Next
गेले द्यायचे राहून...
BOI
Tuesday, March 27, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

आरती प्रभू, हृदयनाथ मंगेशकरनुकताच ज्यांचा जन्मदिन होऊन गेला, ते चिं. त्र्यं. खानोलकर अर्थात आरती प्रभू यांनी ‘गेले द्यायचे राहून’ ही भावना आपल्या कवितेतून व्यक्त केली आणि नुकताच ज्यांना ‘मटा’चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला ते ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं संगीत आणि आशा भोसलेंच्या स्वरांनी ती कविता मोहरून गेली. ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या साप्ताहिक सदराला बघता बघता वर्ष पूर्ण झालं. म्हणूनच ‘गेले द्यायचे राहून’ ही भावना व्यक्त करणारा आजचा, या लेखमालेचा निरोपाचा लेख...
..........
‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या लेखमालेला बघता बघता वर्ष झालं. ‘बाइट्स ऑफ इंडिया’ या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलच्या संपादक महोदयांच्या संकल्पनेतून साकार झाली ही लेखमाला! अवघं आयुष्य कविता वाचता वाचता आणि भावमधुर गाणी ऐकता ऐकता बहरून गेलेलं. आनंदक्षणांनी बहरलेली ओंजळ ओसंडून वाहू लागली, तेव्हा दत्ता हलसगीकर या माझ्या आवडत्या ज्येष्ठ कवीच्या कवितेतले शब्द हमखास आठवले.

ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुलं द्यावीत,
ज्यांचे सूर जुळून आले, त्यांनी दोन गाणी गावीत.

असा काहीसा आशय असलेल्या त्या ओळी काळजावर कोरल्या गेल्या. मग मलाही वाटलं, आपण आकाशवाणीच्या सेवेत असताना श्रोत्यांसाठी प्रसारित केलेली गाणी, त्यातल्या आशयघन काव्याचा भरभरून घेतलेला आनंद, ही आनंदाची ओंजळ माझ्या प्रिय वाचकांसाठीही खुली करावी. दिवस ठरला आठवड्यातला प्रत्येक मंगळवार. २०१७ या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून सुरुवात केली. पहिल्या मंगळवारी होती रामनवमी! रसाळ, प्रासादिक आणि अजरामर ठरलेली, महाकवी, आधुनिक वाल्मिकी ‘गदिमां’च्या लेखणीतून अवतरलेली आणि बाबूजींच्या अर्थात सुधीर फडके यांच्या स्वरांनी मोहरलेली प्रभू रामचंद्राची काव्यकथा अर्थात गीतरामायण आठवलं. आकाशवाणी पुणे केंद्राच्या इतिहासातल्या एका सुवर्णपानाची ही सुरेल आठवण कोण विसरणार? ‘जोवरी हे जग तोवरी गीत रामायण’ हा पहिला लेख लिहिला आणि प्रतिक्रियांच्या उदंड प्रतिसादामुळे प्रत्येक मंगळवार स्वरांनी मोहरलेल्या कवितेनं फुलत गेला, मनामनात दरवळू लागला. मोहरलेल्या कवितेची निवड करण्यासाठी निमित्त शोधावं लागलं नाही. आपोआप निमित्त घडायचं. स्वरांचं बोट धरून कविता किंवा कवितेचं बोट धरून सुस्वर गाणं हळुवार साद घालायचं, दिवसभर कानामनात रुंजी घालायचं आणि माझ्या आतुरलेल्या लेखणीतून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचायचं... हा खेळ सुरू झाला, तो अविरत, अखंड ५२ आठवडे चालला. आता मात्र निमित्त होतं थोडंसं थांबण्याचं, छोटीसी विश्रांती घेण्याचं. आजचा हा लेख शेवटचा नाही म्हणणार; पण एका विशिष्ट वळणावर जरासं विसावण्याचा विचार मनात आला आणि वाटलं, ‘अरे, अजून किती कविता, किती गाणी, किती आठवणी सांगायच्या राहिल्यात? रसिकांचं देणं अजून बाकी आहे. छे! केवळ एक वर्ष पुरेसं नाही. एका वर्षात देणं चुकतं कसं होणार?’ असा विचार करत होते आणि ओठांवर आरती प्रभूंची कविता आली...

गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे... 

निमित्त सापडलं अगदी नक्षत्रासारखं! आठ मार्चला आरती प्रभूंचा जन्मदिन आणि या महिन्यातच काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकरांना महाराष्ट्र टाइम्सचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुन्हा मी आठवणींच्या सरींत चिंब झाले. ज्येष्ठ संगीतकार गायक यशवंत देव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला म्हणून याच लेखमालेत मी ‘अरे देवा तुझी मुले...’ या कवितेवर लिहिलं होतं. एक आवर्तन पूर्ण झालं याचं अतीव समाधान मला मिळालं. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांनी मोहरलेली ‘नक्षत्रांचे देणे’ ही आरती प्रभूंची कविता मी समरसून ऐकली. आशाताईंच्या स्वरांनी भारलेला आमचा प्लेबॅक स्टुडिओ, श्रोत्यांपर्यंत घेऊन जाणारी माझी प्रिय आकाशवाणी! कृतज्ञतेने डोळे भरून आले; पण कानामनात साठवत होते एका प्रतिभावंत कवीचे शब्द, पं. हृदयनाथांचं संगीत आणि आशाताईंचा स्वर... 

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने...  

कोकणात जन्मलेले, वेंगुर्ल्यात शिक्षणाचा श्रीगणेशा केलेले, तिथल्या लाल मातीत झालेले संस्कार, श्रद्धा आणि परंपरा ज्यांचा पिंड झाला होता ते आरती प्रभू अर्थात चिं. त्र्यं. खानोलकर. त्यांच्या कविता वाचून पुणे विद्यापीठात विद्यार्थीदशेत असताना आमचाही पिंड घडला होता. त्या पिंडाला ओढ होती अस्सल काव्यप्रतिभेची, सकस साहित्याची आणि अनावर आस्वादकतेची. पुणे विद्यापीठात ‘एमए’च्या पहिल्या वर्षाला ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पोतदारांनी शिकवलेले ‘नक्षत्रांचे देणे’ अजूनही तितकेच तेज:पुंज राहिले आहे. त्याचा प्रकाश किंचितसाही फिकट झालेला नाही. वयाच्या प्रगल्भतेबरोबर आरती प्रभूंच्या कवितेचं नक्षत्र आणखीच तेजोमय होत गेलं. आरती प्रभू यांच्यातला संवेदनशील आणि अफाट प्रतिभा असलेला कवी समजून घेता घेता आयुष्याची संध्याकाळ आणखीच सुरेख सोनेरी वाटायला लागलीय. या कवितांनी, या गीतांनी आपलं आयुष्य किती सुंदर करून टाकलंय याची प्रचिती येते. आपल्याला जे मिळालं, जो आनंदाचा कंद प्राप्त झाला, तो रसिक वाचकांबरोबर वाटून घ्यावा, या भावनेतून ही लेखमाला लिहिली. आणि आज या वर्षपूर्तीच्या लेखासाठी आरती प्रभूंचं ‘नक्षत्रांचं देणं’ माझ्या हाती लागलं. 

किती कविता, किती कादंबऱ्या, नाटकं आणि बरंच काही स्फुटलेखन आरती प्रभूंनी केलं. तरीही ‘द्यायचं राहूनच गेलं’ अशी त्यांची भावना. कोचुरे गावात पहिलं लेखन, ‘सत्यकथे’त १९५४ साली प्रसिद्ध झालेली पहिली कविता, त्या कवितेचं साहित्यवर्तुळात भरभरून झालेलं कौतुक, याबरोबरच चरितार्थासाठी त्यांनी कुडाळला सुरू केलेलं ‘वीणा गेस्ट हाउस.’ वडिलांचा खानावळीचा व्यवसाय असा पुढे त्यांनी चालवला. जेवायला आलेल्यांना आपल्या कविता, लेखन हौसे-हौसेनं वाचून दाखवलं; पण पुढे वीणा गेस्ट हाउस बंद पडलं. चरितार्थासाठी मुंबईला यावं लागलं. बायको, मुलं गावाकडे आणि आरती प्रभू मुंबईत. ते मुंबईत आले; पण ‘कोकणची लाल माती, तो निसर्ग या सगळ्याला आपण मुकलो, याच निसर्गामुळे आपली प्रतिभा फुलली, या निसर्गप्रतिमांना घेऊन आपल्या साहित्यकृती साकार झाल्या, त्या निसर्गाचं देणं आपण चुकतं करू शकत नाही, त्याला सोडून मी इथे आलो, त्यानं माझ्याजवळ ज्या कळ्या आणि थोडी ओली पानं दिली, त्याची परतफेड मी करू शकत नाही,’ याची खंत आरती प्रभूंना कायम वाटत राहिली.

आलो होतो हासत मी काही श्वासासाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त... 

निसर्गरम्य गाव, जिव्हाळ्याची माणसं सगळ्यांना सोडून मुंबईत चरितार्थासाठी आलेले आरती प्रभू कवी मंगेश पाडगावकरांना भेटले. मुंबईत दोन-चार स्नेहीजन होते, ते म्हणजे मधू मंगेश कर्णिक, ‘मौजे’चे श्री. पु. भागवत आणि मंगेश पाडगावकर. पाडगावकरांनी एका कार्यक्रमात आठवण सांगितली होती. मुंबई आकाशवाणीत मंगेश पाडगावकर प्रोड्युसर होते. तेव्हा स्टेशन डायरेक्टर होते एस्. मलिक. पाडगावकरांच्या विनंतीवरून मलिक यांनी खानोलकरांना म्हणजे आरती प्रभू यांना कामावर घेतलं; पण काही महिन्यांतच नियमानुसार आरती प्रभूंना नोकरी गमवावी लागली. ‘पुलं’नीसुद्धा याबाबत अतिशय हळहळ व्यक्त केली होती. आरती प्रभूंच्या कवितांनी महाराष्ट्राला वेड लावलं होतं. अतिशय समर्पक आणि तीव्रतेने प्रकट होणाऱ्या निसर्गप्रतिमा, कवीच्या अंतस्थ भावनांचे हळवे हुंकार, लेखनातली गूढता आणि त्यावर असलेलं दु:खाचं सावट, वैयक्तिक तर कधी सामाजिक जाणिवांच्या प्रकटीकरणातलं सामर्थ्य घेऊन आलेल्या आरती प्रभूंच्या कविता जसजशा आपण वाचत जातो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तसतसे त्या कवितेचे अनेक धागे आपल्याला दिसू लागतात. एक धागा पकडावा तर दुसरा सुटतो. अशा अवस्थेत पं. हृदयनाथ मंगेशकरांसारखा साहित्याची जाण असणारा, कवितेवर नितांत प्रेम करणारा संगीतकार आरती प्रभूंसारख्या कवींच्या कवितांना चालीत बांधतो, आशाताईंच्या सुरेल गळ्यातून गीत जन्माला घालतो, तेव्हा आपण काहीही न बोलता फक्त ऐकायचं असतं. कवीला समजून घेता घेता स्वरांचं देखणं शिल्प मन:चक्षूंनी पाहायचं असतं.

शेवटच्या कडव्यात आशाताईंच्या उंच स्वरांमधून आरती प्रभूंची आर्तता आणि अगतिकता प्रकट होते. ज्या विश्वनिर्मात्याने आपल्याला निसर्गाचं देणं भरभरून दिलं, काव्यप्रतिभा दिली त्याचं देणं कसं फिटायचं? आता कळ्या नाहीत, तर ओंजळीत निर्माल्य आहे. ओली पानं नाहीत, तर त्या पानांचा पाचोळा आहे. असंच तर झालंय आयुष्याचं! मनाचा दगड झालाय. तोच उशाला घेऊन आयुष्य कंठायचंय; पण एक मात्र खंत आहेच... 

गेले द्यायचे राहून... 

रसिकहो ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या लेखमालेत विराम घेताना अशीच काहीशी अवस्था झालीय. कवितांचं, गाण्यांचं एकेक नक्षत्रांचं देणं अजून बाकी आहे. आकाशवाणीच्या सेवेतून मी ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होणार आहे. स्वरांनी मोहरलेल्या अनेक सुंदर कवितांचा आनंद आकाशवाणीमुळे रसिक श्रोत्यांबरोबर मलाही घेता आला. माझ्या ओंजळीतल्या त्या आनंदकलिका ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या लेखमालेच्या निमित्ताने रसिक वाचकांना थोड्या देता आल्या याचं समाधान वाटतं. अर्थात कवी, गीतकार, संगीतकार आणि गायक कलाकार यांच्याशी रसिक वाचकांची भेट घडवून आणता आली, याचं श्रेय ‘बाइट्स ऑफ इंडिया’ला जातं. या नक्षत्रांचं देणं या जन्मी तरी फिटायचं नाही, याची नम्र जाणीव मला आहे. रसिक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल पुनश्च ऋण व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना सेवानिवृत्तीनंतर लेखन रूपातून पुन्हा भेटण्याचं वचन देते. स्वरांनी मोहरलेली आरती प्रभूंची ही कविता गुणगुणतच निरोप घेते.

गेले द्यायचे राहून... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर आता समाप्त झाले असून, या सदरातले सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दिनेश About 357 Days ago
कविच्या शब्दासारखी कायम अतृप्ती आहे . दिनेश दगडकर, जळगाव। 9922919446
0
0
डॉ हरीश कुलकर्णी About 363 Days ago
जितकी आरती प्रभूंची सुरेख गीतं, तितकंच सुंदर विवेचन, सोने पे सुहागा देणारे हृदयनाथांचे संगीत, आणि आशाताईंचा आवाज, गीतातील भाव सोन्याच्या मोलाने मापून तोलून बाहेर पडलेले, अलभ्य योग, चिरंजीव राहणारच
1
0
Manasi Thakur About 363 Days ago
Khup Chan lihilay.. Punha punha vachat rahave ase ahe aple lekhan!
1
0

Select Language
Share Link