाही. खेड्यापाड्यातच नव्हे, तर मुंबईसारख्या शहरांतही हा आवाज ऐकू येऊ लागला आहे. एफएम रेडिओ चॅनेल्स आज प्रसिद्ध आहेत. प्रवासामध्ये तर अशा रेडिओवरून हमखास मधुर गाणी, बातमीपत्रे, महत्त्वाची माहिती मिळते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देशवासीयांसोबत त्यांची ‘मन की बात’ करण्यासाठी रेडिओचे माध्यम वापरण्याचा मोह झाला. त्यामुळे रेडिओचे ‘अच्छे दिन’ आजही आहेत, असे म्हणता येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link