Next
बालकामगारांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’
हिमायतनगर पोलीस ठाण्याने केली सुटका
नागेश शिंदे
Friday, December 28, 2018 | 12:55 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर : शहरातील हॉटेल, दुकानांमध्ये बालकामगार ठेवले असल्याची कुणकुण लागताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र बोरसे आणि उपनिरीक्षक काळे यांनी हॉटेल व इतर दुकानांमध्ये ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवून बालकामगारांची तेथून सुटका केली. खेळण्या-बागडण्याच्या आणि शिक्षणाच्या वयात घरची आर्थिक जबाबदारी पेलणाऱ्या या चिमुकल्या खांद्यांवर दप्तर देण्याची सक्त ताकीद या वेळी आई-वडिलांना देण्यात आली.  

शहरातील अनेक दुकानांमध्ये मालकांकडून बालकामगार ठेवले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बोरसे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे यांनी उपनिरीक्षक काळे आणि सहकाऱ्यांसमवेत हॉटेल व्यावसायिक आणि किराणा अशा विविध दुकानांमध्ये २७ डिसेंबर २०१८ रोजी धाडी टाकत ‘मुस्कान’ ऑपरेशन राबविले. यात त्यांना काही ठिकाणी बालकामगार आढळून आले.

पहिल्याच दिवशी काही बालकामगारांची कामाच्या ठिकाणाहून सुटका करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले; बालकामगारांवर कोणतीही कारवाई केली नाही; मात्र त्यांच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून मुलांमध्ये ‘शिक्षणाची ओढ निर्माण करा आणि त्यांच्या हातात पाटी-पुस्तक द्या,’ अशी सक्त ताकीद देण्यात आली. या प्रसंगी बीट जमादार लपशेटवार, श्रीमती श्रीमंगले, श्री. जावेद आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक बोरसे म्हणाले, ‘लहान वयातील मुलांमध्ये पाटी-पुस्तकाची ओढ निर्माण करण्याचे काम हे त्यांच्या आई-वडिलांचे असते. मुलांना कोवळ्या वयात योग्य मार्गदर्शन व ज्ञानाची आवश्यकता असते. १८ वर्षांच्या आतील मुलांना कामावर पाठवणे हा कायद्याने गुन्हा आहे.’

‘हिमायतनगर शहरातील कोणत्याही व्यापाऱ्यांनी, तसेच दुकानदारांनी त्यांच्या दुकानांमध्ये बालकामगार ठेऊ नये. जो कोणी बालकामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करील, त्यांच्यावर ‘मुस्कान’अंतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल,’ असा इशारा या वेळी बोरसे यांनी दिला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link