Next
जरा सामने तो आओ छलिये..
BOI
Sunday, March 11 | 06:45 AM
15 0 0
Share this story

एस. एन. त्रिपाठीमागच्या पिढीतील एक गुणवान संगीतकार म्हणजे श्रीनाथ त्रिपाठी अर्थात एस. एन. त्रिपाठी. हा मार्च महिना एस. एन. त्रिपाठींच्या जन्माचा आणि मृत्यूचाही. १४ मार्च १९१३ ही त्यांची जन्मतारीख आणि २८ मार्च १९८८ या दिवशी त्यांचे निधन झाले. त्या औचित्याने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या ‘जरा सामने तो आओ छलिये’ या गीताबद्दल....
..........
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभर वर्षांच्या इतिहासात अनेक संगीतकारांच्या कर्तृत्वाच्या खुणा दिसून येतात. त्यामधील १०-१२ संगीतकारांची नावे सर्वतोमुखी आहेत. म्हणजे अन्य संगीतकारांचे कर्तृत्व काहीच नव्हते असे नाही. त्यांनीही ज्या अन्य चित्रपटांना संगीत दिले, ती सर्वच्या सर्व गाणी गाजली असे घडले नसले, तरी त्यातील काही गीते लोकप्रिय ठरली. अर्थात ती गीते लोकप्रिय ठरूनही त्या संगीतकारांना चित्रपट दुनियेतील स्पर्धेत टिकून राहता आले नाही. म्हणावा एवढा नावलौकिक मिळवता आला नाही. हा त्यांच्या प्रारब्धाचा भाग होता आणि अशा संगीतकारांमध्ये एक नाव आहे ते म्हणजे संगीतकार श्रीनाथ त्रिपाठी अर्थात एस. एन. त्रिपाठी.

हा मार्च महिना एस. एन. त्रिपाठींच्या जन्माचा आणि मृत्यूचाही. १४ मार्च १९१३ ही त्यांची जन्मतारीख आणि २८ मार्च १९८८ या दिवशी त्यांचे निधन झाले. धार्मिक व स्टंटपटांचा संगीतकार म्हणून मागची पिढी एस. एन. त्रिपाठींना ओळखते. एस. एन. त्रिपाठी चित्रपटसृष्टीत आले ते संगीतकार सरस्वतीदेवी यांचे सहायक म्हणून. परंतु गायक कलावंत आणि नायक, चित्रपटाचे कथानक तयार करणे, दिग्दर्शनाची जबाबदारी घेणे अशी अनेक कामेही ते त्या सुरुवातीच्या काळात करत होते. नंतर त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा काही काळ संगीतकार चित्रगुप्त हे त्यांचे सहायक होते.

अभिनेता म्हणून एस. एन. त्रिपाठी येथे दाखल झाले असले, तरी त्यांना नायक म्हणून येथे चमकता आले नाही. सहायक कलावंत म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. १९४२मध्ये त्यांची संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू झाली. ‘सेवा’ हा त्यांचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर ‘पनघट’, ‘अंधेरे’, ‘जी हाँ’, ‘रामायणी’ अशा आठ-१० चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. परंतु ते संगीत लोकप्रिय होऊ शकले नाही. १९५०च्या सुमारास होमी वाडिया यांचा ‘हनुमान पाताळविजय’ हा चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केला व त्यांच्याकडे धार्मिक चित्रपटांना संगीत देण्याचेच काम येऊ लागले.

परंतु यामध्येही १९५६च्या ‘हातिमताई’ या चित्रपटाने त्यांची दखल चित्रपटप्रेमींना घ्यावी लागली. होमी वाडियांनी दिग्दर्शित केलेला हा पोषाखी व काही प्रमाणात रंगीत असा चित्रपट होता. शकील ही नायिका, तर जयराज तिचा नायक होता. होमी वाडियांचे ट्रिक सीन्स हे या चित्रपटाचे जेवढे आकर्षण होते, तेवढेच नव्हे, तर त्याहीपेक्षा जास्त आकर्षण या चित्रपटातील आठ गीतांपैकी दोन गीतांचे होते. त्यापैकी एक गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचे ‘झूमती है नजर झूमता है प्यार’ हे होते. राजा मेहंदी अली खान यांनी ते लिहिले होते. दुसरे लोकप्रिय बनलेले गीत म्हणजे ‘परवरदिगार ए आलम तेरा ही है सहारा’ हे होते. हे गीत मोहम्मद रफी यांनी गायले होते. अख्तर रोमानी या गीतकाराने लिहिलेले हे पहिलेच गीत होते. रेडिओवरील ‘बिनाका गीतमाला’ या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सर्वांत जास्त लोकप्रिय गीतांमध्ये या गीतांचा समावेश असायचा. एस. एन. त्रिपाठी हे संगीतकार म्हणून याच गीतामुळे खूप लोकांना परिचित झाले.

आणि यानंतर १९५७मध्ये ‘जनम जनम के फेरे’ हा चित्रपट पडद्यावर आला. मुक्ती फिल्म संस्था या मुंबईच्या चित्रसंस्थेचा हा चित्रपट भक्तिप्रधान होता. ‘सती अन्नपूर्णा’चे कथानक या चित्रपटात होते. निरुपा रॉय आणि मनोहर देसाई हे या चित्रपटाचे नायक-नायिका होते. या चित्रपटाची नऊ गीते भरत व्यास यांनी लिहिली होती आणि एस. एन. त्रिपाठी यांनी संगीतबद्ध केली होती. त्यापैकी मोहम्मद रफींनी गायलेले ‘ये है जनम जनम के फेरे’ हे शीर्षक गीत लोकप्रिय ठरलेच. परंतु त्याहीपेक्षा लोकप्रिय ठरले ते मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‘जरा सामने तो आओ छलिये’ हे द्वंद्वगीत.

याच वर्षात ओ. पी. नय्यर यांनी संगीत दिलेल्या ‘नया दौर’ चित्रपटातील गीते लोकप्रिय ठरली होती; पण ‘बिनाका गीतमाला’ या रेडिओ कार्यक्रमात सर्वांत जास्त लोकप्रिय चित्रपटगीतांच्या यादीत एस. एन. त्रिपाठींच्या ‘जरा सामने तो आओ छलिये...’ या द्वंद्वगीताने पहिला क्रमांक मिळवला होता. परंतु एवढे सुपरहिट गाणे देऊनही पुढील काळात एस. एन. त्रिपाठींना प्रसिद्ध बॅनरचा चित्रपट मिळाला नाही. त्यांच्याकडे राजा-राणीच्या गोष्टींचे अगर देव-देवतांच्या कथानकाचे धार्मिक, पोषाखी चित्रपट येत राहिले व त्यांना एस. एन. त्रिपाठी मन लावून संगीत देत राहिले. यातच १९५९मध्ये ‘रसिक कलाचित्र, मुंबई’चा ‘रानी रूपमती’ हा चित्रपट पडद्यावर आला. त्याचा नायक भारतभूषण होता, तर नायिका निरुपा रॉय होती. गीतकार भरत व्यास होते. या चित्रपटासाठी एस. एन. त्रिपाठी यांनी दिग्दर्शक आणि संगीतकार अशा दोन भूमिका उचलल्या होत्या. हा ऐतिहासिक चित्रपट बरा चालला; पण यामधील एका गीतामुळे रसिकांनी तो लक्षात ठेवला आहे. ‘आ लौट के आजा मेरे मीत--’ हे गीत ‘दो पहेलू दो रंग’ या स्वरूपातील होते. मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वतंत्ररीत्या ते गायले होते. मुकेशचे हे गीत आजही आवर्जून ऐकले जाते.

या आणि अनेक चित्रपटांत शास्त्रीय संगीताचा अचूक उपयोग करून एस. एन. त्रिपाठींनी चित्रपटांना संगीत दिले. मन्ना डे यांच्या आवाजाचा उत्तम उपयोग करून घेतला (चित्रपट कवी कालिदास). ‘रानी रूपमती’ चित्रपटाच्या श्रेयनामावलीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला एक गीत ऐकायला मिळते. ते शास्त्रीय संगीतातील तज्ज्ञ कृष्णराव चोणकर यांनी गायले होते. ती कल्पना एस. एन. त्रिपाठींचीच.

शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन चालल्यामुळे नव्या, बदलत्या जमान्यात एस. एन. त्रिपाठी मागे पडले आणि धार्मिक चित्रपटांचे प्रमाणही १९६०-६५नंतर कमी कमी होत गेले. त्यामुळे अखेरचा काळ लखनौमध्ये काढणारे त्रिपाठी फिल्मी दुनियेपासून दूर गेले. त्या अखेरच्या दिवसांत काय अगर आज काय - एस. एन. त्रिपाठी म्हटले, की ‘जनम जनम के फेरे’ चित्रपटाचे नाव डोळ्यांपुढे येते व कानाशी मोहम्मद रफी व लता मंगेशकरांचा स्वर ऐकू येऊ लागतो.

‘जरा सामने तो आओ छलिये’ या गीताची सुरुवात होते तीच मुळी ‘आत्मा की ये आवाज है’ या ओळीने. परमेश्वरभक्तीत मग्न असलेला नायक देवाशी संवाद साधतो आहे, बोलतो आहे आणि अशा मन:स्थितीत तो गातो आहे. त्याच वेळी त्याची पत्नी त्याला शोधते आहे. तिच्या लेखी तिचा पती हेच सर्वस्व आहे. त्यामुळे ती त्या आशयाने गीत गात आहे. असे हे एक वेगळे द्वंद्वगीत भरत व्यास यांनी लिहिले होते. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी ते गायले होते. पडद्यावर मनहर देसाई हा नायक व निरुपा रॉय ही नायिका हे गीत गातात. एक सुंदर चाल आणि मन डोलायला लावणारे संगीत ही एस. एन त्रिपाठींची कारागिरी! असे हे सुनहरे गीत! काय रचना होती या गीताची? - परमेश्वराला उद्देशून नायक म्हणतो - 

जरा सामने तो आओ छलिये, 
छुप छुप छलने में क्या राज है 
यूँ छुप ना सकेगा परमात्मा, 
मेरी आत्मा की ये आवाज है   

पती-पत्नी दुरावलेले आहेत. पत्नी भेटत नाही ही भावना पतीच्या मनात आहेच आणि तो परमेश्वर भेटीसाठीही इच्छुक आहे. या मनःस्थितीत तो देवाला म्हणतो, ‘अरे हे परमात्मा, माझी जी काही परीक्षा घ्यायची आहे ती पुढे येऊन घे ना! असे लपून छपून तू ही परीक्षा का घेतोस? हे मी तुला मनापासून सांगत आहे, अर्थात हा माझ्या आत्म्याचा आवाज आहे.’

याच दोन ओळी तिकडे पतीला शोधणारी सती अन्नपूर्णा अर्थात चित्रपटाची नायिकाही गाते. तो स्वर अर्थात लतादीदींचा! या ध्रुवपदाबरोबरच गीत आपल्या मनाची पकड घेते. आता पुढील कडव्यात नायक म्हणतो -

हम तुम्हे चाहे तुम नही चाहो 
ऐसा कभी ना हो सकता 
पिता अपने बालक से बिछडके 
सुख से कभी न सो सकता 
हमे डरने की जग में क्या बात है 
जब हाथ में तिहारे मेरी लाज है 
यूँ छुप ना सकेगा परमात्मा
मेरी आत्मा की आत्मा ये आवाज है 

(हे देवा) मला तू आवडतोस, पण तुला मी आवडत नाही, असे कधी होऊ शकत नाही. (कारण) एखादा पिता आपल्या मुलापासून दुरावून सुखाने झोपू शकत नाही. (तद्वत तू आमचा पिता आहेस म्हणूनच तू आमच्यापासून दूर राहू शकत नाहीस! देवाशी एकरूप होण्याची संतांची भावनाच कवी येथे उपमा वापरून व्यक्त करत आहे. आणि हा भक्त नंतर स्वतःला असे आश्वस्त करून सांगतो, की) मला या जगाला घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. (कारण) माझी अब्रू (माझे सर्वस्व) तुझ्याच हातात आहे (माझा रक्षणकर्ता तूच आहेस.)

याच वेळी अन्यत्र नायिका नायकाला उद्देशून म्हणते - 

प्रेम की ये आग सजन जो 
इधर उठे और उधर लगे 
प्यार का है ये तार पिया
जो इधर सजे और उधर बजे 
तेरी प्रीत पे बडा हमें नाज़ है 
मेरे सर का तू ही सरताज है
यूँ छुप ना सकेगा परमात्मा
मेरी आत्मा की ये आवाज है

(हे प्रिया) प्रेमाचा अग्नी हा असा असतो, की जो एकाच्या हृदयात प्रज्ज्वलित झाला, की तो दुसऱ्याच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो. (एकमेकांवर नितांत प्रेम करणारे पती-पत्नी अथवा प्रियकर-प्रेयसी यांच्याच संदर्भात ही उपमा कवीने वापरली आहे. एवढेच नव्हे, तर ही नायिका पुढे प्रीतीला संगीताची उपमा देताना म्हणते) प्रेमाची ही तार अशी असते, की एकाने ती झंकारली की तिचा नाद दुसऱ्याकडून ऐकू येतो. (आणि असे असल्यामुळेच हे प्रिया) तू माझ्या डोक्यावरील मौल्यवान मुकुट आहेस. तुझ्या प्रेमाचा मला अभिमान आहे. (त्यामुळेच) तू असा लपून राहू शकणार नाहीस. (माझे हे तुला बोलावणे म्हणजे) माझ्या आत्म्याचा आवाज आहे. 

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या गोड स्वरांमधील १९५७ सालातील हे ‘सुनहरे गीत’ आजही ऐकावेसे वाटते हीच एस. एन. त्रिपाठींची किमया!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श वा बोरगावकरsvborgaonkar About 310 Days ago
अवर्णनीय फारच छान
0
0

Select Language
Share Link